Wednesday, 31 July 2013

आत्मविहीत

एकेक शहारा असा कसा
प्राजक्त फ़ुलांचा वसा जसा
सुमने निर्मळ गंधाळ पवन
अंतरी मदन कावरा पिसा

भावना उरी स्पर्श ही 'न' सा 
लहरी वलये नित सुप्त पसा
संक्रमे रुधिर ज्वर शिखांतकी
क्षण क्षण अनुभव रथ भावुकसा

कामना वेदना आवेदना
हुरहुर वेणा सुख संवेदना
नत लज्जेसवे रत रोमांचिका
ही आत्मविहीत सय स्वप्नांकिका

……………… अज्ञात


Saturday, 27 July 2013

रंजनभ्रमरी

प्राजक्त मनाने झुरलो मी
झरल्यात कळा अनुबंध तळी
मदनाची बाधा भवभोळी
गंधात न्हाइली मूक कळी

चाहूलक्षणांची पागोळी
दंवस्पर्शकोवळ्या अंघोळी
अंगणी श्वेत केशर ओळी
मातीवर ओल्या रांगोळी

अलवार स्पर्श हळुवार उरी
दरवळ परिमळ मन गाभारी
गोकुळी रास रंजनभ्रमरी
वेदना जरा विरल्या दारी

……………. अज्ञात

Tuesday, 23 July 2013

विरंगुळा

नाते नाही मीच एकला
श्वासांमधुनी नाद ऐकला
कान्हा कान्हा बोले राधा
तूच आसरा तू विरंगुळा

कोषामधले उमलू पाहे
गंध आतला दाटुन आला
भेद तरी पण इथला तिथला
तूच आसरा यू विरंगुळा

मंद कशी ही झाली मेधा
अंध मती पथभर मन बाधा
न कळे कोणी का लपलेला
तूच आसरा तू विरंगुळा


........................अज्ञात

Friday, 19 July 2013

अवनी

भिजल्या उरात जखमा सजले नवीन गाणे
वारा उतून वाहे गुंफीत गूढ कवने
ओटीत सांडले जे अस्पर्श स्पर्श लेणे
फुलल्या सयी पुन्हा त्या झाले सुरेल जगणे

अंकूर सुप्ततेचे बिलगूनसे अडाणे
वेडात धुंदलेले नि:शब्द मन शहाणे
आजन्म भुक्त जैसी आसक्त ओल माती
ओढाळल्या गतांचे शब्दाविना तराणे

पवनासवे वराती मेघात सकल पाणी
सहवास लाघवाचा स्वच्छंद मूक वाणी
सुखनैव वेदनांची गर्भारली विराणी
अवनीच की जणू ही दूजी नसे कहाणी


........................अज्ञात

Tuesday, 16 July 2013

शब्द शब्द

शब्द शब्द शब्दातच सारे

शब्द जिव्हाळा शब्द उन्हाळा
वडवानळ जळ शब्द पसारे
एक एकट्या एकांताचे
कूस छत्र घर शब्द सहारे

मुक्या जाणिवा गाभुळ जखमा
आतुर माया शब्द शहारे
नभ संचित आकाश पवन घन
शब्दच वेडे ऋतु झरणारे

खोल ओंजळी लाव्हा अंकित
खुपणारे सल शब्द बोचरे
शब्द उतारा सकल प्रार्थना
आत्म संहिता शब्द खरे


.....................अज्ञात

Tuesday, 9 July 2013

मूळ गझलेच्या स्वैर अनुवादाचा एक प्रयत्न

मूळ गझलेच्या स्वैर अनुवादाचा एक प्रयत्न. गझलेच्या अंगाने लिहिली असली तरी ही निर्दोष गझल नसावी.

क़तील शिफ़ाई  यांची मूळ गजल

अपने होंठों पर सजाना चाहता हूँ
आ तुझे मैं गुनगुनाना चाहता हूँ |


कोई आँसू तेरे दामन पर गिराकर
बूँद को मोती बनाना चाहता हूँ  |

थक गया मैं करते-करते याद तुझको
अब तुझे मैं याद आना चाहता हूँ |

छा रहा है सारी बस्ती में अँधेरा
रोशनी हो, घर जलाना चाहता हूँ | 

आख़री हिचकी तेरे ज़ानों पे आये
मौत भी मैं शायराना चाहता हूँ ||



मूळ गझलेच्या स्वैर अनुवादाचा एक प्रयत्न.
गझलेच्या अंगाने लिहिली असली तरी ही निर्दोष गझल नसावी. 

 हे सखी


हे सखी अधरी तुला शब्दात गुंफू पाहतो मी
आंसवांचे श्वास होऊनी पसभर वाहतो मी

आजवर स्मरले तुला शिणलो कसा मज जाणले मी
आठवावे तू मला आता तरी सुखवेन मग मी

लोपले तिमिरात अवघे यातना उश्वास सारे जाळतो मी
ना दिसे कांही तरीही एकटा आधांतरी फिरतोय बघ मी

एक वांछा तू असावी तेवणारी ज्योत मंगळ ह्या तमी
ओळखीची ओळ व्हावी तू मरण जगवीन मी

............................अज्ञात (१०/०७/२०१३)

Monday, 8 July 2013

आधीन

ओठात माणसांच्या पोटातले उखाणे
मेघात चांदण्यांचे संकेत आड गाणे
आधीन ओघळांच्या वाहे उदंड पाणी
एकांत सागराची पागोळते विराणी

थेंबास थेंब भेटे वाटेत पथिक गोटे
ओसांड अंतराचे पथ सोडुनी समेटे
कधि कुंपणे तळ्याची प्रतिबिंब अंबराचे
साकेत भ्रामकांचे अंदाज थेट खोटे

सारे खरे परंतू हृदयी उलाल कोणी
मातीत सांडलेले उगवे फिरून अवनी
संजीवनी जणू ही गत सुप्त भावनांना
आशा अजून वेडी संदेश हा पळांना


........................अज्ञात