Friday, 28 February 2014

अनगड

 पोटात हुंदके श्वास उसासे कंठ दाटले देही 
अनगड सारे अथक प्रवाही  ठाव लागला नाही 
अवकाळी सुख - दु:ख भावना परस्परात विदेही 
कातर मन  जळविना मासळी कधी स्फुंदते लाही 

शोध कधीचे शून्यही परके दिशा पोरक्या दाही 
सोडवे न अवरोध वंचना भ्रमास संभ्रम ग्वाही 
खेळ खुळे जिंकणे हारणे भातुकलीच सदा ही 
श्वास कधी थांबले न कळतिल शेष उरेल न काही 

……………. अज्ञात

Wednesday, 26 February 2014

श्वास लय

स्फटिक निर्मळ स्वर अभंग रोम रोमी चाळ ते
दूर कोठे गाव माझे अंतरीचे चाळते
श्वास लय; अदृष्य सारे लुप्त शब्दी वेधते
चांदण्या गर्दीत कांही हरवलेले शोधते

त्या आभा भासात अजुनी संभ्रमी मन धावते
गोडशी हुरहूर अंगी; स्वप्न नादी लावते
पाश मय रागा-स्वरांचे सोसलेले घाव ते
चंदनी आनंद त्यांचे बाळकोषी दावते

…………… अज्ञात

Tuesday, 18 February 2014

भवभान

अस्तित्व नभी नसुनी आहे
तृष्णेस सदा मृगजळ दाहे
असलेले भासे धुक्यापरी
भवभान हरपुनी मन पाहे

ओलांडुन सीमा क्षितीजाच्या
छायेत विसावे स्वस्थ कुणी
नेसून रात्र सजते अवनी
चांदणे टिपुर संपन्न खणी

तिमिरात मौन घन भावुकसे
अस्वस्थ रमल पाऊल ठसे
स्पर्शता खुणा विरते सारे
वनवास श्वास हे असे कसे ?

......... अज्ञात

Monday, 17 February 2014

निर्मोही

अंशात तुझ्या वसलो मीही
वाहिले हवे ते निर्मोही
समिधा सुखदा अक्षत ग्वाही
आतंक मनी कुठला नाही

मन अबोलसे स्वर विकलांगी
प्रतिमा न कधीही एकांगी
ध्वनि छेडतसे सम प्रतिध्वनी
हृदयात वलय लय शतरंगी

लाटेस काठ हळवा म्हणुनी
खेळते किनाऱ्यावर पाणी
भारती ओहटते ओघळुनि
डोहात माणकांच्या खाणी

………अज्ञात

Tuesday, 11 February 2014

मन रे

मन रे धाव रोखुनी घे
सरती मागे सोस वयाचे
निजलेले ना अजुनी जागे
रोज सकाळी सायंकाळी
काळ सरकतो मागे
        मन रे धाव रोखुनी घे…….

असलेले ओंजळीतले  जग
श्वास तयास लगडलेले बघ
घे पिउनी अमृत भरलेले
ते जितके तितकेच पुरेसे
जगण्या अधिक न लागे
        मन रे धाव रोखुनी घे…….

मरण अखेरी शून्य सोबती
झुळुक वादळे येती जाती
वातीविण तेवे ना पणती
धर छाया कळवळते ज्योती
व्यर्थ मानवी दंगे
         मन रे धाव रोखुनी घे…….

……………. अज्ञात

Monday, 10 February 2014

https://www.facebook.com/lookback/?ref=notif&notif_t=fb_anniversary_video

Thursday, 6 February 2014

चिमुटभर


हूल हीच चाहूल आजवर तीच ओळखीची
आळवावरचा थेंब जसा अस्पर्श उजागर त्याची
एकेक शहारा आस तयाला ह्या हृदयीची त्या हृदयी
झुरे सावली वाटेवरती खंत तिला रात्रीची

रोमांकित अनुबंध पोरका धग अशीच जराशी
फुंकर हळवी भेट चेतवे निखाराच वैशाखी
संधीवरची दूर क्षितीजे स्मरणे आभासाची
सुंभ जळाले पीळ खळे ना राख चिमुटभर बाकी

………………अज्ञात