पाचोळा माझाच पेटला
झळा लागुनी दग्ध विशाखा
अंगावर जळली पाने पण
आत अबाधित बहर अनोखा
ना सूडाचा लेश तसूही
ना रिपुकांचा जंगम विळखा
डाव मांडला ऋतुचक्राचा
ना कोणी मज आपला परका
कुणी न माझा असो तरीही
"मी" माझ्यातिल उत्कट झोका
पवनाचे हुंकार झेलतो
जरी कधी असतो तो धोका
.........................अज्ञात
थोदक्यात आशय लिहायचा प्रयत्न केला आहे
पाचोळा माझाच पेटला
झळा लागुनी दग्ध विशाखा
अंगावर जळली पाने पण
आत अबाधित बहर अनोखा
वरवर पाहिल्याअव्र कोणी वृक्ष आपल्या मनातले बोलत आहे असे गृहीत धरु
शक्तो परंतु, हे मानवी मनोव्यापारांनाही लागू होईल. कितीही दु:खे, अरिष्टे
अंगावर कोसळली तरीही आत एक आशा, जिद्द, एक छोटासा स्फुल्लिंग सदोदित तेवत
असतो, ज्या योगे माणूस पुढे जाऊ शकतो.
ना सूडाचा लेश तसूही
ना रिपुकांचा जंगम विळखा
डाव मांडला ऋतुचक्राचा
ना कोणी मज आपला परका
स्वतःची ओळख पटल्यावर कोण शत्रू? कोणाचा त्रास? सारी जगरहाटी अशीच
चालणार आणि सारे असेच युगानुयुगे चालते आहे हे उमजल्यावर राग लोभ हे निमाले
अशी अवस्था येणे क्रमप्राप्तच.
कुणी न माझा असो तरीही
"मी" माझ्यातिल उत्कट झोका
पवनाचे हुंकार झेलतो
जरी कधी असतो तो धोका
आणि आता अशी अवस्था आली तरी एकटेपणा सतावत नाही कारण स्वत:ची सोबत इतकी
पुरेशी आहे की त्याच स्वत्वाच्या बळावर आयुष्य जसे येईल त्याला सामोरे
जायची धमक मिळवली आहे.
…… …. यशोधरा
No comments:
Post a Comment