Monday, 22 April 2013

अर्धसत्य


मंतरलेली शीळ कुठुनशी
चित्तसदन मन होते मंथर
अंदोलत उलगडते प्रतिमा
झुळुक मिटविते पुरते अंतर

कोष रेशमी लय कांचनमय
रात्र झुलविते रास निशाचर
गोत्र मिरविते मोरपिसांचे
अमानवी संस्कार शिरावर

मिटल्या डोळ्यां-आंत सरोवर
झुरते काजळ उभय तिरांवर
जाग मत्सरी येते अवचित
अर्धसत्य मग होते गोचर

..............अज्ञात


शान्त एकांत. तो स्वतःत मग्न. श्वासांवर लक्ष. सभोवताल नीरव; जगृतीच्या प्रतीक्षेत. अर्धस्फुट पहाट. उजाडू पहातंय.

दूर कुठून कुण्या पक्षाची; नाजुक-हलकी-मायावी शीळ ऐकू येते आणि "एकाग्रतेचं माहेरघर मन" विचलित होतं. हळव्या अंदोलनांमधून अंतर्मनातील सुप्त प्रतिमा उलगडू लागते. दरवळणारी मंद झुळुक; "काल आणि आज" मधलं अंतर मिटवून त्याला गतकाळात घेऊन जाते.

सुवर्णमयी तंतूंनी विणलेली तलम रेशमी क्षणांची लय आणि रात्र झुलविणारी निशाचर रास आठवून; मोरपिसाचं ईश्वरी (अमानवी) गोत्र (कृष्णलीला) शिरावर मिरवू लागतं.

अशा भारावलेल्या अवस्थेत, मिटल्या डोळ्यांत ओथंबलेलं सरोवर; काठांचं काजळ झिजवू लागतं. इतक्यात नियतीचा मत्सर त्याला ह्या अमृतसमाधीतून जागा करतो आणि चरितार्थासाठी जगणारं वास्तव, "दुसरं अर्धसत्य", कर्यान्वित (गोचर) होतं.

........................अज्ञात

No comments:

Post a Comment