Monday, 28 October 2013

चीत्कला

चीत्कला चपळ चमके गगनी
स्वर उमड घुमड घन प्रतिध्वनी
थरकापे अवनी तपोवनी
डोळ्यात आंसवे विद्ध मनी

काळीज तळी अवखळ पाणी
जळ खळाळे विकल होवोनी
अस्वस्थ मेघ धावे कोणी
चातक चोचीत शुष्क रमणी

वेदना सखी मिरवे अंगी
श्रम दाह शमे ना एकांगी
शिडकावा तनभर भावुकसा
व्हावा अमृतमय शतरंगी

……………. अज्ञात

Wednesday, 23 October 2013

घोटाळा

सालस थंडी लालस डोळा गंध मदनमय घोटाळा
समिर नव्हाळा करतो चाळा झुळझुळतो मद लडिवाळा
एकल बेटावरती फिरतो मेघ खगांचा नभ मेळा
पाउल पाउल नटल्या वाटांवर झुलवी मन हिंदोळा

वेस क्षितीजाची असीमच माणुस ऐसा भव भोळा
कसा पुरावा पुरवावा हा नाही ठावे वानोळा
कुणा पुसावे काय करावे भरे न ओंजळ जीव खुळा
कल्लोळांचे लोळ अचानक राशीवर झाले गोळा

.......................अज्ञात

Tuesday, 15 October 2013

वानोळा

गूढ धीर गंभीर मेघदळ स्तब्ध अचल का वारा ?
चंचल मन बेभान चिंतनी पहाटेस पट कोरा
रुधिराचे घर विषम स्वरांचे हृदयी अलख चकोरा
अंतर्यामी कल्लोळांचा सागर उसळे खारा

नकोच वाटे पण ना त्यजवे कर्तव्याचा तोरा
आस आंसवे अभिलाषेची गोचिड सम अंगारा
पंख निखळले मिटले डोळे अंध दिशा धांडोळा
ना कळते आकळते मग हा जन्म कसा वानोळा ?

........................अज्ञात

Sunday, 6 October 2013

अविचल

पुसू पहातो पुसू शके ना आकाशातिल मेघ दळे
उचंबळे तळ लाटेवरती अस्पर्शच पण चंद्र खळे
फुटे किनारा व्रण काठावर कातळ अविचल स्वर आदळे
घोंघावे वारा माडातुन वय झालेले गोत गळे

.................... अज्ञात