Tuesday, 10 April 2012

वि. वा. शिरवाडकर - कुसुमग्रज

कुसुमाग्रज; नाशिकमधले एक प्रथितयश साहित्यिक - कवी - नाटककार आहेत; अशी ओळख; मी आठवी नववीत असतांना, शाळेत ते एका कर्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते त्यावेळी, प्रथम झाली होती. त्यांची कुठलीतरी कविता पाठ्यपुस्तकात होती आणि त्याच पानावर; शीर्षकाशेजारी; त्यांचा जाड फ्रेमचा चष्मा घातलेला उरफाट्या विंचरलेल्या दाट काळ्या केसांचा स्केचवजा फोटो होता. हाच तो आपल्या पुस्तकातल्या फोटोतला माणूस आपण प्रत्यक्ष पहातोय एवढंच कुतुहल !! कार्यक्रमाच्या सूत्रधाराने आणि मुख्याध्यापकांनी त्यांचं रिवाजानुसार भरभरून स्तुतीपर कौतुक केलं होतं. त्यांच्या हातून मला कसलंसं पारितोषिक मिळालं होतं; या पलिकडे त्यांच्या अध्यक्षीय भषणाकडे माझं संपूर्ण दुर्लक्ष होतं. "कविता" हा प्रांतच मुळी; अभ्यासात; कायम माझ्या "ऑप्शनला" असल्यामुळे कवी-कविता-वाचन पाठांतर-मिमांसा-रसग्रहण ह्या गोष्टी माझ्या खाती नगण्य होत्या.
पुढे आठ-दहा वर्षांनंतर १९७४ साली त्यांच्याशी प्रत्यक्ष संबंध आला तो, आम्ही त्यांना, आमच्या; नव्याने स्थापन झालेल्या "कला-अर्घ्य" ह्या संस्थेच्या पहिल्या रांगोळी प्रदर्शनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं तेंव्हा. त्यांच्यामुळे, प्रदर्शनाची बातमी; खात्रीने; फोटोसहित; सर्व वर्तमानपत्रात; पहिल्या पानावर छापली जाईल हा त्यांना बोलावण्यामागचा एकमेव निखाळ प्रमाणिक निरागस हेतू होता. त्यावेळी त्यांना एक प्रतिष्ठित कवी म्हणून सर्वदूर मान्यता प्राप्त झाली होती. मात्र एक "कवी" म्हणून कुठलीही आस्था; त्यांच्या नांवाचा विचार करतांना माझ्या मनात नव्हती.
आमच्या विनंतीला मान देऊन प्रसन्न मुद्रेने त्यांनी लगेच होकार दिला. घ्यायला टांगा घेऊन येतो म्हटल्यावर, "नको. माझा मी येईन. नक्की येईन, काळजी करू नका" असं सांगून त्याप्रमाणे खरंच वेळेवर; स्वतःहून; पायी चालत आले. त्यावेळी नक्की काय ते आठवत नसलं तरी खूप छान उद्बोधक आणि प्रेरक बोलले होते येवढं नक्की स्मरतं.
सांस्कृतिक क्षेत्रातल्या नियमित वावरामुळे; ह्या ना त्या कारणाने माझा त्यांच्याशी संपर्क येत राहिला आणि कवींचे "कुसुमग्रज" व रंगकर्मी-नाट्यव्यावसायिकांचे "वि. वा. शिरवाडकर" आमचे "तात्या" झाले.
तात्यांच्या; सदैव लोभस हसण्यातून, प्रसन्न वृत्तीतून, आत्मिक मार्दवातून, आस्थापूर्ण संवादातून, अश्वासक जिव्हाळ्यातून, आंतरिक विश्वासातून, निष्काम निरलस विचारांमधून, त्यांच्यातल्या "माणूसपणाचं" दर्शन होत असे. त्यांना भेटलेला कुणीही रिकामा परत गेला नाही.
शिरवाडकरांच्या, कैकेयी-ऑथेल्लो-एक होती वाघीण-नटासम्राट-चंद्र जिथे उगवत नाही-वीज म्हाणाली धरतीला, ह्या नाटकांमधे; हौशी रंगभूमीवर, अभिनय/ अभिवाचन करण्याचा मला योग आला. त्यांचे अवजड शब्दांनी लगडलेले पल्लेदार संवाद पेलतांना तारंबळ उडायची. एरवी हलक्या फुलक्या विनोदी नाटकांमधे भूमिका वठवतांना; ऐन वेळी मनाने टाकलेली उत्स्फूर्त वाक्यं सहज खपून जायची. पण तात्यांनी लिहिलेल्या वाक्यातला एखादा शब्दच काय पण असलेल्या शब्दांचा क्रम जरी बदलला तरी लय बिघडायची. वि. वा. शिरवाडकरांच्या नाटकांत वा गद्य लिखाणात "कुसुमाग्रजच" अधिक प्रकर्षानं जाणवतात.
कुसुमाग्रजांची प्रत्येक कविता म्हणजे.......
छंदबद्ध रचना, श्रीमंत कल्पनाविलास, चपखल शब्दयोजना, लयदार मांडणी, आशयघन गाभा, सूक्ष्म निरिक्षण, प्रगल्भ विचार, कल्पनातीत विषय, ह्यांनी सजवलेला नवरसांचा अलंकार आणि अंतःकरणाच्या खोल डोहातून उमललेला चैतन्यमय अविष्कार आहे.
तात्यांची कविता त्यांच्या दुर्मिळ शब्दसामर्थ्यामुळे प्रचंड जड वाटते. पण एकदा का ती कळाली की मग काळजाचा ठाव घेते. वाचकाला एखाद्या प्रसंगाची प्रत्यक्ष अनुभूती देण्याची ताकद तिच्यात आहे.
ती विकलाला आधार, गलिताला त्वेष, बुद्धिवंताला आवेष तर गरजवंताला उपदेश देते.
ती स्वप्न रंगवते, शल्य जागवते, प्रणयात समवते, तशी आत्मचिंतनाला प्रवृत्त करते.
ती जाज्वल्य आहे. अन्यायावर कठोर प्रहार करणारी आक्रमक आणि निर्भिड आहे.
त्यांची हर एक कविता; ही त्यांनी पाहिलेल्या-अनुभवलेल्या क्षणांची निसर्गदत्त आकृती आहे.
ते स्वतःच म्हणतात.......
"तुम्ही जेंव्हा
माझ्या कवितेशी बोलता
तेंव्हा माझ्याशी बोलू नका
कारण माझ्या कवितेत
मी असेन बराचसा
बहुधा
पण माझ्या बोलण्यात मात्र
तुम्हीच असाल पुष्कळदा......."
कडवे-कतारीत गद्य लिहून त्याला पद्याचा पोषाख देऊ पहाणार्‍या नवकवींना, त्यांचा तेजोभंग न करता, "मुक्तछंद हाही एक छंद" आहे असं ते आवर्जून सांगत असत.
तुम्ही म्हणाल, हा कविता ऑपशनला टाकणारा आपला केखकर्ता , एवढी पोपटपंजी कसा काय करतोय ? तर ही पोपटपंजी नसून हा स्वानुभव आहे.
१९८८ सालची गोष्ट. आदल्या वर्षी तात्यांचा अमृत महोत्सव झाला होता आणि नुकतंच ज्ञानपीठही जाहीर झालेलं होतं. त्याचं औचित्य साधून, आमच्या "कला अर्घ्य" संस्थेने, वर्धापन दिनी; एक फेब्रुवारीला; " लेणी तेजामृताची" हा कुसुमाग्रजांच्या कविता सादरीकरणाचा अभिनव प्रयोग करायचं ठरवलं.
सर्व कविता संग्रहांमधून निवडक त्रेसष्ठ कवितांचा असा क्रम लावला गेला की; एका कवितेत मांडलेल्या समस्येला पुढच्या कवितेतून उत्तर मिळावं, कर्यक्रमाला गती मिळावी, कवितेतला आशय उलगडला जावा आणि प्रतिभेचा एकेक पैलू प्रेक्षकांपर्यंत जाऊन पोहचावा.
कर्यक्रम आठ-दहा कवी-अभिनेत्यांच्या संचाच्या माध्यमातून नाट्यरूपात सादर झाला. सुरुवातीच्या प्रस्तावनेव्यतिरिक्त, रंगमंचावर उच्चरलेला अविष्कारित शब्द फक्त कवितेचा होता. वातावरण निर्मितीसाठी आवश्यक तेवढंच पर्श्वसंगीत आणि समर्पक प्रकाश योजना वापरली गेली. नेपथ्य, कवितेच्या स्वभावाला अनुरूप असं, फक्त मधे उभा असलेला एक खांब आणि निरनिराळ्या लेव्हल्स एवढंच होतं. अचूक उच्चार आणि शब्दफेक तसंच सादरकर्त्याचा रंगमंचावरचा प्रभावी अभिनय आणि वावर, यावर विशेष भर दिला होता.
ठरलेला कर्यक्रम, माझा दुरान्वयेही संबंध नसलेल्या कविता ह्या विषयाशी निगडित असल्याने, त्यातला माझा सहभाग हा संस्थाप्रमुख म्हणून व्यवस्थापकीय स्वरूपाचा होता. कलावंतांचं चहापाणी- नाश्ता झाला की; मी हॉलबाहेर चकाट्या पिटत गप्पा मारत बसे. जसं जसं पाठांतर आणि क्रमवार सराव होऊ लागला तसतशा तालमी रंगू लागल्या. पर्श्वसंगीतासहित सुरू झालेल्या सरावात, वातावरण अक्षरशः भारलं जात असे. आता मी रोज; आवर्जून; हॉलमधे समोर बसून तालमी बघू लागलो. सतत दीड दोन महिने; तंत्रशुद्ध पद्धतीने उच्चारलेल्या दृक्श्राव्य कविता; रोज कुठल्या न कुठल्या रचनेचा नवा पैलू उलगडून दाखवे आणि निराळी अनुभूती देई.
प्रभावी वाचन; शब्दांचा "नेमका संदर्भार्थ" समजण्यासाठी किती महत्वाचं असतं; हे नाटकामुळे माहिती होतंच. पण इथे, कवितांमधल्या शब्दांव्यतिरिक्त, त्यांच्या "आशयाचे गर्भित पदरही" उलगडायचे असतात म्हणून त्याचं महत्व अधिक जास्त असल्याचं इथे कळालं. कवितेच्या सुप्त पैलूंवर योग्य प्रकाश पडल्याशिवाय ती आकळल्याचा आनंद आणि समाधान मिळू शकत नाही.
एका प्रॅक्टीसला; कुसुमाग्रजांच्या कवित्वाच्या चमत्काराने भारावून, मी स्तंभित-स्तब्ध भान हरपून बघत राहिलो. सर्व निघेपर्यंत मी त्या संमोहनावस्थेत होतो असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. एखादा प्रसंग दृग्गोचर होणे म्हणजे काय हे प्रत्यक्ष अनुभवत होतो. भानावर आलो त्यावेळी कंठ दाटाला होता आणि डोळे भरून आले होते. कुसुमाग्रजांच्या कवितेच्या भव्यतेचा साक्षात्कार झाला होता मला त्या दिवशी. कमीत कमी आणि नेमक्या शब्दात घनगर्भ आशय बंदिस्त करायचं तात्यांचं कसब आणि मांडणीची उत्स्फूर्त सहजता जाणवली होती मला अंतर्बाह्य. खर्‍या अर्थानं; कवितेच्या नाळेशी आलेला माझा तो पहिला संपर्क होता.
पहिल्या प्रयोगात; तात्या स्वतः; पहिल्या रांगेत उपस्थित राहून दाद देत होते. कार्यक्रम झाल्यावर त्याबद्दलचं समाधान त्याच्या चेहर्‍यावरून ओसांडत होतं. शेवटच्या कवितेनं कलामंदिराचं वातावरण गंभीर करून टाकलं होतं. .........
"महापुरूष मरतात
तेंव्हा
जागोजागचे संगमरवरी दगड
जागे होतात
आणि चौकातल्या शिल्पात
त्यांचे आत्मे चिणून
त्यांना मारतात
पुन्हा एकदा....... बहुधा कायमचेच
म्हणून-
महापुरुषाला मरण असते
दोनदा,
एकदा वैर्‍याकडून
आणि नंतर भक्तांकडून.
हे संगमरवरी मरण तुला न लाभो
हीच माझी ह्या शुभदिनी मनोमन प्रार्थना"
.......... ही कविता कुसुमाग्रजांनी एक "उपहासिका" म्हणून लिहिली होती असं ते म्हणाले. सादरीकरणात ती अतिशय गांभीर्यानी दाखविली गेली. तात्यांनी त्या दिवशी त्यातून; आयुष्यभारासाठी एक नवी दृष्टी दिली ती म्हणजे.... जन्मलेली प्रत्येक कविता स्वयंभू असते. तिचं श्रेष्ठत्व तिची तीच सिद्ध करते. कवी नाममात्र असतो. उपहासिकेल्या दिलेल्या गंभीर वळणाबद्दल ते शतप्रतिशत तटस्थ होते. त्यांच्या मूळ भावनांनी गुंफलेल्या कवितांचे, ह्या पिढीने लावलेले नवे अन्वयार्थ, त्यांच्या दृष्टीने, त्यांच्या अपेक्षेच्या पलिकडले पण छान होते.
कुठलीच कविता, कधीच, कुणाशी स्पर्धा करत नसते; हे त्यांच्या ह्या कवितेप्रमाणे आचरणातही ओतप्रोत भरलेलं, त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकानं अनुभवलं आहे.
"विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती
म्हणून नव्हती भीती तिजला पराजयाची
जन्मासाठी हटून केंव्हा नव्हती बसली
म्हणून नाही खंतहि तिजला मरावयाची"
"लेणी तेजामृताची" चा पंचवीसेक प्रयोगांपैकी पाचवा प्रतिष्ठेचा प्रयोग; तीस एप्रिल १९८९ रोजी; फिकी सभागृहात; कवयित्री अमृत प्रीतम यांच्या अध्यक्षतेखाली, दिल्लीच्या महाराष्ट्र मंडळाच्या वतीने, ज्ञानपीठ मिळाल्याच्या सत्कारनिमित्ताने झाला. श्रीराम लागूंचं "नटसम्राट" आणि "लेणी" हे ह्या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित होते. संपूर्ण प्रवासात, प्रथम वर्गाचं आरक्षण सोडून, तात्या आमच्या सोबत थ्री टीयर मधे आणि महाराष्ट्र सदनमधील व्हीव्हीआयपी सूट ऐवजी आमच्या खोल्यांमधे आमच्या सोबत होते.
धुळ्याच्या क्युमाईन हॉलमधे झालेला "लेणी"चा प्रयोग अविस्मरणीय रंगला. रंगमंचावर कविता सुरू झाली की प्रेक्षकही ती म्हणू लागायचे. जवळ जवळ सर्वच कविता बहुतांश उपस्थितांच्या तोंडपाठ होत्या. एखाद्या कवितेचे शब्द इतक्या सर्वसामान्य ( कवी नसलेल्या) माणसांच्या जिभेवर सहज रुळावेत हे, तिच्या जन्मदात्या कवीचं किती मोठं भाग्य म्हणावं !!
कार्यक्रमानंतर विंगेत भेटायला येणार्‍यांच्या चेहर्‍यांवर कुसुमाग्रज त्यांच्या काळजाला भिडल्याचे संकेत मिळायचे. त्या वेळी कवितांच्या कार्यक्रमाला मिळालेला असा उदंड प्रतिसाद ही कुसुमाग्रजांच्या कवित्वाची-त्यांच्या शब्दसामर्थ्याची किमया होती. मी भाग्यवंत ठरलो की, या प्रयोगशील परिसाशी, त्याच्या उत्पत्तीपासून मी निगडीत होतो.
लिहावं तेवढं थोडंच आहे. आजचा हा लेख; मला त्या वेळी जे थोडंफार कळालं त्याचा परिपाक आहे. मी लेख लिहावा हे निमंत्रण त्या अनाहूत तपश्चर्येचं फळ असावं. तात्यांच्या जन्मशब्दी वर्षात, त्यांच्या जन्मदिनाच्या उत्सवासाठी माझी लेखणी चालावी हा त्यांचाच आशीर्वाद.

No comments:

Post a Comment