Monday, 22 April 2013

कथेच्या विश्वात कथासूत्र गवसताना

विस्मृती आणि आठवणी ह्या दोघांच्या बळावर मणूस जगतो असं मला नेहमीच वाटत आलं आहे.

जगात प्रत्येकाचं आयुष्य, त्याची वाटचाल आणि अनुभवाची शिदोरी वेगळी असते. ज्याची त्याला ती सहज वाटली तरी तिर्‍हाईताला ती नवीनच असते. एखाद्याच्या अनुभवांचा समन्वय आणि अनुनय ह्यातून निर्माण झालेलं साहित्य बहुतांना दिशा दर्शक, कांहींना पुनःप्रत्ययाचा आनंद देणारं, क्वचित कुणाच्या सुप्त भावनांना पुनरुज्जीवित करणारं असू शकतं. अशी निर्मिती, किमान रंजक तरीही उद्बोधक असली तर ती विधायक आणि कुणासाठीही प्रेरक ठरते.

कथेच्या विश्वात वावरतांना, " प्रत्यक्ष घटना, त्यातलं नाट्य, विचारांची गुंतागुंत, तिढा सोडवतांना झालेली दमछाक, संबंधित पात्रांचे स्वभाव, ठळक गुणविशेष, पणाला लागलेल्या विविध क्षमता, यशापयशाचे चढ उतार आणि अंतिम टप्यावर मिळालेला विजय अथवा पराजय," हे सर्वच पैलू महत्वाचे असतात. विजय मिळाला तर त्याची परिणीती 'आनंदात' होते आणि हार पदरी पडली तर त्यातून 'शहाणपण' मिळाते. संकुचित बुद्धीमुळे विजयाचा "उन्माद" आणि अपयशातून उद्भवणारा गंड असे विकृत परिणामही सर्वसामान्य माणसात निर्माण होऊ शकतात. एखादी कथा सांगतांना, लेखकाकडून, वाईटातून चांगलं शोधण्याची प्रक्रिया मांडली जाणं अपेक्षित असतं जेणेकरून प्रतिक्षिप्त भावनिक उद्रेकावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच संतुलीत व्यवहाराचं महत्व वाचकाला पटावं आणि अनिर्बंध क्षोभाचे दुष्परिणाम कळावेत.

आयुष्यात कटु प्रसंग आणि खल वृत्ती यांचं स्थान अविभाज्य आहे. खरं तर तेच चुकलेल्या वा चुकू पहाणार्‍या वाटचालीला योग्य वळणावर आणण्यासाठी रामबाण उपाय असतात, पण ते कसे, हे समजण्याकरिता, त्यांचं जाणीवपूर्वक विश्लेषण करून समाजाला दृष्टी देणं हे लेखकाचं आद्य कर्तव्य आहे असं माझं ठाम मत आहे.

स्पष्टवक्तेपणा   म्हणजे उद्धटपणा नव्हे. स्पष्ट वक्तव्य हे , बहुतेकदा प्रांजळ आणि कटु असलं तरी त्याची अभिव्यक्ती विनम्र असते. उद्धटपणात दंभ आणि माज असतो. अर्वाच्य संभाषण शब्दशः न लिहिणं, एखाद्या कथासूत्रात विद्रोह असला तरी त्यातून उद्रेक होणार नाही ह्याची काळजी घेणं हा सुसंस्कृतपणा आहे. घटना हे वास्तव असलं तरी कथा ही त्या घटनेच्या परिणामांचा उहापोह करून निष्कर्ष काढणारी गुणसूत्री असते. तिने वाचकाला, तुलनात्मक विचारमंथनातून, सकस अनुभूती दिली पाहिजे.

लेखन स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक बांधिलकीचं भान राखणं, नग्न सत्याला सुयोग्य आवरण देऊन वाचकाची कुचंबणा न होऊ देणं , हे प्रज्ञावंत लेखकाचं पथ्य आहे.

एखाद्या लहान प्रसंगाचा एकेक पदर उलगडून त्यातून, लेखक, पथदर्शक तात्पर्य काढू शकतो. गहन तत्वज्ञान मांडू शकतो.

कधी कधी आत्मसंवादात्मक प्रश्न आणि उत्तरे यांच्या कोड्यातून, तो,  वाचकाला आपल्या भूमिकेचा स्वतंत्र विचार करायला  प्रवृत्त करू शकतो.

वर्णनात्मक निवेदनातून शब्दचित्र - अर्कचरित्र रेखाटू शकतो. कल्पनाविहाराने स्वप्नसृष्टी उभी करू शकतो.

मी माझ्या, "बारा बारा बारा रोजी दुपारी ठी़क बारा वाजता प्रकाशित झालेल्या बारा पुस्तकांपैकी", सहा ललित 
लेखनात असा पसारा मांडला आहे..............

१) माझ्या कवितेच्या उत्पत्तीविषयीचा आत्मसंवाद " स्पर्श अस्पर्श "

२) देवाच्या पालखीची एक विशेष दुर्मिळ निर्मिती प्रक्रिया " नाथ पालखी "

३) सृजनात्मक विचार प्रसव आणि कृतीशीलता यांवा लोकानुनयातून झालेला अनोखा संगम " स्मृतिचिन्हे "

४) व्यवसायाच्या वाटाचालीतील खाचखळगे, चढउतर आणि सुगंधी काटे " अनुभूती "

५) आयुष्याच्या रसाळ पर्वाच्या सुखद स्मृतींचा निखळ अस्वाद घेणारी आणि देणारी संहिता " मेघावळ "

६) समाजात वावरतांना प्रसंगानुरूप तत्काळ उमटलेली 'कवितिक प्रतिक्रिया' आणि सोबत त्याविषयीचे सविस्तर गद्य लेखन असे व्यक्त होण्याचे दोन आश्चर्यकारक पैलू दाखवणारे  " अन्वय "

बाकी सहा, वेळोवेळी लिहिल्या गेलेल्या निवडक कवितांचे विषयानुरूप संग्रह आहेत.

प्रकाशित झालेल्या पुस्तकांचं लिखाण विचारांच्या  ओघात बारा बारा बारा च्या उद्दिष्टामुळे होऊन गेलं पण ह्या लेखाच्या निमित्ताने त्या प्रक्रियेचं सिंहावलोकन झालं व एक प्रकारे तटस्थपणे झालेलं आत्मपरीक्षण नोंदवल्या गेलं असं मी म्हणेन.

जाणीव एक कोण्या, बीजापरीस असते
संवेदना फळाची, शाखेस भार नसते
गंधास स्वाद जेंव्हा, परिपक्व फूल होते
शब्दात भावना अन सरितेसमान झरते

त्या ओढ अर्पणाची, समिधा समर्पणाची
व्हावा तृषार्थ कोणी, आकंठ तृप्त ह्याची


सी. एल.  कुलकर्णी
९८२३० ७५५३८

No comments:

Post a Comment