Saturday, 6 April 2013

संमोहरमल

भोर प्रभाती चंद्रकोर कोकीळ शीळ अन मनकवडी
हळुवार स्पर्श झुळुकेचा लाघव पक्षांची लाडी गोडी
गूढ साद अवती भवताली क्षितिजावर लाली थोडी
पर्णफुलांवर वसंत सण अंगणभर जगणारी कोडी

नील सरोवर प्रतिबिंबाविण थांग न त्या खोली वेडी
मेघ ढाळतो ऋतू तयातुन जीवन हसण्याची नाडी
मनहृदयी स्वप्ने जरतारी कुणी तरी नकळत धाडी
व्योम प्राणमय लयलाटेवर सुख दु:खे कडवी जोडी

काठ किनारे शब्दांचे रसरंग क्षणांच्या कावेडी
पाऊलठसे संमोहरमल मृगजळी तरंगे तन होडी

.....................अज्ञात



इंदुसुता,
आपल्या विनंतीचा आदर करून कवितेचा आशय थोडक्यात देण्याचा प्रयत्न करतो आहे. आशा आहे आपल्याला अपेक्षित आनंद आणि समाधान मिळेल .

भोर प्रभाती चंद्रकोर कोकीळ शीळ अन मनकवडी
हळुवार स्पर्श झुळुकेचा लाघव पक्षांची लाडी गोडी
गूढ साद अवती भवताली क्षितिजावर लाली थोडी
पर्णफुलांवर वसंत सण अंगणभर जगणारी कोडी


कृष्ण पक्षातल्या त्रयोदशीची भली पहाट. अत्यंत नाजुक रेखीव चंद्रकोर उगवलीय. दूर कुठूनशी मनातल्या प्रसन्नतेशी सुसंगत कोकिळेची शीळ घुमते आहे. झुळुकेच्या लाघवी स्पर्शासोबत पक्षांची लगबग, चिवचिव, गुटुर घू चालू आहे.क्षितिजावर लाली उमलत चालली आहे पनाफुलांवर वसंताचा बहर सजलेला आहे कुणी अनामिक साद घालतोय असा भास होतोय. अशा अनेक कधीही न उमजलेल्या परंतू नेमाने न चुकता घडणार्‍या गोष्टी आजुबाजूला वावरताहेत.

नील सरोवर प्रतिबिंबाविण थांग न त्या खोली वेडी
मेघ ढाळतो ऋतू तयातुन जीवन हसण्याची नाडी
मन हृदयी स्वप्ने जरतारी कुणी तरी नकळत धाडी
व्योम प्राणमय लयलाटेवर सुख दु:खे कडवी जोडी


वरती नील सरोवराप्रमाणे भासणारे कुठल्याही प्रतिबिंबाचा अद्याप स्पर्श न झालेले अथांग खोल आकाश आहे. त्यातूनच एखादा मेघ आपले जीवन सुखकर करणारे ऋतू साकार करत असतो. तशीच आपल्या नकळत आपल्या अंतरंगात अकल्पित स्वप्ने साकर होत असतात. ह्या प्राणमय विश्वाच्या वाटचालीत सुख दु:खाची जोडी मात्र एकमेकांच्या कडव्या साथीने अखेरपर्यंत मार्ग क्रमीत असते.

काठ किनारे शब्दांचे रसरंग क्षणांच्या कावेडी
पाऊलठसे संमोहरमल मृगजळी तरंगे तन होडी


या सर्व घडामोडींचा घेतल्या जात असलेला अस्वाद शब्दांच्या काठावर सुखद क्षणांच्या कावेडी घेऊन स्थिरावतोय; चिरंजीव होतोय. गतकाळातील संमोहनाचे गारूडासोबत आणि आयुष्याच्या अनाकललीय मृगजळावर ही तन होडी आपोआप तरंगते आहे.


......................अज्ञात


तुमच्या संमोहरमलचा अर्थ मला पुप्याने (पुण्याचे पेशवे) ह्यांनी विचारला होता. मला जशी कविता उलगडत होती त्याप्रमाणे पहिल्या कडव्याचा अर्थ लिहिला होता. आपले विश्लेषण स्वतः कवीचे म्हणून अधिक महत्वाचे, प्रत्येकला काव्य वेगळी अनुभूती देते हे म्हणतात हे खरेच आहे. इथे मी लिहिलेला अर्थ आपल्यालाही कळवावासा वाटला म्हणून देत आहे. पुढील कडव्यांचा अर्थ लिहिण्याची आता गरज नाही. smiley अगदीच त्रासदायक वाटल्यास मोठ्या मनाने माफ करा.
smiley
भोर प्रभाती चंद्रकोर कोकीळ शीळ अन मनकवडी
हळुवार स्पर्श झुळुकेचा लाघव पक्षांची लाडी गोडी
गूढ साद अवती भवताली क्षितिजावर लाली थोडी

पहिल्या कडव्यात अतिशय संयतपणे आणि सूचकपणे उलगडलेला अबोल शृंगार/ प्रेम आहे. हे मला अगदी शब्दांत सांगता नाही यायचे पण प्रयत्न करते. तो शृंगार कधीकाळचा असेल आणि त्याची आठवण असेल किंवा कदाचित आदल्या रात्री एकमेकांसोबत घालवलेली रात्र असेल. भल्या पहाटची फिकुटलेली पण सौम्य तेजदायी चंद्रकोर पाहताना आणि कुठेतरी घुमलेली को़कीळाची आर्त स्वरातली साद कोणाची आठवण मनात जागवत असेल... सभोवतालच्या जगाला विसरुन एकमेकांबरोबर रमलेले पक्षी, पहाट झुळुकेचा पहाटस्पर्श, क्षितीजावर उमलणारी पहाट कोण्या हळुवार स्पर्शाची आठवण करुन देत असेल.

पर्णफुलांवर वसंत सण अंगणभर जगणारी कोडी

अवतीभवती फुललेला वसंत पाहताना एकमेकांसोबत घालवलेल्या क्षणांची पदोपदी आठवण येत असावी - फुलले रे क्षण माझे - नाते कसे फुलत गेले ते आठवत असावे, काही प्रसंगांची संगती, काही न उलगडल्याप्रमाणे वाटलेले अबोल क्षण - जे अजूनही मनामध्ये जिवंत आहेत, ते पुन्हा एकदा मनामध्ये रुंजी घालत असावेत. अंगण हे रुपकात्मक असू शकते. मनाचे अंगण असे.

धन्यवाद.

…. यशोधरा 

No comments:

Post a Comment