Monday, 22 April 2013

कथेच्या विश्वात कथासूत्र गवसताना

विस्मृती आणि आठवणी ह्या दोघांच्या बळावर मणूस जगतो असं मला नेहमीच वाटत आलं आहे.

जगात प्रत्येकाचं आयुष्य, त्याची वाटचाल आणि अनुभवाची शिदोरी वेगळी असते. ज्याची त्याला ती सहज वाटली तरी तिर्‍हाईताला ती नवीनच असते. एखाद्याच्या अनुभवांचा समन्वय आणि अनुनय ह्यातून निर्माण झालेलं साहित्य बहुतांना दिशा दर्शक, कांहींना पुनःप्रत्ययाचा आनंद देणारं, क्वचित कुणाच्या सुप्त भावनांना पुनरुज्जीवित करणारं असू शकतं. अशी निर्मिती, किमान रंजक तरीही उद्बोधक असली तर ती विधायक आणि कुणासाठीही प्रेरक ठरते.

कथेच्या विश्वात वावरतांना, " प्रत्यक्ष घटना, त्यातलं नाट्य, विचारांची गुंतागुंत, तिढा सोडवतांना झालेली दमछाक, संबंधित पात्रांचे स्वभाव, ठळक गुणविशेष, पणाला लागलेल्या विविध क्षमता, यशापयशाचे चढ उतार आणि अंतिम टप्यावर मिळालेला विजय अथवा पराजय," हे सर्वच पैलू महत्वाचे असतात. विजय मिळाला तर त्याची परिणीती 'आनंदात' होते आणि हार पदरी पडली तर त्यातून 'शहाणपण' मिळाते. संकुचित बुद्धीमुळे विजयाचा "उन्माद" आणि अपयशातून उद्भवणारा गंड असे विकृत परिणामही सर्वसामान्य माणसात निर्माण होऊ शकतात. एखादी कथा सांगतांना, लेखकाकडून, वाईटातून चांगलं शोधण्याची प्रक्रिया मांडली जाणं अपेक्षित असतं जेणेकरून प्रतिक्षिप्त भावनिक उद्रेकावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच संतुलीत व्यवहाराचं महत्व वाचकाला पटावं आणि अनिर्बंध क्षोभाचे दुष्परिणाम कळावेत.

आयुष्यात कटु प्रसंग आणि खल वृत्ती यांचं स्थान अविभाज्य आहे. खरं तर तेच चुकलेल्या वा चुकू पहाणार्‍या वाटचालीला योग्य वळणावर आणण्यासाठी रामबाण उपाय असतात, पण ते कसे, हे समजण्याकरिता, त्यांचं जाणीवपूर्वक विश्लेषण करून समाजाला दृष्टी देणं हे लेखकाचं आद्य कर्तव्य आहे असं माझं ठाम मत आहे.

स्पष्टवक्तेपणा   म्हणजे उद्धटपणा नव्हे. स्पष्ट वक्तव्य हे , बहुतेकदा प्रांजळ आणि कटु असलं तरी त्याची अभिव्यक्ती विनम्र असते. उद्धटपणात दंभ आणि माज असतो. अर्वाच्य संभाषण शब्दशः न लिहिणं, एखाद्या कथासूत्रात विद्रोह असला तरी त्यातून उद्रेक होणार नाही ह्याची काळजी घेणं हा सुसंस्कृतपणा आहे. घटना हे वास्तव असलं तरी कथा ही त्या घटनेच्या परिणामांचा उहापोह करून निष्कर्ष काढणारी गुणसूत्री असते. तिने वाचकाला, तुलनात्मक विचारमंथनातून, सकस अनुभूती दिली पाहिजे.

लेखन स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक बांधिलकीचं भान राखणं, नग्न सत्याला सुयोग्य आवरण देऊन वाचकाची कुचंबणा न होऊ देणं , हे प्रज्ञावंत लेखकाचं पथ्य आहे.

एखाद्या लहान प्रसंगाचा एकेक पदर उलगडून त्यातून, लेखक, पथदर्शक तात्पर्य काढू शकतो. गहन तत्वज्ञान मांडू शकतो.

कधी कधी आत्मसंवादात्मक प्रश्न आणि उत्तरे यांच्या कोड्यातून, तो,  वाचकाला आपल्या भूमिकेचा स्वतंत्र विचार करायला  प्रवृत्त करू शकतो.

वर्णनात्मक निवेदनातून शब्दचित्र - अर्कचरित्र रेखाटू शकतो. कल्पनाविहाराने स्वप्नसृष्टी उभी करू शकतो.

मी माझ्या, "बारा बारा बारा रोजी दुपारी ठी़क बारा वाजता प्रकाशित झालेल्या बारा पुस्तकांपैकी", सहा ललित 
लेखनात असा पसारा मांडला आहे..............

१) माझ्या कवितेच्या उत्पत्तीविषयीचा आत्मसंवाद " स्पर्श अस्पर्श "

२) देवाच्या पालखीची एक विशेष दुर्मिळ निर्मिती प्रक्रिया " नाथ पालखी "

३) सृजनात्मक विचार प्रसव आणि कृतीशीलता यांवा लोकानुनयातून झालेला अनोखा संगम " स्मृतिचिन्हे "

४) व्यवसायाच्या वाटाचालीतील खाचखळगे, चढउतर आणि सुगंधी काटे " अनुभूती "

५) आयुष्याच्या रसाळ पर्वाच्या सुखद स्मृतींचा निखळ अस्वाद घेणारी आणि देणारी संहिता " मेघावळ "

६) समाजात वावरतांना प्रसंगानुरूप तत्काळ उमटलेली 'कवितिक प्रतिक्रिया' आणि सोबत त्याविषयीचे सविस्तर गद्य लेखन असे व्यक्त होण्याचे दोन आश्चर्यकारक पैलू दाखवणारे  " अन्वय "

बाकी सहा, वेळोवेळी लिहिल्या गेलेल्या निवडक कवितांचे विषयानुरूप संग्रह आहेत.

प्रकाशित झालेल्या पुस्तकांचं लिखाण विचारांच्या  ओघात बारा बारा बारा च्या उद्दिष्टामुळे होऊन गेलं पण ह्या लेखाच्या निमित्ताने त्या प्रक्रियेचं सिंहावलोकन झालं व एक प्रकारे तटस्थपणे झालेलं आत्मपरीक्षण नोंदवल्या गेलं असं मी म्हणेन.

जाणीव एक कोण्या, बीजापरीस असते
संवेदना फळाची, शाखेस भार नसते
गंधास स्वाद जेंव्हा, परिपक्व फूल होते
शब्दात भावना अन सरितेसमान झरते

त्या ओढ अर्पणाची, समिधा समर्पणाची
व्हावा तृषार्थ कोणी, आकंठ तृप्त ह्याची


सी. एल.  कुलकर्णी
९८२३० ७५५३८

अर्धसत्य


मंतरलेली शीळ कुठुनशी
चित्तसदन मन होते मंथर
अंदोलत उलगडते प्रतिमा
झुळुक मिटविते पुरते अंतर

कोष रेशमी लय कांचनमय
रात्र झुलविते रास निशाचर
गोत्र मिरविते मोरपिसांचे
अमानवी संस्कार शिरावर

मिटल्या डोळ्यां-आंत सरोवर
झुरते काजळ उभय तिरांवर
जाग मत्सरी येते अवचित
अर्धसत्य मग होते गोचर

..............अज्ञात


शान्त एकांत. तो स्वतःत मग्न. श्वासांवर लक्ष. सभोवताल नीरव; जगृतीच्या प्रतीक्षेत. अर्धस्फुट पहाट. उजाडू पहातंय.

दूर कुठून कुण्या पक्षाची; नाजुक-हलकी-मायावी शीळ ऐकू येते आणि "एकाग्रतेचं माहेरघर मन" विचलित होतं. हळव्या अंदोलनांमधून अंतर्मनातील सुप्त प्रतिमा उलगडू लागते. दरवळणारी मंद झुळुक; "काल आणि आज" मधलं अंतर मिटवून त्याला गतकाळात घेऊन जाते.

सुवर्णमयी तंतूंनी विणलेली तलम रेशमी क्षणांची लय आणि रात्र झुलविणारी निशाचर रास आठवून; मोरपिसाचं ईश्वरी (अमानवी) गोत्र (कृष्णलीला) शिरावर मिरवू लागतं.

अशा भारावलेल्या अवस्थेत, मिटल्या डोळ्यांत ओथंबलेलं सरोवर; काठांचं काजळ झिजवू लागतं. इतक्यात नियतीचा मत्सर त्याला ह्या अमृतसमाधीतून जागा करतो आणि चरितार्थासाठी जगणारं वास्तव, "दुसरं अर्धसत्य", कर्यान्वित (गोचर) होतं.

........................अज्ञात

Sunday, 21 April 2013

आषाढी

दाट दाटल्या जुन्या मैफिली काळ थांबला नाही
शरिर जाहले जीर्ण मनी साचल्या सावल्या कांही
बोल अबोलच आणि चाहुली पंख मिटून विदेही
टिपुर चांदणे चंद्राविण नभ अवसेचे संदेही

रूक्ष तरी शीतल वाटे एकांत दिशांना दाही
छाया पडछाया माळावर वृक्ष जरी न तिथेही
कोण सोसते पोसते सुखे घाव झेलते देही
आभाळ अंबरी आषाढी माया ममता कविता ही

..............................अज्ञात

Thursday, 18 April 2013

भुलैया

मन धावे....... मन धावे......
पालवी नवी अंगावरती ओलावे...
ओठात नवे जीवनगाणे..
वाटे गावे...
मन धावे...

मोकळ्या दिशा
आकाश कडेवरती,.. वाकुन बोलावे
ओणवे मेघ मल्हार कधी
अमृत घन पान्हावे...
साकेत अंगणी पुष्करिणीसह
दान पसा पावे...
मन धावे...

साधार कल्पना
स्वप्न अकल्पित दावे...
जे काय हवे ते
हृदयी भावे.....
संकेत संगमी,
रंजन संगर भुलवे...
मन धावे...... मन धावे.....


.....................अज्ञात

Monday, 15 April 2013

हुंकार

नि:शब्द शब्द हुंकार मनाचे
ओले किनारे खार्‍या पाण्याचे
काळजाचा साचा उघडून वाचा
श्वास बाळाचे ध्यास मायेचे

वळणांचा घाट वारा मोकाट
सारे सारे कांही होते आट पाट
आलेली पहाट पावलांची वाट
आईची सय करते साय घनदाट


...........................अज्ञात

Thursday, 11 April 2013

वृक्षारव

पाचोळा माझाच पेटला
झळा लागुनी दग्ध विशाखा
अंगावर जळली पाने पण
आत अबाधित बहर अनोखा

ना सूडाचा लेश तसूही
ना रिपुकांचा जंगम विळखा
डाव मांडला ऋतुचक्राचा
ना कोणी मज आपला परका

कुणी न माझा असो तरीही
"मी" माझ्यातिल उत्कट झोका
पवनाचे हुंकार झेलतो
जरी कधी असतो तो धोका


.........................अज्ञात


थोदक्यात आशय लिहायचा प्रयत्न केला आहे

पाचोळा माझाच पेटला
झळा लागुनी दग्ध विशाखा
अंगावर जळली पाने पण
आत अबाधित बहर अनोखा


वरवर पाहिल्याअव्र कोणी वृक्ष आपल्या मनातले बोलत आहे असे गृहीत धरु शक्तो परंतु, हे मानवी मनोव्यापारांनाही लागू होईल. कितीही दु:खे, अरिष्टे अंगावर कोसळली तरीही आत एक आशा, जिद्द, एक छोटासा स्फुल्लिंग सदोदित तेवत असतो, ज्या योगे माणूस पुढे जाऊ शकतो.

ना सूडाचा लेश तसूही
ना रिपुकांचा जंगम विळखा
डाव मांडला ऋतुचक्राचा
ना कोणी मज आपला परका


स्वतःची ओळख पटल्यावर कोण शत्रू? कोणाचा त्रास? सारी जगरहाटी अशीच चालणार आणि सारे असेच युगानुयुगे चालते आहे हे उमजल्यावर राग लोभ हे निमाले अशी अवस्था येणे क्रमप्राप्तच.

कुणी न माझा असो तरीही
"मी" माझ्यातिल उत्कट झोका
पवनाचे हुंकार झेलतो
जरी कधी असतो तो धोका


आणि आता अशी अवस्था आली तरी एकटेपणा सतावत नाही कारण स्वत:ची सोबत इतकी पुरेशी आहे की त्याच स्वत्वाच्या बळावर आयुष्य जसे येईल त्याला सामोरे जायची धमक मिळवली आहे.

…… …. यशोधरा 

Saturday, 6 April 2013

संमोहरमल

भोर प्रभाती चंद्रकोर कोकीळ शीळ अन मनकवडी
हळुवार स्पर्श झुळुकेचा लाघव पक्षांची लाडी गोडी
गूढ साद अवती भवताली क्षितिजावर लाली थोडी
पर्णफुलांवर वसंत सण अंगणभर जगणारी कोडी

नील सरोवर प्रतिबिंबाविण थांग न त्या खोली वेडी
मेघ ढाळतो ऋतू तयातुन जीवन हसण्याची नाडी
मनहृदयी स्वप्ने जरतारी कुणी तरी नकळत धाडी
व्योम प्राणमय लयलाटेवर सुख दु:खे कडवी जोडी

काठ किनारे शब्दांचे रसरंग क्षणांच्या कावेडी
पाऊलठसे संमोहरमल मृगजळी तरंगे तन होडी

.....................अज्ञात



इंदुसुता,
आपल्या विनंतीचा आदर करून कवितेचा आशय थोडक्यात देण्याचा प्रयत्न करतो आहे. आशा आहे आपल्याला अपेक्षित आनंद आणि समाधान मिळेल .

भोर प्रभाती चंद्रकोर कोकीळ शीळ अन मनकवडी
हळुवार स्पर्श झुळुकेचा लाघव पक्षांची लाडी गोडी
गूढ साद अवती भवताली क्षितिजावर लाली थोडी
पर्णफुलांवर वसंत सण अंगणभर जगणारी कोडी


कृष्ण पक्षातल्या त्रयोदशीची भली पहाट. अत्यंत नाजुक रेखीव चंद्रकोर उगवलीय. दूर कुठूनशी मनातल्या प्रसन्नतेशी सुसंगत कोकिळेची शीळ घुमते आहे. झुळुकेच्या लाघवी स्पर्शासोबत पक्षांची लगबग, चिवचिव, गुटुर घू चालू आहे.क्षितिजावर लाली उमलत चालली आहे पनाफुलांवर वसंताचा बहर सजलेला आहे कुणी अनामिक साद घालतोय असा भास होतोय. अशा अनेक कधीही न उमजलेल्या परंतू नेमाने न चुकता घडणार्‍या गोष्टी आजुबाजूला वावरताहेत.

नील सरोवर प्रतिबिंबाविण थांग न त्या खोली वेडी
मेघ ढाळतो ऋतू तयातुन जीवन हसण्याची नाडी
मन हृदयी स्वप्ने जरतारी कुणी तरी नकळत धाडी
व्योम प्राणमय लयलाटेवर सुख दु:खे कडवी जोडी


वरती नील सरोवराप्रमाणे भासणारे कुठल्याही प्रतिबिंबाचा अद्याप स्पर्श न झालेले अथांग खोल आकाश आहे. त्यातूनच एखादा मेघ आपले जीवन सुखकर करणारे ऋतू साकार करत असतो. तशीच आपल्या नकळत आपल्या अंतरंगात अकल्पित स्वप्ने साकर होत असतात. ह्या प्राणमय विश्वाच्या वाटचालीत सुख दु:खाची जोडी मात्र एकमेकांच्या कडव्या साथीने अखेरपर्यंत मार्ग क्रमीत असते.

काठ किनारे शब्दांचे रसरंग क्षणांच्या कावेडी
पाऊलठसे संमोहरमल मृगजळी तरंगे तन होडी


या सर्व घडामोडींचा घेतल्या जात असलेला अस्वाद शब्दांच्या काठावर सुखद क्षणांच्या कावेडी घेऊन स्थिरावतोय; चिरंजीव होतोय. गतकाळातील संमोहनाचे गारूडासोबत आणि आयुष्याच्या अनाकललीय मृगजळावर ही तन होडी आपोआप तरंगते आहे.


......................अज्ञात


तुमच्या संमोहरमलचा अर्थ मला पुप्याने (पुण्याचे पेशवे) ह्यांनी विचारला होता. मला जशी कविता उलगडत होती त्याप्रमाणे पहिल्या कडव्याचा अर्थ लिहिला होता. आपले विश्लेषण स्वतः कवीचे म्हणून अधिक महत्वाचे, प्रत्येकला काव्य वेगळी अनुभूती देते हे म्हणतात हे खरेच आहे. इथे मी लिहिलेला अर्थ आपल्यालाही कळवावासा वाटला म्हणून देत आहे. पुढील कडव्यांचा अर्थ लिहिण्याची आता गरज नाही. smiley अगदीच त्रासदायक वाटल्यास मोठ्या मनाने माफ करा.
smiley
भोर प्रभाती चंद्रकोर कोकीळ शीळ अन मनकवडी
हळुवार स्पर्श झुळुकेचा लाघव पक्षांची लाडी गोडी
गूढ साद अवती भवताली क्षितिजावर लाली थोडी

पहिल्या कडव्यात अतिशय संयतपणे आणि सूचकपणे उलगडलेला अबोल शृंगार/ प्रेम आहे. हे मला अगदी शब्दांत सांगता नाही यायचे पण प्रयत्न करते. तो शृंगार कधीकाळचा असेल आणि त्याची आठवण असेल किंवा कदाचित आदल्या रात्री एकमेकांसोबत घालवलेली रात्र असेल. भल्या पहाटची फिकुटलेली पण सौम्य तेजदायी चंद्रकोर पाहताना आणि कुठेतरी घुमलेली को़कीळाची आर्त स्वरातली साद कोणाची आठवण मनात जागवत असेल... सभोवतालच्या जगाला विसरुन एकमेकांबरोबर रमलेले पक्षी, पहाट झुळुकेचा पहाटस्पर्श, क्षितीजावर उमलणारी पहाट कोण्या हळुवार स्पर्शाची आठवण करुन देत असेल.

पर्णफुलांवर वसंत सण अंगणभर जगणारी कोडी

अवतीभवती फुललेला वसंत पाहताना एकमेकांसोबत घालवलेल्या क्षणांची पदोपदी आठवण येत असावी - फुलले रे क्षण माझे - नाते कसे फुलत गेले ते आठवत असावे, काही प्रसंगांची संगती, काही न उलगडल्याप्रमाणे वाटलेले अबोल क्षण - जे अजूनही मनामध्ये जिवंत आहेत, ते पुन्हा एकदा मनामध्ये रुंजी घालत असावेत. अंगण हे रुपकात्मक असू शकते. मनाचे अंगण असे.

धन्यवाद.

…. यशोधरा 

Monday, 1 April 2013

त्रेधा

एक एक श्वासात ध्यास
मज बिलगुन आहे राधा
नसून भासे सोबतीस
ठायी ठायी ही बाधा
.............. स्वरे कोकिळा गाई वसंत
................अनाम सार्‍या विविधा
................मदन गंध पवनासंगे
................एकांती कुंठित मेधा
खोल निळाई अथांगासवे

क्षितिज बांधते वाडा
जन्म सांडतो संमोहातच
धाव धावतो वेडा
.................वलये वलये लाटा लटा
.................मनभर तिरपिट त्रेधा
.................काय कशास्तव हे भिजलेपण
.................सय-श्रावण सण साधा


......................अज्ञात