Saturday, 28 December 2013

अंथर

धुके सभोवर चराचरावर दोघे कातर एकांतावर
गूढ वेदना हृदयी अनवट खोल कुठे निश्वास अनावर
काळ दाटला पडद्यापाठी स्मरण अडखळे प्रतिमा धूसर
शब्द स्तब्ध प्रतिबिंब आभासे; संरचना कांचेचे झुंबर

लोलक फिरवी तरंग गहिरे द्वैत विचारांचे मन संगर
ताल आडाणे अवघडलेले रान दुंदुभी वणवा मंथर
आहे नाही संभ्रम अवघे सहवासाचे दुर्लभ अंथर
उलाल रेषा अगतिक निष्फळ जुळवू पाहे समान अंतर

…………………………. अज्ञात

Wednesday, 25 December 2013

अनुप्रीती

विलयखुणा जन्मावरती; मन उलगडते ती अनुप्रीती
चिरंजीव; खडकावरही असते प्रेमाची अनुभूती
काळ युगे हतबल शरणागत कली कळा निष्प्रभ भवती
हरित वाण अंकूर सदा; ऋतु वयातीत जणु वावरती

ओलांडे यातना पर्व वेदना पर्वतांच्या भिंती
खळे अवखळे फ़ेसाळे निर्झर निर्मळतम ध्येयगती
तमा ना कुणाची वा भीती लाघव सरिता ओघवती
काठ किनारे तृप्त; सुप्त समृद्ध क्षणांची ही भरती

…………………………. अज्ञात

Saturday, 21 December 2013

झुळुक वादळी

युगे जाहली जळून पण अंगारा अजून दाही
कलेवरे उरली स्वप्नांची डोळा भरून कांही
काजळ वाटा धूळ फ़ुफ़ाटा दिशा व्यापल्या दाही
सुकलेला पाचोळा भिरभिर उडवत वारा वाही

अंध मोहरे काळे गहिरे पोत मानवत नाही
वठलेल्या रेषांचे व्रण अवशेष वाहती भोई
पराधीन मायामय जीवन झुळुक वादळे तीही
ओहटीत कवने वचनांची जगणे लाट सदाही

उलगडणे वाळूसम काठावर लोटांगण घेई
खोल तळातिल दडलेले सागर पृष्ठावर येई
फेस दुधी विरघळे उफाळे फुटे अंगभर लाही
श्वासांचे दळणे आदळणे चिर अंदोलत राही

…………………. अज्ञात

Thursday, 19 December 2013

चिर अनंत

पुन्हा सुखे परतून न येती पानांवर जैसे दंव मोती
ओघळल्या स्वप्नांचे अंती व्रण कांचेचे उरती

परा शरांचे ढंग निराळे छटा उमलुनिया वावरती 
विमल कोवळे पराग गंधित माल्य फुलांवर लाघवती
परम अलौकिक सण नियतीचे दरवळती वाटेवरती
क्षणभंगुर वैभव हे पण अस्वाद कुणी घेती ना घेती


पसा असू दे याचकसम आमंत्रक सदा नयन भरती
आसपास चिर अनंत कोटी अमृतमय कण भिरभिरती
धुंद सरोवर कुंद सभोवर शकुनांचे मेणे अवती
माया ईश वराची अवघी चराचरावर ओघवती

……………… अज्ञात

Sunday, 15 December 2013

आलेख

अक्षर अक्षर ओघळताना झुळझुळणारे शब्द कवीता
हृदयाचा आकार मनातील सुप्त सुकोमल भाव कवीता
आशय गर्भित गूढ कथानक विश्लेषक तळ ठाव कवीता
कळणारी न कळणारीही अंतरातली धाव कवीता

कोण कुणाचा कधी न होता होता नव्हता डाव  कवीता
आस जनाची कणव जगाची गाभाऱ्यातील घाव कवीता
मेघजळातिल गुदमरलेल्या सहवासाची हाव कवीता
विलय पावलेल्या पर्वातील हळवा क्षणगुंजारव कविता

सखी सोयरी जन्म तारिणी दु:ख हारिणी सरिता कविता
दाहक पावक श्रावक वाहक बखर जन्म जन्मांची कविता
आले गेले मुक्त जाहले मुक्त मौक्तिकांचीही कविता
एकांतातील एकांताचा, द्वैताचा आलेख कवीता

……………………. अज्ञात

Friday, 13 December 2013

प्रौढखणी

विखुरले आरसे शब्दांचे
प्रतिबिंब न्हाइल्या  आठवणी
कातळ विरले झरले पाणी
ओंजळीत अडखळले कोणी

मय कथा जाहल्या जन्माच्या
अनुशेष शेष मन अनवाणी
पाऊल न वा चाहूलहि ना
अवशेष शोध हा मूकपणी

विलयली सकल लाघव वाणी
हृदयी अवखळ सागर करणी
उरली अवघड अक्षर लेणी
ही व्यथा कहाणी प्रौढखणी

………………… अज्ञात

Thursday, 5 December 2013

वर्धिष्णु भव

वय वर्धे जड शरिराचे परि
मन कोमल विमल असू दे .. 
शकुनाचे संचित प्रेषित स्वर
तव घर अंगण सण सजवू दे

सृजनाचा मंडित गाभारा
कामना मनातील उभवू दे
स्थित तृषा क्षुधा इच्छा वांच्छा
शुभ मंगल क्षण निभवू दे

हा पसा पुनित आनंद सधन
घन तिमिर तमाला झिजवू दे
यातना वेदना सकल व्यथा
हे शुभचिंतन खल विझवू दे

……………. अज्ञात


Tuesday, 3 December 2013

परिपूर्ण गीता

वळे न माथा दिशा एकली मूक चालणे आता
स्पंदने हरवली आकाशी पार्थिव उरली गाथा
काहुर ब्रह्मानंदी विरले कवेत तुझिया नाथा
भोगुन झाले प्राक्तन आत्मा म्हणे जाहलो जेता

मी- माझेपण, रिक्त-रितेपण व्यथाच नाही दाता
निराकार आकार तुझे परिपूर्ण जाहली गीता

………………… अज्ञात