Thursday, 30 January 2014

मदगन्ध


ओठावर प्रणयी ओल स्नेहमय शब्द जिव्हाळ्याचे
ओषाड घनातिल जणू धरेवर अगतिक वळवाचे
सढळ समागम तृप्त विसावा खेळ ऐहिकाचे
मोहरलेले अंग अंग उधळी मदगंध मनाचे

……… अज्ञात

Wednesday, 29 January 2014

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/23376423.cms

माझ्या आजवरच्या वाटचालीची अनपेक्षित दखल घेऊन; तिची ओळख राज्यपातळीवर करून देऊन महाराष्ट्र टाईम्सने मला सुखद धक्का दिला. प्रत्यक्ष मुलाखत न घेता उलगडलेला हा प्रवास आणि लिखाणातले नेमकेपण यातून पत्रकाराची माझ्या-माझ्या व्यवसायाविशयीची प्रांजळ आस्था दिसून येते. आत्मियतेने तटस्थ भूमिकेतून केलेला हा सन्मान माझ्यासाठी खरया अर्थाने " हार्दिक " आहे. महाराष्ट्र टाईम्सचे मनापासून आभार

Monday, 27 January 2014

रसिका

गुंतती खुणा गाठती रेशमी धागे
हृदयात रुधिर रसिकाचे जेंव्हा जागे
चांदणे टिपुर आवसेचे निर्मळ  अवघे
चंद्रास न माहित पण; ते पडद्यामागे

श्वासांचे प्राक्तन; सुखवी प्रेम नि माया
चिरतरुण ठेवते अभिलाषा; मन-काया
जन्मास सोबती गोत; खेळ खेळाया
शोधण्या किनारा लाट हवी उसवाया

प्रेरणा कामना उचंबळाचे कारण
ऋतु गंध रंग रस चैतन्याचे सारण
अभिसरण नसे ते; रुक्ष पोरके अंगण
दशदिशा चराचर अस्वादास्तव आंदण

………………… अज्ञात

Sunday, 26 January 2014

aa prasthaapit aani prathityash kalaavantaanche "RANGOLHI CHITRA PRADARSHAN" aayojit honaar aahe. " HI SPARDHAA NASATE AANI SAHABHAAGAASAATHI PRAVESH MULYAAHI NASATE" . kharchaasahit sarva aayojan aamhi karat asato. "SVARAVAIBHAV" hyaa karyakramaane " KALAA ARGHYAA " parvaachaa SHUBHARAMBH hot aahe aapanaa sarvaanchaa antahkaranpurvak sahabhaag, upasthiti aani sahakaarya apexit aahe.

Wednesday, 22 January 2014

बंधने

ओठांस बंधने हृदयाची
हृदयास प्रेरणा प्राणाची
प्राणास गती मन-शरिराची
शरिरास कुंपणे काळाची

काळास न आहे गोत कुणी
वय चिर ओघळणारे पाणी
अंतास अथांग जलाशय पण
त्यासही किनारयाची करणी

गुदमरे प्रयोजन जन्माचे
ईप्सीत न कळते जगण्याचे
प्रणयात म्हणे क्षणशांती परि
सागरास अथक अशांती

………………. अज्ञात

Monday, 20 January 2014

निरलस

सुकते झडते पुन्हा उगवते भावुक ओले नाते
अवनीलाही कळते ना कोशात कसे तण अंकुरते

स्पर्श खुणेचा थेंब एक , गंधाळ : कुपीतुन उलगडते
रोम रोम रंध्रातुन अलगद अंतरातले दरवळते

कुठेच ना शब्दांचे जोखड मुक्यानेच सारे घडते
झुळुक वाहते अशीच निरलस अंग अंगणी शहारते

………………. अज्ञात

Thursday, 16 January 2014

मन अंतर्मन

उगवतीस क्षितिजावर हसते दिसते लोभस मोठे
मावळतीला पुन्हाहि हसते पण ते खोटे खोटे
दोन ध्रुवांची विलग अंतरे सलग न वाटे कोठे
दिशा चुम्बकांच्या ऐशा अंतरात साटे लोटे

कुणास ना ठाऊक कसे हे काळिज धडधडते
 क्षण एका भेटीस्तव मन अंतर्मन धडपडते

……………………… अज्ञात


Saturday, 11 January 2014

प्रीत खुळी

प्रीत खुळी

एक हुंदका कुशीतला निश्वास सांडला आकाशी
वादळ विरले उरले लाघव हिरवळले चंद्रापाशी
उलगडल्या सावल्या नाचल्या रास जणू हृदयी कोषी
अवसेकाठी पुनव रंगली ना कळले अवचित कशी

कळा मिळाल्या ऋतुपर्णांना गंध कळ्यांना ह्या वेळी
मेघ दाटल्या नभओळी अंगणी रंगली   रांगोळी
वलय शहारा अंकुरला ओठांवर खळखळ ओघळली
जातकुळी ही प्रीत खुळी रुधिरावर अलगद पागोळी

……………………… अज्ञात

विदारके


विदारके दृष्टीस मिळाली भेट जाहली प्रतिमेची
दिशा दशा आक्रसून आल्या मोट बांधली लाटेची
प्रतिबिंबासह बिंब पेटले किमया अनगड प्रेमाची
कातर ओळी थरथरल्या जाळीत बंधने काळाची

हसले विझले ऋतू मनावर माया सरल्या वेळेची
आतुर हिरवे कोंब सदा ही कथा पोरक्या मातीची

………………… अज्ञात

Thursday, 2 January 2014

भरारी

घेत भरारी गगन विहारी विहंग मन प्रतिमा कोरी
वेध दिशांचे युगे युगे जन्मो जन्मी विस्मयकारी
अशक्य कोटी असंख्य नाती गुंता अनुनय गाभारी
अन्वय शोध बिचारे अगणित चुकार भाषा व्यभिचारी

गाळिवशा रिपुकांच्या भिंती रोप पेरती अविचारी
किती करावे थोडे ते तृप्ती न कधीच महाद्वारी
द्यावे घ्यावे विसरावे परतून न यावे माघारी
निववेल कुणी इच्छा वांच्छा थांबेल कधी का ही वारी ??

………………………. अज्ञात