Wednesday, 1 October 2014

" ओलावा "

वाऱ्यात कसा ओलावा ? ...  विश्वात विकल का कोणी ?
आकाश कुंद भरलेले …. कल्लोळ कसा हा भानी ?
थांबले चराचर अवघे …. गूढात वेढली अवनी
जलधीत कशास उसासे ?…. पाण्यास शोधते पाणी

अंधार इथे स्वप्नांचा…. सण हिरवा त्यात विराणी
अदृष्य उरातिल वेणा…. संमोहन त्रेधा करणी
अस्पर्श गहन पाशांची…. रुधिरात लागते वर्णी
आधाराविण वळते पाउल…. ओघळते एक कहाणी

ह्या वृथा कशाशा आठवणी….  मन निबिड अशांत घराणी ?
ओळखून रस झुळुकेचे….  पक्षी आळवती गाणी
ऋतु  संभव कैसे आकारणे….  शून्यास दान कांचन वाणी ?
पाहता रिक्त वाटेल खरे पण….  कथा रमल ही चैत्रखणी

…………. अज्ञात



Monday, 15 September 2014

" प्रणय "

एका कविता संग्रहाच्या प्रकाशन स्मारंभात…
सक्षम स्माननीय प्रतिष्ठाप्राप्त ज्येष्ठ कवयित्री समीक्षिकेचा
अभ्यासपूर्ण जाहीर अभिप्राय …….

" वहिनी, जरा सावधान  … !!
तुमचा नवरा प्रेमात पडलाय … !! "

प्रेम ?… लफ़डं ? … प्रतारणा ? …
खल्ल्लास्स ………

असे एक ना अनेक व्यक्तिसापेक्ष अलभ्य दुर्लभ निष्कर्ष ….

"पण ……. "
स्मीक्षिका पुढे म्हणाली …

घाबरू नका …
गैरसमज करून घेऊ नका …

प्रेम हा सहज योग असतो …
आणि " प्रणय "
हा प्रेमाचा अविभाज्य घटक  !

गायकाचा स्वरांसोबत
चित्रकाराचा निसर्गाबरोबर
नटाचा भूमिकेशी
सृजनांचा कलाकृतींशी
वेदनांचा संवेदनांशी
अथवा
विचारवंतांचा आत्म्याशी चाललेला संवाद
हा प्रणयच असतो…

अस्वस्थ संवेदनशील कवींचा प्रणय
एकांतात
गूढरम्य स्वप्न आणि अनंत कल्पना
यांंच्याशी अखंड चालू असतो ….

प्रणय म्हणजे
तादात्म्य, एकरूपता, एकतानता, समरसता, समर्पण, विसर्जन,
हरलेपण, हरवलेपण, समाधी, …आनंद …!!   ….

प्रणयाची आभा म्हणजे
चैतन्य, ऊर्जा, प्रेरणा, जीवन…!
आसक्तीपलिकडचं आकर्षण …. !
सढळ अढळ नितळ सोज्वळ ……. !!
एक निरामय अनुनय …
परमेश्वरी नात्याशी … … !!!!

कवीला,
प्रेमात पडल्याशिवाय कविता सुचू शकत नाही.
आणि
वैश्विक प्रणयाशिवाय ती बहरू शकत नाही ….

वहिनीं, कवी महाशय आणि कविता
तिघांनाही शुभेच्छा …. !!


…………अज्ञात














Monday, 8 September 2014

"किनारा"

स्नेह भारले हृदय; जसा जळकुंभ तरळ आकाश पथी
वाटेवर आतुर प्राण; सकल सुप्तात विकल चातक नाती
पवनास ठाव ना गाव; विचारू तुला कुठे; अंधार मती
चाहूलहि ना; निःशब्द व्यथा; भेटीस भला अवकाश किती ?

चाललो दिशा अंकुरापरी शोधीत प्रकाशाच्या द्वारी
दाटून येइ आभाळ जसे; गुदमरे अक्षरांची वारी
तव भृंगस्पर्श चैतन्यमयी गंधाळ उमलवे गाभारी
प्रतिभेस स्वरांचा शिडकावा रुजवी सजवी नव गेंद उरी

पापणी भरे आकाशाची प्राशून सागराचे पाणी
लाटेस किनारा दिलाच का ? आकळते आता या सगुणी
बाष्पास कवे अदृष्य पवन लंघण्या कंकणाची वेणी
विहरास स्वैर मेरूच हवा आधारास्तव बेजार क्षणी

......... अज्ञात

Sunday, 7 September 2014

" स्पर्श "

शब्दांस स्पर्श काळिज ओला
गाभ्यात भाव घन भरलेला
अधिवास क्षणी अतिदूर जरी
सहवास स्निग्ध रसरसलेला

मउ ऊब कोष रेशिमकाठी
गुंफतो अंतराच्या गाठी
आकार न त्या साकार तरी
मन सुप्त झुरे त्याच्यासाठी

नाते असदृश पण जीव खुळे
चालते चाल चाखीत फळे
चैतन्य उधळती स्नेहदळे
ना कळे किती रुतलीत मुळे

........अज्ञात

" मयकथा "

झिजतो जसा दिवस पळ पळ भरते रात्रीची झोळी
संधी काळी काळिज हुरहुर मयकथा विंधते भाळी
सावल्या गवसती ना काही चिंता अवघडते अवकाळी
वेढून टाकतो नाळ वेधतो सावज आपले कोळी

गाभारी कळते कोण; कोण ? अंतरती सांज सकाळी
बावरते ईर्षा स्वप्नांची दिसते सजताना होळी
वाटते सांधणे कपोलसे बिलगते कृष्ण छाया काळी
अंथरते वाळू पायतळी ओहटीस देते टाळी

जाताना जाते घेत सवे रत्ने अमोलशी डोहतळी
हृदयी गलबलते गाभुळते गुणगुणते भावुकते बकुळी
सय पराधीन व्याकुळते पण गजबज होते चैतन्य कुळी
गोकूळ रास स्मरते वैभव क्षण जगलेले मंगल वेळी

..........अज्ञात

Saturday, 6 September 2014

" नि:संग "

मन अबोलसे अस्पर्श मानवी
झुंबर  कांचेचे
हे चंद्र नव्हे वा तारे
अवकाश उंच प्रतिभेचे
            पाण्यापरि ओघ प्रवाही
            वारा अस्तित्व तयाचे
            झुळुकेस बिल्वरी कंगोरे
            अधिवास तिथे रंगांचे

नात्यास नांव ना कांही
आवेग गूढ तत्वांचे
संवाद विना शब्दांचे
अदृश्य कोष वेदांचे
            मउ पाश रेशमी विणलेले
            हळवेसे मोरपिसांचे
            सहजता जसे दडलेले
            नि:संग संग श्वासांचे

…………… अज्ञात