Tuesday, 25 March 2014

झिण झिण

चंद्र एकटा
त्यास न माहित
उलाल जलधी
त्याच्यासाठी
तो का झुरतो ?
कुणास स्मरतो ?
कसला इतका
विचार करतो ?
                प्रियकर त्याची
                साक्ष काढतो
                कविता करतो
                वेडा ठरतो

तो त्याचा तो
त्याची गुर्मी
कुणास उर्मी
पाहुन त्याला
मदन भाळतो
स्वप्न पळतो
येतो जातो
रास खेळतो
लपून बसतो
                   कधी तयाच्या
                   शुक्र सोबती
                   वाट दावतो
                   वाट लावतो

तरी भावतो
उरास माझ्या
चैतन्याचे
उधाण त्याचे
रोम रोम
गर्भी रसरसतो
काळजात
सळसळ रुधिराची
                     प्रेमच लटके
                     हटके हसणे
                     दिसणे मोहक
                     तार छेडतो
                     स्वर झिणझिणतो

…………… अज्ञात

Wednesday, 19 March 2014

मी परदेशी

कुणास मी का केले अवघड ?
प्रेमच अनगड काय करू ?

येता जाता
दिसते माया
रुधिर उसळते
जाग जराशी
हृदयापाशी
काजळ राशी
वादळ उठते
हलते तारू
कोण कुणाचा
नसते काही
झुरते काया
रचने पायी
बचनागी हे
मंथन अवघे
दैव दानवी
घुसळे मेरू 
मीच भुकेला
एकांताचा
स्वप्न पहातो
रात्र जाळतो
हसतो रडतो
चितारतो ते
शब्दांमधुनी
सापडलेले
तुटके फुटके
शब्दच वेडे
एकल कोडे
सुटते वाटे
पण सुटते ना
कविता होते
गूढ वेदना
खरी न खोटी
वाट खुंटते
दरी वाढते
शिल्लक उरते
शून्य पोकळी
अर्थ निरर्थक
मी परदेशी

…………. अज्ञात



Sunday, 16 March 2014

छटा

रंगात रंगले रंग भारल्या कथा सावळ्या मेघांनी
वृक्षांची सजली छत्र चामरे गंध पेरला वाऱ्यांनी
कनक शरांचे बिंब रेखिले परा रेशमी धाग्यांनी
किलबिल खग दंवचिंब मनोहर कात टाकली साऱ्यांनी

आतर्क्यच; संजीवन वैभव मर्म पाहिले डोळ्यांनी
उलगडले अंतर्मन चक्षू  प्राण रोखले श्वासांनी
हर्ष कळा संवेदना सकळ वेढियल्या ग्रह ताऱ्यांनी
भिजलेले रस शब्द जाहले मोहित मोर पिसाऱ्यांनी

कवितेचे अस्तर मखमाली रंग त्यात भरला कोणी
छटा वसंताच्या शिशिरावर मोहरली अवघी अवनी
आस रास मायाळ धरेवर नभसंचित झरले आणी
अंकुर ओले जाग पावले अभंगली अमृतवाणी

…………… अज्ञात  

Sunday, 9 March 2014

कावा

कावा गनिमी हृदयात पेटली आस
एकांती वठला काळ; थबकला श्वास
पथदूर राहिले ईप्सित; अथक प्रवास
युगजन्म  जाहले; तसाच अजुनी ध्यास

रांगणे असे पावलांस ना अदमास
कोणास विचारू दिशाहीन पदन्यास
असलेले संभ्रम खरे वा कि आभास
नयनांस आंधळ्या जन्माचा वनवास

जाळीत उभा वणवा; मी त्याचा घास
मातीत गुंतली मुळे; रोध पळण्यास
आतंक निवविण्या रोज नवे सायास
पिंजले विश्व असंमत; शोध ना त्यास

धग-धुक्यात धूसर दिसे कधी संन्यास
विरघळे सकळ कापरापरी आवास
पण धृवअढळ प्रतिमा; ना होई ऱ्हास
वद  काय करावे सजिवण्यास आरास ??

…………. अज्ञात

Tuesday, 4 March 2014

गहन

रचिले संचित अवघे कोणी
आकार मांडला डोळ्यांनी

ओतला जिव्हाळा  काळिजभर
वेढले मखर ग्रहतारयांनी 


रुधिरात ऊब सागर गहिरा
स्पंदनी फिरे वारा बहिरा
वलये पोटात उरी तोरा
डोहात गहन लहरी भोवरा

तळठाव अथांग क्षितीज गगन
आकाश जणू आभासे मन
नभशोध फोल अदृष्य पवन
आजन्म विकट सारी वणवण



……………. अज्ञात

Sunday, 2 March 2014

मीच माझा

मीच माझा स्वर्ग आणि नरकही माझाच मी
स्वाभिमानी गर्व सोबत दंभ त्याचा दर्प मी
वेगळे माझे खुळेपण वेदनेचा अर्क मी
जाणुनी सारे तरीही का मला आतर्क्य मी ??

भावना ना विलगल्या गुंता तयांचा त्यात मी
सोडवे ना ना सहावे बेगडी आक्रंद मी
गाळ रिपुकांचे उजागर वेधतो अंदाज मी
शोधतो निष्फळ तरी पळतोच आहे तोच मी

कोण मी माझे प्रयोजन का कुणा आधीन मी
जन्म वा मृत्यूस कणभर राहिलो कारण न मी
जिंकणे हरणे तथा पातक न पुण्य कुणीच मी
मी कफल्लक परवलंबी अन उगाच मुजोर मी

गीत हे पाळा-मुळांचे गात जळतो आत मी
पल्लवी शाखा विशाखा साचतो खोडात मी
दर्शनी आनंद माझे स्पर्शतो असंमत मी
चंदनी अवशेष छाया वाहतो माझाच मी

……………अज्ञात