Tuesday, 29 January 2013

जीवनरेषा

प्रेम असीम जलद विहारी
कोणी न जाणे अंत तयाचा
पवन दिशाहीन भ्रमरे भवती
रोखे गिरी वेग त्याचा
अजब जळी समीकरण असे हे बरसे जीवन रेषा सदनी
बरसे जीवन रेषा

मधुर स्वरे रसरंग परांनी
नटे अवनी हृदयी मनरमणी
वलये भली सुखसंवेदनांची
ज्योत झरे अंजनाची
गरज अटळ कळ तळकाळजाची बिन अक्षर परिभाषा वाणी
बिन अक्षर परिभाषा

शोध भरे ऋतु लयवित क्रांती
अविरत स्पंदन खल एकांती
मन साधन पण क्षितीज अनंत
लेश न गावे हाती
मनन स्मरण क्षण जतन करावे जनन मरण पडछाया देही
जनन मरण पडछाया

...........................अज्ञात

Thursday, 24 January 2013

अनुनय

असतात रंग ढंगहि वेडे
झरतात छटा रत रुधिराच्या
हृदयात बंदिशी अनोळखी
डोळ्यांकाठी रति भावुकशा

खल मदन उरी रण रिपुकांचे
ओठांवरती नित शब्द मुका
काया माया बहु काटेरी
ओढाळ मती अस्वस्थ सखा

चंद्रास न कळते झिजलेले
पाण्यास व्यथा परी आकळते
फेसाळ शिरी कल्लोळे जळ
एकांत कुंद साहतो कळा

सारेच कसे हे अवरोही
तळ नितळ सकळ ढवळे गात्री
आभाळ दूर दूरच सरके
मग श्वास फिरे नत माघारी

डोहात बंद अगणित रात्री
गंधर्व क्षणांच्या गंध कुपी
अस्पर्शधुंद हा ओलावा
अनुनय समिधांचा मापारी

........................अज्ञात

Thursday, 17 January 2013

नकोस

ती :-
दिवसभराचा उजेड उतरत जातो
झाडांच्या तळकोषी आरामाला
झिरपत जातो हळू हळू अंधार
व्यापतो आभाळाला........

तो :-

नकोस हिणवू नको ओणवू
सावर ग स्वतःला
नभी चांदणे येइल अलगद
सजविल तव मेण्याला

धुके भ्रमाचे विरघळेल
उदयेल नवी स्वरमाला
हरवुन जाशिल तिथे
सोडशिल ना या जन्माला

संध्या- छाया ऊन-सावल्या
खेळविती हृदयाला
उमलविती रोमांकित वलये
जागविती मधुशाला

रंग नभाचे तसेच आपले
अंत नसे क्षितिजाला
शब्द कुंचले घेउन हाती
हो सुसज्ज लढ्ण्याला

......................अज्ञात