Sunday, 16 March 2014

छटा

रंगात रंगले रंग भारल्या कथा सावळ्या मेघांनी
वृक्षांची सजली छत्र चामरे गंध पेरला वाऱ्यांनी
कनक शरांचे बिंब रेखिले परा रेशमी धाग्यांनी
किलबिल खग दंवचिंब मनोहर कात टाकली साऱ्यांनी

आतर्क्यच; संजीवन वैभव मर्म पाहिले डोळ्यांनी
उलगडले अंतर्मन चक्षू  प्राण रोखले श्वासांनी
हर्ष कळा संवेदना सकळ वेढियल्या ग्रह ताऱ्यांनी
भिजलेले रस शब्द जाहले मोहित मोर पिसाऱ्यांनी

कवितेचे अस्तर मखमाली रंग त्यात भरला कोणी
छटा वसंताच्या शिशिरावर मोहरली अवघी अवनी
आस रास मायाळ धरेवर नभसंचित झरले आणी
अंकुर ओले जाग पावले अभंगली अमृतवाणी

…………… अज्ञात  

No comments:

Post a Comment