Sunday, 31 August 2014

" कवडसा "

अभंगातले भंगणे क्लेशदायी
कुणाला खुळी माहिती ना कथा ही
मनाची व्यथा अंग अंगात लाही
समस्येस मानवी उताराच नाही

जुन्या भेट गाठीतले स्पर्श देही
संदर्भ काय कोणते कळे न तेही
उगा लाट जैसी परीघात वाही
जणू व्यर्थ येरझार आणि दिशा दाही

मुक्या गुदमराची दशा काळ कोठी
परा दंभ दारूण सजा एक मोठी
कुठेसा कवडसा तरीही फुले अन
फुलारे जसा त्या फुटे शब्द कोटी

……………. अज्ञात




" अवधान "

डोळ्यात न मावे जेही, बघ लोभ सतावे धावे
हाती न लागते काही, मी लेखणीच  व्हावे

शब्दांच्या गर्भकपाळी, माझ्या हृदयीचे ठाणे
गहनी तालावर नाचे, अंतरात भावुक गाणे
मी विरघळलेल्या वेळा, माझे स्वप्नील घराणे
धुंडाळत याचक फिरतो शोधीत सुखाचे नाणे

पाउलांस मखमल सालस मिटल्या डोळ्यांत निळाई
ओघळ गंधर्व क्षणांचे रंगांना सीमा नाही
दिसते मज रोजच ऐसे पण मी निर्लिप्त प्रवाही
स्पर्शूनहि ना स्पर्शाचे अवधान मनाच्या ठायी

………. अज्ञात

Saturday, 30 August 2014

" सहवेदना "

पूर येतो पापणीला श्वास कंठी दाटुनी
दूरही चाहूल ना आकाश भरले पाहुनी
पाउले जड जाहली उलल्या कळा मेघाळुनी
भारल्या संवेदना तळ चालल्या ओलांडुनी

थांबला वारा अचानक शब्द ओठी बांधला
साहवे ना जाळ आता ऊन आले वाहुनी
ऊरवेल्ह्या आठवांच्या पोळलेल्या जाणिवा
पाठ सोडी ना कसा सांगू तयां समजाउनी  ?

का प्रवाही होतसे गाठीतली सल भावना ?
लोपलेल्या मैफ़िलींना का फुटे पान्हा पुन्हा ?
काय गेले राहुनी ना संपते संभावना
घे उरी कवटाळुनी हृदयातली सहवेदना

……… अज्ञात


Friday, 29 August 2014

"ओघ"

वाहून आले चांदणे……
सरल्या कळा आधीनसे आता जिवाचे नांदणे
वाट पाही काठ
केव्हा लाट भरतीची आवेगी हून देइल आंदणे

वेदनेचा हा चव्हाटा
अंगणी व्याकूळसा त्याला खुळे हे सांगणे
ध्यास हेलावे इथे
हे रांगणे सोडून ; घे आलिंगुनी ओसांडणे

ओहटी दारी उभी
घेऊन जाण्या पानगळ नाळेतली डोहातळी
स्पंदते ओली कळी
आतूरतम कोषातल्या गंधाळ देण्या ओंजळी

…………. अज्ञात 

"प्रागाढ"

शिखा ऊर्ध्वगामी मुळे मूळ कामी 
शिरी खोल माया तळी माय भूमी 
उरी जाळ पाताळ डोहात पाणी 
प्रकाशाविना हेच सारे निकामी 

भुतांच्या लिळा साहते हून अवनी 
'जरावेध' घेई ऋतू सावरोनी 
कुणा काळजी वाम वांछा कधी  
जात येते कथा आसमंती फिरोनी 

उणे काय त्याचे कुणी दाखवावे 
तुम्हीत्याच वंशी नव्हे का ? स्मरावे 
उगा दूषणे  देत ना व्यर्थ व्हावे 
प्रगाढातले चिंतनी रंग ल्यावे 

…………. अज्ञात 

"विषय"

दिसे ते नसे; का असे ? गूढ भवती
कशी ऊब ऊर्जा तरी संगती ती ?
उधाणे जिवाचे उफाळे गार्हाणे
व्यथा खोल चित्ती छळे प्राण अंती

परा संचिताच्या कथा कोण वाचे ?
पुन्हा जन्म आहे ? कुठे विश्व त्याचे ?
आहे हे खरे आज; खोटे उद्याचे
फुटे तोवरी हे फुगे माणसांचे

……अज्ञात    

Wednesday, 27 August 2014

"संधी"

वेदना अंगी सुखाच्या चिंतनी होई व्यथा
दूर आहे मूक आहे लाघवी हळवी कथा
"गूढ " ओणवल्या स्वरांचे अंगणी दारी आता
चित्त थारा जाणिवांना वेठते कोणी वृथा

पाश कवटाळून सदनी वेढते लय लीनता
गोफ गुंता वर्धितो प्रतिभेस गुंफुन पाहता
मोहिनी संमोहिनी शृंगारते अनुदारिता
थांबते पाऊल क्षणभर लोपते स्वाधीनता

अक्षरांची मांदियाळी शब्द झिंगवते कधी
खोल सुप्तांशात जाया शोधते संधी मती
स्वस्थ अस्वस्थात झुलते सावली मायावती
रोज पाही वाट ज्याची तो न देई पावती


…………. अज्ञात

"प्रवाही"

कोण कोणाचा असे चाहूल दूजाला नसे
दूरचा प्राजक्त हळवा का जिवा लावी पिसे ?
ओंजळी ह्या प्रांजळांच्या नांदते ओठी हसे
किंचिताच्या चिंतनी लागून जाते वेडसे

आकळे ना स्पंदणे वृक्षांस अंकुरणे जसे
पालवीचे गूढ; त्याचे मूळ ना कोणा दिसे
जेही असते खोल गात्री अंतरी डोही वसे
लाट होते वलय; लेऊन सप्तरंगांची पिसे

श्वास श्वासांचे भुकेले विरह त्यांना आंदणे
वेड वेड्यांचे खुळे शब्दांत त्यांच्या चांदणे
भंगल्या घाटातही असते उरी आनंदणे
भावना प्रतिभा प्रवाही पूर त्यांचे देखणे

……… अज्ञात






Tuesday, 26 August 2014

"गंधर्व कळा"

दूर कोठे धूर आहे अंतरी कल्लोळ का ?
गाज रुधिराची कळे हृदयी उजागर लोळ का ?
कोण साक्षी ? गूढ सारे जुंपले काहूर का ?
तेवत्या ज्योतीतळी अंधार इतका क्रूर का ?

बंधने तोडूनही विवरी दरी सांधेल का ?
अंतरे जोडून का वांछील ते साधेल का ?
त्यापरी झुळुकेस लेऊ अंगणी मिरवू सखा
भूल दरवळ झेलुनी झुलवू सुधा सण सारखा

यातना वा वेदना संवेदनाही पोरक्या
कोण वाली ना तयां वेणा जिवाच्या बेरक्या
जीर्णता त्यांना नव्हे स्वाधीन त्या वेल्हाळच्या
सांगुनी गंधर्व गेले ह्या कळा त्या वेळच्या

........ अज्ञात

Monday, 25 August 2014

"अनुशेष"

पाउले चालती दिशांत शोधीत नाती
वेढून विहरतो वारा मेघांवरती
भरकटते तारू अगणित भवरे पोटी
आकाशी डोळा लावुन बसते माती

वृक्षांस कळे हृदयी शकुनांची नीती
मिटल्या पंखांतुन झाकून घेती भीती
थांबतो पवन जळभारित सवे पखाली
जडते झुरते जीवन ओंजळ्भर मोती

मग तृप्त दिलासा पडतो अवचित हाती
अंतरी उमलती तेवत स्नेहल ज्योती
अंबरातळी भवनी स्मरणे सांगाती
अवशेष; विमल अनुशेष, उजळती वाती

………. अज्ञात  

 


"अधीर"

अधीर डोळे मूक भावना शब्द सांगती भोळे
अनाहताचे साज सोहळे डोहातील वानोळे
युगे साहिली काहिल होउन धुंडाळत पाताळे
वेध वेदना निष्फळ सारे नाळ अंतरी जाळे

दूर चांदवा झुरे एकला सागर तळ पान्हाळे
कळे आकळे नाही काही का मग विणतो जाळे ?
दिशा आंधळ्या स्पर्श आभा; त्या झुळुकेचे डोहाळे
मूढ मती गूढत्व देखणे निराकार ओवाळे

हळवे मार्दव ऊन कोवळे परिघावरती लोळे
स्वस्थ असे काहीच नसे का ? पोत निशेचे काळे
उरी मागते एक कवडसा विवरातिल शेवाळे
मातीच्या भेगाळ कथेने अंबर जळ मेघाळे

………अज्ञात

Sunday, 24 August 2014

"अस्तित्व"


हाय … ती

हाय … ! … तो

कसा आहेस ?…

ठीक …

का ? काय झालं ?…

काही नाही ….

काल झोप लागली ?? …

नाही …

का ????? ….

ध्यास …!!

कसला ?…

गूढत्वाचा … !!
आपल्या दूरस्थ निखळ अस्पर्श नात्याचा   !!
अनाकलनीय संलग्नतेचा …।

सापडलं कांही ?

अं हं ….

मग ?

शोधून पाहिलं चौफेर …
हरल्यागत जाणवलं .....
वाटलं हरवलं सारं आधीच ….

माझंही तसंच झालं अगदी …

हं ……

इतक्यात हालले अन चिमटा बसला खुर्चीचा …

आई गं …

आणि एकाच वेळी दोन आवाज आले कळवळल्याचे …. !!

म्हणजे ??

दुसरा आवाज तुझा होता ……!!

काय सांगतेस ?

हो ना !
मी निरखून पाहिलं….
मी तुझ्यातच होते….
एकरूप झालेले …. !!
कसा सापडणार "कोण"
ते बाहेर शोधून ?

सहवेदना असते / आहे…
मान्य …
तंतोतंत मान्य …
संपूर्ण सहमत …
पण मग ते झोप न लागण्याचं कारण ??

आपणच आपल्याशी कसं बोलायचं
ही अस्वस्थता …. !!

आं ? …….

म्हणून तर नियतीनं मुद्दाम वेगळं केलंय आपल्याला !!…

चतुर आहे …

कोण ??

नियती … !!!!

मोठं कोडं उलगडलं म्हणायचं का ? ….

वाटतं ना सुटलंसं ?….

वाटतंय तर खरं ….

बोल मग …
खूप बोलू या …
साचलेलं सारं काही निवळेल ….
बरं वाटेल …!!

लागेल झोप आता ??

हं लागेल ….

अंतरंगी एक आहोतच आपण
बाह्यांगी पण एक होऊ यात
पुन्हा  … !!

कल्याणमास्तु ….

शुभम भवतु …















स्वरारव

नवी पालवी तांबुस ओली कशी उमलली कळले नाही
बहुधा झाला स्पर्श लतेचा दाह लोपला शमली लाही
अनाकळे किमया नियतीची श्रुती स्वरारव सजले देही
परा रमल संमोहन अवघे दरवळ हलकल्लोळ विदेही

थांग सागरी ऋचा मोकळी लाटेवर स्वप्नांची ग्वाही
शब्द लाघवी सोडुन गेले काठावर भिजलेले कांही
दूर किनारा खळखळला अवखळला शहारला त्या पायी
ओसंडुन झालेले सार्थक पाणी डोळा भरून पाही

…………… अज्ञात 

Saturday, 23 August 2014

"अश्वत्थामा"

भरून येतो ऊर मानवी मेघासम अंधारी
अधांतरी फिरतो वारयावर शोधित दिशा फरारी
क्रमते अन् साकळते दहिवर थकून पहिल्या प्रहरी
स्पर्श तृणी अस्पर्श छेडतो अधिकच गोत उधारी

अक्षरतेचे गहन सरोवर आशय गर्भित खोरी
धृव किनारे परिघ एक पण भेटण्यास त्यां चोरी
भाव बंधने रुधिराची हृदयी रत चंद्र चकोरी
शब्दांची किमयाच अनोखी चाहुल देते दारी

वरपांगी दृक दडलेले पण आत ऋणांची वारी
उन्नत नीतीच्या संभारी व्याकुळते गाभारी
असूनही नसलेले असणे जसे देव देव्हारी
चिरंजीव अश्वत्थामा त्या जगण्याची बळजोरी

....... अज्ञात

Friday, 22 August 2014

"जीवन लहरी"

बेभान नव्हे अवसान हवे गाभुळल्या गाभारी
जाळतील सल; ऋतुचक्र न फिरेल आपसुक  माघारी
वेदना ओढ भिववेल विखारी कधी शूळ बाजारी
जाळीत उन्हे फिरतील अंगभर व्यथा होत संभारी

अवसेचे बळ पुनवेचे तळ पेलून सजू दे वारी
मातीचे झुंबर जडेल वा विरघळेल आणि सरेल बेजारी
ओठात संयमी लाट ललाटी काठ नितळ ऐरावत अंबारी
बिलगून राजसी थाट हवा कांचेच्या दरबारी

उकलून पाहिली मेधा ……

कोषातील हळवे उलते फुलते गंधाळत संसारी
असले नसलेले मूक पणे सजवितात ऊर कपारी
आकाश न येते कधी कुणाच्या हाती अथवा दारी
आपले आपण शोधत फिरते हे जीवन असेच लहरी

……………अज्ञात






Thursday, 21 August 2014

"माया वशी"

साद किमयेची अशी की दूर संधी साकळे
गाज भरतीची जशी छायेविनाही खळखळे
पाश दैवी का म्हणावे ? वा तया माया वशी ?
प्राण छंदी लावते ध्यानी उजागरसे तळे

खोल पाताळी दरी आकाश उन्नत पातळी
ओघ अवखळ ओढ तरिही संथतम डोहातळी
गूढ वलये अक्षरांची छेदताती पोकळी
बाग फुलते रूपगंधित छेडता नस कोवळी

थेंब कमळाच्या दळावर खेळ खेळे ओघळे
स्पर्श अस्पर्शात वाहे गोत त्याचे आगळे
योजना आहे कशी नाते विणूनहि सोवळे
पवन रूपी अंतरी ज्याचे तयासच आकळे

………. अज्ञात


Tuesday, 19 August 2014

"सापेक्षी"

फुलास आशा पंखांची
पंखास पाकळ्या जडलेल्या
दाटून कोष भर अभिलाषा
गंधीत रमण मन वाऱ्याशी
             ओढाळ गती घायाळ मती
             ओघळे मदन अवती भवती
             श्वासास दिलासा स्पर्शाचा
             भावना लगडलेल्या गोती

भंगूर कथा हृदयातील ह्या
भारून अवध काळावरती
चंद्रास पाहता येई जशी
सागरास उन्मळुनी भरती
              आकाश क्षणांचे गोपखळे
              प्रतिबिंब त्याचे सापेक्षी
              रुधिरात निर्झरे अक्षरघन
              भाषा शब्दांची ओघवती

………………. अज्ञात   

Monday, 18 August 2014

चकवा

 कठीण आणि कमाल बोलतेस तू कधी कधी ….
तुला उमजलंय हे मला समजलंय …
तुझ्या शुभ्रतेतली मोरपिसं पाहिली आहेत मी ….
माहिती आहे मला; तू एक चकवा आहेस …. !!

भरकटतो मी वाट नेहमीच … तुझ्यामुळे … !

सापडतेस तू मला धुक्यात कधीतरी दंवासारखी …
साकळतेस विरघळतेस ओघळतेस ……
…। मागे कुठलाही प्राकृतिक पाश न ठेवता …. अस्पर्श !!
पण स्पर्शच  असतो तो झुळुकेसारखा …।
हवा हवासा ….
आशेला चाळवणारा …!!

जाणिवेच्या हळव्या कळा बेमालूम कळतात तुला
काळजाची भाषा जन्मजात अवगत आहे तुझ्या शब्दांना
आंसु आणि हसू यांचं सुंदर मिश्रण आहे त्यांच्या संयुगात
म्हणूनच तेवत असते समई त्यांच्यासाठी मुक्याने
माझ्याही माजघरात ….
निर्लिप्त …!!

……………अज्ञात

Sunday, 17 August 2014

"फेरा"

भरून अंबर मेघ दाटले कुंद जाहला वारा
दरवळ व्यापुन प्राजक्ताचा भिजला परिसर सारा
गूढत्वाचा रमल मनोहर स्वप्नजडित कंगोरा
खोल मनी रस अस्वादाचा अधिर विमल पट कोरा

आसुसलेले निसर्ग वैभव निरलस गोत पसारा
आत काळजाच्या कोषातील सजलेला गाभारा
त्या पूजेस्तव आतुरलेला देह देव देव्हारा
समर्पणी मी नत ; लागावा सकस कारणी फेरा

………………अज्ञात 

Saturday, 16 August 2014

"रिक्त"

आभाळ जाहले मेघाळ
आकाशाशी जुळली नाळ
सजला धजला डंवरला मनी
एकांत निशेचा अभिषिक्त

स्वप्नातिल क्षण झाला मुक्त
गंधाळुन उन्मळले व्यक्त
भिरभिरले जीवन पळातले
देठातुन साकळले रक्त

अंधार निखळला पायतळी
हरवला किनारा भरकटला
ओघळला व्याकुळला रिक्त
कोमेजुन गेला प्राजक्त

........... अज्ञात

Thursday, 14 August 2014

सल

जाणवले नाही सदाही होते जागे
अवती भवताली रक्षणकर्ते काटे
काळात किती ओघळले सालस मागे
विरलेले वास्तव मिठीत घ्यावे वाटे

परतून न येते फिरून कांही कधिही
ओंजळीत घ्यावे भरून ते अन द्यावे
साजरा दिवस जो आला तो सजवावा
ओघात वाहत्या मिसळत असते सारे

सलते सुटलेले चुकलेले ते अवघे
दूरचे सदाही दिसती गोंडस धागे
दृष्टीच सदोषी नीर क्षीर ना उमजे
काळावरती पळ धावे वेगे वेगे

…………अज्ञात