Tuesday, 27 August 2013

अजाणता

अजाणता जाणले कसे
इप्सित शब्दांनी मनातले
भातुकलीने लक्ष्य वेधले
गतकाळात विखुरलेले

चिमणी पोपट बुलबुल आदी
सवंगडी सारे जमले
चित्त हरखले हरली चिंता
वय उरले शैशवातले

बडबडगाणी हिरव्या रानी
राज्य परीचे सापडले
नितळ मोगरी अवकाशावर
बाळ निरागस बागडले

 …………… अज्ञात

Sunday, 25 August 2013

मनकवडी

कसा आहेस ?……  प्रश्न एसेमेस
मस स्स्स ….स्त !!………. उत्तर एसेमेस …

लिहिलेला "मस्त" हा मुका शब्द
गाभ्यातला  कातर स्वर 
लपवू शकला नाही

उत्तरकर्त्याचं
आत्मभान, स्वाभिमान, उसनं अवसान
ओसांडून वहात होतं
त्याच्या अंतर्मनाच्या सांत्वनासाठी…

मन,
स्वत:शी आणि
त्याच्याशी एकरूप झालेल्या द्वैताशी
प्रतारणा करू शकत नाही

व्यक्त अणि अव्यक्त यांतून
परिस्थितीनुरूप
एकाच भावनेचे
भ्रामक अथवा अर्धसत्य अविष्कार
घडत असतात

त्यातल्या सत्य वाहनाला
"टेलीपथी" म्हणतात

असे सूक्ष्म संदेश
नेमके वाचू शकणारी माणसं 
"मनकवडी" असतात

……………………. अज्ञात


Wednesday, 21 August 2013

असणे नसणे

जगण्यात उगिच सजते असणे
अक्षरांत झिंगवते नसणे
असणे नसणे ओसांडे मन
हसण्यात सदा किण किण श्रावण

आभास सदा पथदूर कुठे
शोधास कठिण पडते कोडे
मेघावळ पिंजुन एकांती
धड धड करते काळिज वेडे

आकाश; खोल पोकळ वासा
आवेग; न ठावे थांग जसा
पवनासाहि ना कळलेले हे
वाहतो सवे निशिगंध कसा

………………… अज्ञात

Saturday, 17 August 2013

अथांग

ऋणात आहे; …. ऋण काटेरी
तरी वाट ती माहेरी
लाघव ओळी हळव्या लहरी
अभंग संचित गाभारी

ठाव न लागे अथांग सारे
उचंबळे कधी मौन उरी
प्राजक्तासम सण एकेरी
एकांताची कास धरी

स्पर्श दंवाचा चित्त थरारे
ओघळ किंचित; बंड करी
म्हणे सवे ये श्रावणात  अन
फिरव मला गत माघारी

…………… अज्ञात

Friday, 16 August 2013

आजहि

आजहि बुलबुल तेच बोलते
दुष्कर भाषा परी ही ती
दूर क्षितीजावरती दिसते
क्षीण तेवणारी पणती

आशा नाजुक हिरवळते
दरवळते प्रतिमा ओझरती
अमिट स्वरांचे हे नाते
गुंजारवते अवती भवती

श्रावण धारा लोभस वारा
भाव भावना ओघवती
पागोळी हळुवार उतरते
आतुरल्या काठांवरती

वलये वलये उठती विरती
हुर हुर मनभर कातरती
सांज सकाळी आठवती
नयनांत रेखलेल्या भेटी

…………… अज्ञात

Wednesday, 14 August 2013

किमया

भाषा,…  शब्दांची किमया
अर्थबोध मानभावी माया
जाण काय समजे ना कांही
वय तितुके बघ गेले वाया

हसणे रडणे भाव भावना
अंत:कळा हृदयास कळाया
कोश कठीण भिजण्यास हवे
स्पर्शता सकळ अंकुर रुजवाया

……………………अज्ञात




Friday, 9 August 2013

शिमगा

माझे कसे म्हणू  मी माझाच मी न आहे
स्मरतो कधी कुणाला अंतर उगाच दाहे
आवेग भावनांचा माया उतून वाहे
अभिषेक तोष तरिही संवेदना दुखावे

मेघाळ आसमंती संकेत जड पळांचा
वारा थके जरासा अंगी उलाल लाही
श्वासात जीव लाव्हा रुसवा भला इरेला
आतंक सोसलेला शिमगा सुभान देही

………………अज्ञात

Monday, 5 August 2013

सद्गदीत

हलकेच खुणावे मज कोणी
अंतरी सुरस श्रावण गाणी
मन सुप्त कहाणी एकेरी
व्यापल्या साचल्या आठवणी

प्राजक्त क्षणांची ही वाणी
ओळखी सख्यांची आळवणी
उमले दरवळ कर्पुरी उरी
नि:संग नितळ जणु की पाणी

आकार निराकारात खुळा
भिरभिर घरभर ही चाचपणी
आनंद कधी विरहात भरे
सद्गदीत द्वय हृदय पापणी

……………… अज्ञात