Tuesday, 19 March 2013

भावओली

गहिवरले नभ भिजले कातळ भोर नवीन उगवली
वियोगव्याकुळ तरिही मन; का नयने आतुरलेली ?
कुंद सभोवर स्तब्ध चराचर प्रतिमा हिरमुसलेली
खोल दर्पणी ध्यास एक मज; स्मितरेषा का पुसलेली ?

दूर कुहुक जणु आर्त शोडषी पर कातरलेली
गूढ व्यथित आभास स्पंदने पथी विखुरलेली
कळे न का असुनी नसलेपण; आभा व्यापलेली
भेटीस्तव हुरहुर बहुधा ही; कळा भावओली


..............................अज्ञात

Wednesday, 6 March 2013

सुदीन

वेध घेत कल्लोळांचे जाहलो मलीन
नाथा होऊ दे माथा चरणी तव लीन
पोत कोवळ्या शब्दांचे वाहुनी कुलीन
तुझे गीत गाइन म्हणतो पाहुनी सुदीन

चैन सुखी घडलो पडलो चाल दिशाहीन
चाललो अथक पण झालो ध्येयाविण दीन
शिणले गजबजलेले मन देह आता क्षीण
तुझे गीत गाइन म्हणतो पाहुनी सुदीन

माघारी फिरते पाउल म्हणे ओळखीन
दिसते ना कोणी तेथे पात्र ना जमीन
अंधार्‍या गर्तेतुन ह्या किरण जागवीन
तुझे गीत गाइन म्हणतो पाहुनी सुदीन

निळ्या अंबरी तार्‍यांचे चांदणे विभोर
विरघळले अवघे कातळ नाहि शेष घोर
अनुभूती आहे-नाही मीच देहहीन
हेच गीत आहे राया हाच तो सुदीन


......................अज्ञात

Monday, 4 March 2013

संवाद

संवाद स्वरांशी माझा
स्पंदन अविरत रागांचे
हृदयी माया कंठी मार्दव
ओठात जलद शब्दांचे
.........सावल्या किती विझलेल्या
.........झिजलेले कोळ कळांचे
..........नाळेत ओवलेली गांवे
..........अवशेष अमिट नात्यांचे

वाहते प्रवाही गाथा
पेरीत स्मरण मिथकांचे
वादळे पूररेषांची
अंतहीन क्षेत्र नभाचे
...........शत जन्म अधूरे नाथा
...........तोकडे वेध वेदांचे
...........स्तंभीत मती नत माथा
...........रण ओघळते ऋणकांचे


.......................अज्ञात