Sunday, 29 September 2013

लय

कधी भोर स्वप्नांची होते रात्र जागते कनकाची
हृदयाची संगत गत वेडी गाठ सोडाते वेठीची
आठवते किमया भेटीची मंद झुळुक हिव पुनवेची
काळोखातिल रमल कवडसा चाहुल किणकिण हसण्याची

उनाडते गोकुळ रंध्रातुन भाव समाधी राधेची
रास खेळते ओघवते गात्रात वलय लय लाटेची
धागा धागा गुंफुन देतो वीण उसवल्या नात्याची
अडखळतो मग श्वास श्वास ईर्षा करतो नभ मेघाची

.........................अज्ञात

Tuesday, 24 September 2013

सखा ......

माझा,....चंद्र हा सखा ......

मन तापे....... मन कापे......
मन झुरते वर्धित होते.......
ओलांडुन वेशी रेषेच्या
ओसंडुन लाट वहाते.......
.......................... माझा,....चंद्र हा सखा ......

अवसेच्या रात्री ओहटते
गर्भार उरी पुनवेसाठी
यातना वेदना खळखळते
दूरस्थ तरी मन ओघळते......
...........................माझा,....चंद्र हा सखा ......

अज्ञात दुरावा ज्ञात कथा
सल व्यथा अंतरी भावुकता
एकांत स्थळी अद्वैत कळत
द्वैताचे काळिज पाघळते
..........................माझा,....चंद्र हा सखा ......

..................अज्ञात

Tuesday, 17 September 2013

नवथर

धुके सभोवर मन काठावर
गूढ प्रभात रुपेरी
भास आभासे असलेलेपण
भ्रामक दुनिया सारी

दंव; लव तृण पानांवर पसरे
अगाध नीर पथारी
गंध मोकळा मातीचा
असमंती घेई भरारी

कोण संग तो कुणा व्यापतो
अगतिक आभा चकोरी
नील आकाशी पाचू रानी
नवथर हिव अंबारी

………………. अज्ञात

Tuesday, 10 September 2013

सार्थक

आभार…
तिच्या गारस वयाचे
ओळखीच्या समयाचे
आतर्क्य यमनाचे
आणि त्यामुळे छेडल्या गेलेल्या
अरूप यौवनाचे ……. !!

त्यातूनच
उतारावरचं तारुण्य
नात्याचं लावण्य
शब्दांचा प्रसव
आणि भावनांचा दुर्लभ शृंगार
लाभला आहे मला …

"माझा मी",…
"नसूनही असलेली माझ्यातली ती "
 भेटलीय मला असंख्य वेळा  …….
अस्तित्वाशिवाय ……!!

या गंधर्व क्षणांमधून जन्मलेली कविताच
जिवंत ठेवील मला
चंद्र माधवीच्या प्रदेशात
तिची प्रतीक्षा करीत
चिरंतन …. !!

आभार, ........
पुन्हा एकदा,
आमच्या न भेटण्याचे, ……
आजन्म ………………. !!


…………………… अज्ञात


Monday, 2 September 2013

ध्यासबावळी

आस मिटे ना मन हो चातक थेंब मिळे ना स्वाती
तृषा पाशवी अंतर्यामी असून पाणी भवती
फिरे एकटा मेघ अंबरी आतुर सुकली माती
छळते सावट रंध्रे अनवट ठाव न लागे चित्ती

अंकुर चिंतातूर; दिसे ना किरण सोबती अवती
गुदमर विळखुन विरह दाटला स्तब्ध जाहली नाती
एक साद पवनास विनवते छेड बांधले मोती
झुलव आपला झुला; तोषव ध्यासबावळी धरती

…………………. अज्ञात