Sunday, 30 June 2013

हे विहगांनो

हे विहगांनो चला घेउनी मेघांपलिकडल्या द्वारी
खेळ मनस्वी शतरंगांचे फेर धराया गाभारी

उणे पुराणे जग वाटे हे कल्प नवा रुजवू देही
फुलवू या स्वप्नांचा चोळा दूर करू विवरे सारी
रंग बघू प्रमदेचे आणि तृप्त फिरू रत माघारी
पुन्हा एकदा तोच शहारा उमलवुनी मन दरबारी


........................अज्ञात

Wednesday, 26 June 2013

सुप्त

सात स्वरांतिल सूर वाहिले दूर राहिले काही
सुप्त काहिली झाले त्यातिल उलगडले नच काही
गुच्छ बांधले जपले मार्दव अंगिकारले देही
विस्कटलेले तळी झाकले वर्ज्य न केले तेही

श्वासांची स्पंदने गोमटी कधी विकल अवरोही
आरोहात कथा वचनांच्या व्यथा गूढ संदेही
विरघळल्या न जळाल्या समिधा दिशा पेटल्या दाही
दाह जाहले प्रतिमा अंकित प्रियकर त्यात विदेही

खेळ क्षणांचे दीर्घ वेदना कंड सुखावह तरिही
तलम ओंजळी एकांताच्या जळ करतळ निर्मोही
मेघ पापणीआड बिंब प्रतिबिंब स्वप्नवत पाही
जीवन लयमय ऋतू आगळा चिन्मय पवन सदाही

..............................अज्ञात

Sunday, 16 June 2013

शकुनगंध

त्या ओठातिल शब्द
मदनउत्कट होऊनी झरतात
स्मितहास्याची लकेर स्वरमय
खग चिमणे किलबिलतात

बंद पापणी मन चंचल
पर फुलाफुलात विहरतात
चुंबुनिया मधुपराग सालस
शीळ ओळ आळवतात

कोण कळे ना प्रतिमा केवळ
स्पर्श उणे दरवळतात
शकुनगंधमय वास सदाही
तळहृदयी वावरतात


......................अज्ञात

Tuesday, 11 June 2013

नभईर्षा

पावसाची चाहूल आली आणि जमीनीतल्या उधईला पंख फुटले. सोहळा झाला पण कळा अवकळा झाली. ..........
कोण चाहुली उलगडले गड
अंधारातिल वेणा अवघड
वारुळातले फुटले घट अन
प्रकाशात पडझडली झुंबड

क्षणभंगुर भिरभिर भर अंगण
उडे पाकळी पर तिज आंदण
नभईर्षेचे सोस सकस पण
जड झाले पंखांचे जोखड

बळ खळले गळले विरघळले
स्वप्नखळे वाटेतच विरले
सुटली जागा जाग जागली
विद्ध कलेवर पाठी उरले


........................अज्ञात

Saturday, 8 June 2013

सलगी

कौल कौल छत्रामधुनी गीत अंबराचे गळते
रोम रोम कोण पुकारी; हृदयी सल; ना आकळते
जीर्ण; कुडाच्या ह्या भिंती जड होउन पाउल पडते
आर्त कोळुनी जन्माचे पडछाया हसते रडते

किती जाहले राहीले चाक रहाटाचे फिरते
कोरडे जलाशय तरिही आंसवात मन भिरभिरते
ऊर उतू वाहू पाहे बांधावर पाहुन नाते
अंकुरात माया असुनी मातीशी सलगी नडते


.................अज्ञात

Sunday, 2 June 2013

मेघावळ....

मेघावळ....
मेघांची प्रभावळ.......
मेघ म्हणजे आशा. मेघ म्हणजे दिशा.
मेघ अभिलाषा. मेघ निराशाही.

मेघ एक दाटलेलं सूक्त.
कधि करुणायुक्त कधि दुष्काळभुक्त.
ग्रीष्मात निथळलेला प्रत्येकजण आतूर.

वारा मेघांना फितूर.
आला तर धुवाधार नाही तर पिरपिर रटाळ.

मेघ जीवनाचा आधार.
मेघ इंद्राचा अवतार.
सृजनाचा दातार. सृष्टीचा भ्रातार.

पाऊस बेभान. पाऊस निष्काम.
पाऊस अस्वस्थ. पाऊस बदनाम.
पावसात चिखल.चिखलात कमळ.
शेतात भीज. बीजांकुरांची हिरवळ.

बीजात सत्व.
जगण्या जगविण्याचे तत्व.
समृद्ध चाहूल. तरीही छुप्या दुष्काळाची हूल.

अतृप्त हा प्रवास सदाही.
मनांत खोलवर साचलेलं अचानक प्रवाही.
निमित्ताने;....... निमित्ताशिवायही.....
निमित्त सहवासाचं. निमित्त हव्यासाचं.
निमित्त हरवल्याचं; निमित्त आठवल्याचं.
एकांत एकटेपण हेही निमित्त
आणि अवास्तव आसक्ती; हेही पण निमित्त.....

मन हा मेघच........
वार्‍यासोबत दिशाहीन भटकणारा.
वारा थांबला की जडत्वात जाणारा.
पिंजून पिंजून धुकं पिसणारा.
हळव्या स्पर्शानं दंवात विरघळणारा.
उन्हात लपणारा; उन्हाला झाकणारा, पण
कुंद क्षणी नि:संकोच पहाडाच्या छातीवर विसावून मनसोक्त ढळणारा,...

आरोही-विरही-अवरोही.....
सर्वांसोबत........ तरीही एकटा..... एकटाच ...

"मेघ- माणूस - पाऊस"..........स्वभाव साधर्म्य .....
त्याचं अवखळणं-- ह्याचं खळणं
तो पाणी-- हा शब्द
त्याचा प्रवाह-- ह्याचं काव्य
त्याचं संचित-- ह्याचं ललित.........
"मेघावळ"...... निसर्गाचं लालित्य;.. मानवाचं साहित्य.
"मेघावळ"........ अज्ञाताचं काव्यललित;... अज्ञाताचं दायित्व.
संसारातल्या उभ्या आडव्या धाग्यांच्या स्वभावधर्माचं,....... अंकित; अवचित; औचित्य.....
कधितरी;..... थोडंसं;.... तोंडलावणीला पांडित्य. ......


........................अज्ञात