Monday, 13 May 2013

रुसवा

कबूल नाही नसलेपण तव
निगूत जपले आहे वैभव
सरले ऋतू कितीक युगाब्धे
हिरमुसले ना जीवन लाघव

अदृष्यातिल दृष्य आभासे
चंचल डोळ्यांमधील बारव
स्मितरेषा गालांवर अंकित
खोल खळ्या ओठांचे पल्लव

भल्या किनारी रुसवा फसवा
अबोल्यात वठले गुंजारव
आभास; विझल्या खुणा सणाच्या
भिजले काळिज हसले शैशव

............................अज्ञात

Monday, 6 May 2013

संक्षिप्त

वेदनेचे रूप आहे हिमनगाची सावली
वाटते ते बेट तरते नाळ कोणी पाहिली
आंधळ्या हृदयास दिसते कोणतीही माउली
अधिकतर अंदोलनांच्या सुप्त वेठी काहिली

लाट भर आघात अगणित पेटलेल्या मैफिली
भेटले अज्ञात कोणी शोधते मन चाहुली
वेध व्याधाचे इथे जाळीत माया गुंतली
जाळ शीतल कोपले आणि समिधा गोठली

एकले हे युद्ध तरिही संगरी प्रश्नावली
उत्तरे संक्षिप्त कलिका कोष झाकुन राहिली
गंध मदनाचे अधूरे झुळुक अवचित थांबली
वादळे उठली; मुक्याने ऐन भाषा संपली


............................अज्ञात

Thursday, 2 May 2013

आस

मन नाही नाही म्हणते पण
हृदयात आस घन कळवळते
दरवळ मृगजळ मेघांचा
अंतरी आर्त अन वादळते

गोकुळ स्वप्नांची सलगी
जिरवून कथानक वावरते
तापल्या काहिली तृप्त
माळभर धुंधुर माया हिरवळते

ओठात शब्द स्वर कंठातिल
भावना लास्यमय ओघवते
आशेस किनारा वाळूचा
दर्पणी कामना विरघळते

....................अज्ञात