Thursday, 27 December 2012

पिसे

सुखाच्या घडीला निभावू कसे
निळ्या आसमंती शशीचे हसे
नसे स्वप्न हे नाही आभासही
मिटे पापणी ना असे हे पिसे

स्पर्श अस्पर्श खोल आत कोषातले
आस वेल्ह्या नभाचे तरंग वेगळे
ओलवेली तृषा तृप्त परस अंगणी
कोण गाथा रुधीरास सांगते भले ?

मनाच्या अवेळा, मनाच्या कला
भाववेड्या दशा, सोबतीला मला
हून पंखात, वारा भरे पोकळी
झेप घेई व्यथा, भंगवून शृंखला

..........................अज्ञात

Wednesday, 17 October 2012

स्मृतीचिन्ह

वाचनालयातून फोन आला तशी माझी तारंबळच उडाली. "झालं का स्मृतीचिन्ह तयार" !! ????.........
दोन मिनिटं कळलंच नाही; कोण आणि कशाबद्दल बोलतंय ते !..................
कोण ? काय ? कसलं ? कार्यक्रम कधी आहे ?...... माझीच उलटी प्रश्नांची सरबत्ती !...................
कोण सी एल च ना ??... हो हो मीच .... आपण ?.................
मी भरद्वाज रहाळकर, आहो मागे बोलणं नाही का झालं आपलं... पत्रिका छापून आल्यात आणि वाटायलाही सुरुवात झालीय.... परवा कार्यक्रम आहे !!.... ............
हां हां.... आलोच मी ... आहो तुम्ही मॅटर दिलंच नाही... असो... आलोच मी दहा मिनिटांत... सातपूरहून तिथे पोहोचायला जेवढा वेळ लागेल तेवढाच...............
मला सांगितल्याचं; कांहितरी बोलणं झाल्याचं आठवत होतं पण तपशील एकदम ब्लँक होता. स्कूटरला किक मारली आणि पोहोचलो वाचनालयात... बघू पत्रिका... ठीक आहे... हे तपस्वी कोण ? म्हणजे डिझाईनमधे काय काय अपेक्षित आहे... साधारण साईज.. बजेट............
आहो ,"हे वाचनालय आयोजित करतंय, तपस्वी म्हणजे रोखठोक निर्भीड अभ्यासू विद्वान मान्यवर प्रतिष्ठित निरपेक्ष पत्रकार आहेत ज्यांचा दिल्लीतही राजकीय वर्तुळात आतिशय दबदबा आहे. उत्तम लेखक; स्पष्टवक्ते. देवदत्त स्वच्छ शुद्ध स्पष्ट उच्चार आणि खणखणीत आवाजाच्या देणगीमुळे अनेक वर्ष आकाशवाणीवर बातम्या देत असत. त्यांचा अमृतमहोत्सवी नागरी सत्कार आहे. बाकी पत्रिकेत आहेच". कांही अजून हवं असेल तर विचारा...... बजेटला लिमिट तशी कांही नाही. सात ते दहा हजारांपर्यंत करा. अजूनाही थोडं इकडे तिकडे झालं तरी चालेल.
तिथेच त्याच पत्रिकेच्या मागच्या कोर्‍या पाठीवर सुचलं तसं स्केच काढून दाखवलं..........
डिझाईन तुमच्या मनानी करा; तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे पण "एक्स्लुझिव्ह" झालं पाहिजे. परवा संध्याकाळी सात वाजता कार्यक्रम सुरु होईल. दुपारी बाराएक वाजेपर्यंत दिलं तरी चालेल........
तपस्वींविषयीच्या स्वतःच्या अज्ञानाची कीव करत तातडीनं बाहेर पडलो आणि कामाला लागलो. तिथे वाचनालयात काढलेलं स्केच म्हणजे कांहीतरी काम केलंय हे दखवण्याचा, सातपूर ते नाशिक ह्या दहा मिनिटांत सामान्य ज्ञानाच्या अभावाने केलेला एक दुबळा प्रयत्न होता. अशा हलक्या फुलक्या वरवरच्या कल्पनेवर कुठलीच सूचना न करता माझ्यावर पूर्ण विश्वास टाकून रहाळकर निश्चिंत झाले. मात्र त्याने माझी जबाबदारी आणिकच वाढवली आणि ओघाने झोपही उडवली.
हा दिवस तर गेलाच गेला पण दुसरा दिवसही असाच विचार करण्यात गेला. ती रात्र अस्वस्थ मंथनात कशी गेली आणि झोप केंव्हा लागली तेच कळलं नाही. सकाळ मात्र अतिशय अनाकलनीय स्वर्गीय संमोहित उत्साहात उगवली आणि मी तडक फॅक्टरीत चालता झालो.
माझा कुशल कारागीर; त्याला एक मदतनीस देऊन; आलेला कुठलाही फोन मला न देण्याचं सांगून मी बाजूला खुर्ची मांडून बसलो. सुचेल ते सांगायचं, माप काढून द्यायचं, मनासारखं नाही झालं की मोडून टाकायचं. मुंगीच्या पावलाने पण साकल्याने सृजन साकरत होतं.
बारा वाजून गेले आणि फोन येणं सुरू झालं. आमचे वजीर मला फोन न देण्याचे आणि समयसूचकतेने कारणे आणि प्रगती सांगण्याचे "संजयाचे " काम अत्यंत तत्परतेने करीत, अधिर झालेल्यांना दिलासा देत होते.
अमूर्त; आकार घेत होतं. माझ्यासहित कुणालाच पुढे काय कारायचं हे माहित नसूनही एकएक गोष्ट सुचत होती. घड्याळाच्या काट्याबरोबर आमची उत्सुकता आणि कार्यक्रमाच्या संयोजकांची अगतिकता वाढत होती.
पाच वाजून गेले होते. कल्पना आणि त्या अमलात आणण्याचा वेग वाढला होता. वेळेचं महत्व होतं. वाचनालयाचा आणि तपस्वींचा कार्यक्रम असल्याने तो वेळेत सुरु होणार ह्याची सर्वांनाच खात्री होती. शेवटचा एकेक क्षण सोनं घडवत पुढे सरकत होता. साडेसहा वाजता आलेल्या फोनला दिलेलं, " साहेब इथून जाऊन वीस मिनिटे झालीत. ते तिथे बाहेर पोहोचले असतील किंवा ट्रॅफिकमधे सिग्नलला अडकले असतील तर पोहचतीलच" हे उत्तर ऐकायला मी अजून सातपूरला कारखन्यातच होतो....!!
कार्यक्रम ठरल्याप्रमाणे वेळेवर बरोब्बर सात वाजता सुरु झाला होता त्यावेळी मी थिएटरच्या मागच्या बाजूला पोहोचलो. वाट पहणार्‍यांचा जीव भांड्यात पडला. स्वयंसेवकांनी धावत येऊन स्मृतीचिन्ह गाडीतून बाहेर काढलं. मी एका बाजूला उभा राहून; नेहमीप्रमाणे; ते बघणार्‍यांचे चेहरे न्याहाळत होतो. माणसाची उत्फूर्त आणि खरी प्रतिक्रिया फक्त याच क्षणाला दिसू शकते हे मला माझ्या अनुभवांनी आतापर्यंत शिकवलं होतं. (नंतर किंवा विचारल्यावर मिळालेलं उत्तर अथवा केलेलं कौतुक बर्‍याचदा कुणाला न दुखवण्याच्या भावनेतून मुत्सद्देगिरीने दिलेलं असतं.) इतरांसारखाच सहाळकरांचा उजळलेला चेहरा आणि त्या पाठोपाठ त्यांची मला शोधणारी नजर पाहिल्यावर मला कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं. खुणेनीच "टॉप" म्हणून; कार्यक्रमानंतर जेवायला थांबायचं आमंत्रण दिलं. वेळेत; वेळ साजरी झाली होती.
*****************
विद्वान व्यक्तीसाठी आखलेला वैचारिक सोहळा आणि जेवण दोन्हीही उत्तम होतं. स्मृतिचिन्हाविषयीच्या, रंगमंचानी आणि प्रेक्षकांनी केलेल्या कौतुकात मी न्हाऊन निघालो होतो. अनेक मोठमोठ्या मंडळींच्या अभिनंदनात तपस्वी अक्षरशः बुडाले होते. भाषणातल्या त्यांच्या पहिल्याच, " मी मोरेश्वर तपस्वी आपल्याला बातम्या देत आहे" ह्या वाक्याने त्यांची मला खरी आणि सर्वात जुनी ओळख पटवून दिली होती. आम्ही त्यावेळी कल्याणला रहात असू आणि मी जुनिअर के.जी. मधे होतो. सकाळच्या रेडिओवर बातम्या देणारी दोन नावं मी रोज ऐकून त्यांची नक्कल करीत असे. एक " मोरेश्वर तपस्वी आणि दुसरे माझ्या नावाशी साधर्म्य असलेले दत्ता कु़ळकर्णी "!! ते म्हणजेच हे मो. ग. तपस्वी हे मला आत्ता कळलं होतं. !!
आज मोरेश्वर तपस्वी मला माझ्या बाळपणात घेऊन गेले होते आणि मी त्यावेळच्या कुतुहल असलेल्या पडद्याआडच्या, मनात कोरल्या गेलेल्या आवजाच्या व्यक्तीला, तिच्या उदात्त व्यक्तिमत्वाला इतक्या जवळून संभ्रमित अवस्थेत अनोळखीपणाने पहात होतो.
रहाळकरांनी त्यांच्याशी माझी औपचारिक ओळख करून दिली. मी त्यांना वाकून चरणस्पर्श केला. त्यांनी प्रतिक्षिप्तपणे माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला. अशी ओळख म्हणजे; लग्नात करून दिलेल्या ओळखीसारखी; लक्षात न रहाणारी असते; हे माहित असूनही मी भारावून गेलेल्या कांहीशा बधिर अवस्थेतच घरी आलो.
आठवड्याभरात, नि:संकोच मनमोकळेपणाने अत्यंत सन्मानाने माझं संपूर्ण पेमेंट काढण्यात आलं. तपस्वींनी; स्मृतीचिन्हाचं तोंडभारून कौतुक केल्याचं आयोजकांनी मला सांगितलं. मी कृतार्थ ऐकून घेतलं.
******************
एक दिवशी एका ओळखीच्या गृहस्थांनी; जे त्या सत्कार समारंभाला होते; मला रस्त्यात थांबवून; तपस्वींनी माझी आठवण काढल्याचं आणि त्यांना मला भेटायचं असल्याबद्दल सांगितलं. मी ठीकय म्हटलं आणि बोलण्यासाठी एक कांहितरी निमित्त म्हणून हा विषय काढला असावा असं समजून सोडून दिलं. परत एकदा वाचनालयाकडून असाच फोन आला, मी हो म्हटलं आणि कामाच्या रगाड्यात विसरून गेलो. तिसर्‍यांदा कुठल्याशा समारंभात; तपस्वींच्या आणि माझ्या एका निकटवर्तियाकडून जेंव्हा मला तेच सांगण्यात आलं तेंव्हा मात्र हे प्रकरण किती उत्कट आहे हे लक्षात घेऊन लगेच त्यांची भेट घ्ययचं ठरवलं आणि त्यांना फोन केला.
ओ हो हो नमस्कार... आहो किती वाट पहायला लावायची ... किती निरोप द्यायचे.... आज योग आला आहे पहा..केंव्हा येताय ??..... मला तुम्ही केलेलं स्मृतीचिन्ह फार आवडलं आहे आणि त्या संदर्भात तुमच्याशी अतिशय महत्वाचं बोलायचं आहे. .... इतके दिवस दुर्लक्षिलेल्या आमंत्रणाची आस्था बघून, काही कारण नसतांना आपण फार गुर्मीत वगैरे होतो अशी कुणाचीतरी गैरसमजूत झाल्याच्या अपराधी भावनेतून त्याच दिवशी त्यांना भेटायला जायचं ठरवलं आणि गेलो देखिल.
*******************
सायंकाळचे ठीक पाच. ठरलेल्या वेळात राईट टाईम सरांच्या घराची बेल वाजवली. मी आणि माझी बायको; आम्हा दोघांना दारात बघून सरांनी प्रसन्न चित्ताने हसून आमचं स्वागत केलं. त्यांचं संपूर्ण कुटुंबच आमची आतुरतेने वाट पहात असल्याचं एकंदर वातावरणात जाणवत होतं. मला लाजल्याहून लाजल्यासारखं झालं होत. आम्ही वाकुन नमस्कार केला. त्यांना अपेक्षित जागेवर बसलो. (तिथून आम्ही सर्वांना दिसू अशी व्यवस्था असावी, जशी मुलगी अथवा मुलगा बघण्यासाठी केली जाते).
चहा पाणी झाल्यावर, त्यांनी स्मृतीचिन्हाची मनापासून तारीफ केली, खूप आवडल्याचं सांगून म्हणाले की हे सर्व असलं तरी माझ्यातला पत्रकार अत्यंत अस्वस्थ आहे आणि तो मला तुम्हाला भेटल्याशिवाय चैन पडू देई ना. मला तुम्हाला यावर एक प्रश्न विचारायचा आहे, विचारू ? मी आनंदानं म्हटलं जरूर विचारा. हे मी माझं परम भाग्य समजतो की आपल्यासारख्या महान व्यक्तिमत्वासमोर मी बसलो आहे, तुम्हाला माझी कलाकृती आवडली आहे आणि त्याविषयी कांही विचारावसं वाटतंय. कलाकाराला याहून अधिक काय हवं असतं सर......
सरांनी थेट प्रश्न विचारला, " ही सुंदर वस्तू बाय फ्लुक तशी झालीय की त्यामागे तुम्ही कांही विचार मांडलाय ??"....
अर्थातच सर, हे सर्व विशिष्ठ विचारांतीच बनवलं आहे...... मी...........
वाह .... फारच छान .... मला तेच ऐकायचं आहे.... मला हे बघून जे वाटलं तेच तुम्हाला म्हणायचं आहे का ते पडताळून पहायचं आहे......
मी सांगू लागलो........
सर ही "चौरंगावर" मांडलेली "सत्यनारायणाची" पूजा आहे. मागची भिंत गाईच्या शेणाने सारवलेली आहे. तीवर महिरप आहे, ती पांढरा रंग आणि गेरूचा वापर करून चितारली आहे. चौरंगावर एक ग्रंथ ठेवला आहे ती आपली आजवरची तपःश्चर्या आहे. हा ग्रंथ उघडा आहे आणि त्यात बुक मार्क आहे. झालेला भाग ७५ % आणि उरलेला २५% आसा आहे कारण हा "अमृत महोत्सव" आहे आणि "शतक" अपेक्षित आहे. बुक मार्क चांदीचा आणि त्यावर मोर आहे जे "सरस्वतीचं वाहन" आहे. ग्रंथाखाली चौरंगावर मध्यभागी "ज्ञानकमळाची (त्याला ब्रह्मकमळ वा गायत्री यंत्रही म्हणतात)" रांगोळी आहे जी आपलं सर्व कर्तृत्व हे "ज्ञानाधिष्ठित" असल्याचं सुचंवतं. ग्रंथाजवळ भिंतीशी एक "दीपस्तंभ" उभा आहे ज्यावर मार्गदर्शक चांदीचा "लामणदिवा (नंदादीप)" आहे. स्तंभाच्या पायथ्याशी आपली कारकीर्द लिहिणारी "सोन्याची दौत त्यात चांदीच्या पिसाची मृदु लेखणी" आहे. मागे सारवलेल्या भिंतीवर डाव्या कोपर्‍यात "सूर्य", उजव्या कोपर्‍यात "चंद्र" आहे. आपल्या लिखाणाची ऊर्जा सूर्याकडून चंद्राकडे- चंद्राकडून लामणदिव्याकडे-दिव्याकडून दौत आणि लेखणीला मिळाली आहे जी "यावच्चंद्रदिवाकरो" अशीच आहे. भिंतीवर चार ओळी उधृत केल्या आहेत जी आपली वचने आहेत.
"श्रीगणेशायनमः,
श्रीगुरुभ्योनमः,
श्रीसरस्वत्यैनमः,
श्रीपत्रकारितेनमः."
मी माझ्या तंद्रीत अस्खलित एकेका मांडणीचे संकेत सांगता सांगता सरांचा प्रफुल्लित होत चाललेला चेहरा वाचत होतो.
माझं सर्व सांगून झाल्यावर अतिशय आनंदाने आणि अभिमानाने विजयी अविर्भावात एकवार त्यांच्या कुटुंबाकडे आणि माझ्याकडे कौतुकाने पहात सर म्हणाले, वाह .... फारच छान..... अगदी माझ्या मनातलं वचल्यासारखं बोललात..... तिथे कार्यक्रमाच्या गर्दीत मला नीटसं बघता आलं नाही. घरी आल्यावर मी त्याचं मनापासून निरिक्षण केलं आणि माझ्या मनात उमटलेले तरंग कागदावर उतरवून काढले. ते आणि तुमची संकल्पना पडताळून पहाण्यासाठीची तळमळ आता शांत झाली.
सरांनी, रचलेले वर्णन माझ्या समोर ठेवले, ते शब्द असे :-
चार वेदांचा चौरंग
वरी ब्रह्मकमळ रेखिले
ज्ञानाचे हे अधिष्ठान
जणु वेदांग जाहले
ज्ञानकमळा शोभती
दळे चोवीस रेखीव
चोवीस नामांनी जणु
पूजितात विष्णुदेव
सर्व साज रेखाटला
जणु आळल्या रेखांनी
वनवासी कुटीमाजी
कला साकारे नमनांनी
उभी शारदा अमूर्त
मूर्त सर्व करणांनी
काजळाच्या लख्ख पात्री
मृदु पिसाची लेखणी
मृदु लेखणी निर्मिते
ग्रंथ सधन कठिण
दीपस्तंभी नंदादीप
स्फूर्तिदाता नारायण
मानपत्र सांगे 'जर
अधिष्ठान, कर्ता,करण
ठाम, विराम ना यत्ना तर
दैव होतेच प्रसन्न'
म्हणे 'पत्र महर्षी ' झाला
कसली ना धरिता आस
नित्य साधना चालावी
' पांडित्याचा ' नको सोस
या स्मृतीचिन्हातून
मिळो अक्षय प्रेरणा
होवो शारदा सुप्रसन्न
रेखोनी विक्रम-चिन्हा
...............मो. ग. तपस्वी
१२ डिसेंबर १९९८
***************
tapasvi trophy.jpg
असं हे "स्मृतीचिन्ह" पुरस्कर्त्याच्या प्रभावाच्या पुण्ण्याईने उमललेलं.
दोघांच्याही स्मृतीत राहिलेलं.
व्यावहारिक अर्थापेक्षा कितीतरी अधिक मौल्यवान.
व्यापारी कल्पनांना छेदून विशेष आत्मिक समाधान देणारं.
प्रामाणिक तपस्या स्वतःहून फलद्रुप करणारं.
जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांचा व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यावर ठसा उमटवणारं.
माझ्या कलाकृतीची आठवण माझ्या पश्चातही चिरंजीव जपणारं.
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या पुढच्या प्रवासाला प्रेरणा, स्फूर्ति, बळ आणि आत्मविश्वास देणारं.
***************

Friday, 14 September 2012

घनघन

घन मंदावले मन धुंदावले
जळ वाकून वाकून ओघळले
झाकलेल्या कळा आत ओढाळल्या
रंग हिरव्यात दाटल्या ऊन सावल्या

झाडपानात सण पळ श्रावण श्रावण
अंग अंगणात चाहुली पागोळल्या
लवे भरून डोळा कणकण हळवेला
एक एकटाच जीव होई खुळा बावळा

पापणीची स्थिती आळवावी किती
ओठ शब्दांसवे चहु ओर नाचती
नागमोडलेली वाट चिंब ओला घळघाट
नव्या नवरीचा थाट जणू हीच पावती


.........................अज्ञात

Sunday, 2 September 2012

आर्त

आर्त आहे अंतरीचे जाहलो व्याकूळ मी
भावना लंघून गेल्या प्रीतओल्या संगमी
सावल्या बेधुंद झाल्या कुंद छाया घनतमी
समजले उमजे परी ना प्राण माझे संभ्रमी

गोत हळवे व्यापलेले व्याध सावज उभय मी
गुंतले पाशात दोघे पोत अवघे रेशमी
दाखवे उसवे न कोणी गाठ त्यांची संयमी
वाटकाठांची फुले ही बहर त्यांचा मोसमी

..........................अज्ञात

Thursday, 30 August 2012

वळवथेंब

एक थेंब वळवाचा
अंकुर पुन्हा उजवेल
खपलीखालच्या वळणापाशी
नवा श्रावण हिरवळेल

पाउलवाटांचं काय
पाऊल पडेल तिथे वाट सापडेल
अवखळ खळखळणारं पाणी
ओंजळीत साकळेल

आकाशही मावेल मग त्यात

रुसलेलं गावेल
निर्व्याज पावेल
मावळतीच्या संध्येकाठी
चंद्र चांदणं हसेल


..................अज्ञात

Tuesday, 14 August 2012

अवचित

झुलले मार्दव झरल्या अगणित; झुळझुळल्या पागोळ्या
एकांती निश्वासांचे झाले अवचित स्वर गोळा
ओठात कुणी पोटात कुणी हृदयात सजविल्या कुणी गंधमय रांगोळ्या
अपघातच हे सुखस्वप्नांचे गतकाळाची ही शाळा

रे कुणी बांधले झोके विसरुन वास्तवातले धोके
वडवानळ झाली पाणी जाळित अंतरातली ज्वाळा
पुंकरले बावरले आठवल्या निखार्‍यातल्या वेळा
पावलांत घुटमळले भिजलेले मन कातर वय सोळा

..........................अज्ञात

Friday, 10 August 2012

रेशमी

स्फुंदणे कोंदणे कोंडलेल्या स्वरांचे
मुके; बोलके आज झाले कसे
मिळाली दिशा बंद वार्‍यास जेणे
उधाणून आले जिणे देखणे

एक होता निखारा उरी कोवळा
स्नेहवातीपरी जाहला मोकळा
साचलेले उतू वाहिले अन तराणे
झणी भंगला दाटलेला गळा

रेशमी कोष अंगी तया लाभले
रोमरंध्रातले क्लेश आलोचले
व्यापलेल्या गळाल्या उणीवा कळा
रास राशीत नाचला कृष्ण सावळा


....................अज्ञात

Monday, 6 August 2012

अनंग

सुगंधी क्षणांचा भोक्ता अनंग
उरी रात्र गाते अरूप अभंग
तरी भुक्त प्राजक्त पायांतळी
चिंब व्याकूळ; देही लपे अंतरंग

सुखासीन माझी कथा पोळलेली
व्यथा रोमरंध्री उगा पाळलेली
जरी मोकळे दृष्य आनंद माझे
तळी दाट रंग; पृष्ठी तरंग

...................अज्ञात

Wednesday, 1 August 2012

शब्दसावल्या

आलाबाई एकदाचा पाऊस तुझा,...
सैरभैर एकांत माझा,..
झिंगल्या वाटेत सयी सावळ्या-
थेंबाथेंबात डोलु लागल्या बाहुल्या

श्वास रुंदावले गोत नादावले
पावलो पावली चाहुली पावल्या,..
साचलेले तळे जाहले मोकळे-
अंगणी सांडल्या मुक्त शब्दसावल्या


...............अज्ञात

Monday, 16 July 2012

संजीवक

खुळी दालने प्राजक्तासम उलटुन गेली पाने
फुलली राने; गूढ नभातिल झरले आषाढाने
आभाळातिल गोत उतरले; धुके दंवात नव्याने
भुलले अंकुर; पक्षी किलबिल आरव एक रवाने

मुके तेवढे सरलेले पळ संजीवकसे मेणे
अश्वासक संवाद कळ्यांचे स्नेह भारले गाणे


.....................अज्ञात

Thursday, 5 July 2012

खंड कपारी

अभिषेकाचे ओढे नाले
वाहुन गेले माघारी
शिरी बोडके उरले कातळ
हिरवळ सुकली संसारी

तळी साचले मुके सरोवर
किमया प्रतिबिंबित सारी
अगणित लेणी खंड कपारी
दिसल्या मजला गाभारी

काठ किनारे भिजलेले
आकाश पृष्ठ्भर निजलेले
रंगात निळ्या लहरींवरती
पवनाचे स्पर्श पहुडलेले

जड एक कोपरा माझाही
काळजात काहुर दडलेले
कजळरात्री अंधार नभी
चांदणे भ्रमात विखुरलेले

.........................अज्ञात

Sunday, 10 June 2012

निराकार

आलो वेस ओलांडून देह जन्म त्वा वाहून
आले गेले निरोपाचे रोप अंगणी वाहून

करू पाहिला संसार ऐहिकाचा मुका मार
पळ पळालो बेजार नाही फिटला अंधार
रूप निरूप आकार विरूपाची सोंगे फार
जेहि देखणे पाहिले नाहि भेटला आधार

जळू गेली माया काया छेडली अंगी शततार
राहिल्या न पडदे भिंती दिसू लागले त्या पार
क्षणाची उसंत बेतली उलगडले घन संभार
घरटे उसवून उघडले उजेडास मिटले दार

सुटे मोकळे आकाश जीव आता,.. विना पाश
झिंग निराकार अशी ही नको पुन्हा उसने श्वास
शेवटास आरंभाची चिरंजीव वेडी आशा
राहुदेत ध्रुवापाशी अशी चंदनी आरास

.........................अज्ञात

Tuesday, 5 June 2012

पागोळी

घन; वेस ओलांडून
आला सोनियाचा सण
धुळवड आकाशात
ऊर घगर भरून
      झरे रेशमाचं पोत
      सारे दारूण झाकून
      रोमरोम शहारून
      गाई अंकुरात धून

थेंब थेंब फुटे वाळा
वारा शकून पिऊन
झिंग ओलेत्या मेघाची
सय सय उधाणून
       सरे चातकाचे ऋण
       मोर माना उंचावून
       भिजलेल्या अंगणात
      मन पागोळी होऊन

.........................अज्ञात

Monday, 4 June 2012

खंड कपारी

अभिषेकाचे ओढे नाले
वाहुन गेले माघारी
शिरी बोडके उरले कातळ
हिरवळ सुकली संसारी

तळी साचले मुके सरोवर
किमया प्रतिबिंबित सारी
अगणित लेणी खंड कपारी
दिसल्या मजला गाभारी

काठ किनारे भिजलेले
आकाश पृष्ठ्भर निजलेले
रंगात निळ्या लहरींवरती
पवनाचे स्पर्श पहुडलेले

जड एक कोपरा माझाही
काळजात काहुर दडलेले
कजळरात्री अंधार नभी
चांदणे भ्रमात विखुरलेले

.........................अज्ञात

उत्सव

स्वच्छ किनारी हिरव्या दारी
नभी खगांची सोनभरारी
आकाशी विरघळे चांदवा
दिवस; उषेच्या दरबारी

पुनव जशी; शीतल अंबारी
स्वप्न पापण्यांच्या मखरी
ओतप्रोत गाण्यांच्या लहरी
जळ; प्रतिमेच्या गाभारी

गोड पिसे स्वच्छंद अंबरी
दिसे दूरचे जवळ उरी
उत्सव हा जुळल्या धाग्यांचा
रोज असावा संसारी

.............................अज्ञात

Tuesday, 29 May 2012

दूर-आशा

पापण्यांचे सोस माझ्या पंजरी बिलगून हे
अंतरी ओल्या खळ्याचे श्वास अजुनी नागवे
अंकुरे खडकातही; ध्यासातले आलेख हे
खोल रुतलेले; कळे ना कोण संधी जागवे

ओतणे निर्व्याज पाणी आणि अगणित जोगवे
थेंब थेंबाचा उसासा शार माती जोजवे
गुदमराला एक रेषेचे उताविळ घर नवे
दूर-आशा गात येई कोंब घेउनिया सवे

.................................अज्ञात

Thursday, 24 May 2012

पाणउतारा

खार्‍या निरुपयोगी अथांग समुद्रातला थेंब !,
आदित्याच्या ऊग्र तेजात तावून सुलाखून शुध्दोदकाचा प्राण होऊन वरुण दरबारी रुजू होतो. मध्यतळातून काठापर्यंत; आकाशाला वेधत उसळणारा अस्वस्थ जीव, हुरळून जातो मेघात. सीमाच नसते त्याच्या फिरण्याला आता. ऊन सावल्यांच्या खेळात निरनिराळी रुपं धारण करू शकत असतो तो, स्वैरपणे, खोल निळ्या आकाशात. पंखांबरोबर सात रंगही मिळालेले असतात त्याला उधळ्ण्यासाठी, वरदानात. अंत नसतो दिशांना. वार्‍याच्या खांद्यावरून वहातांना, आधाराशिवाय तरंगतांना, किनार्‍याशिवाय पिंजतांना, प्रयत्नांशिवाय उसळतांना, त्याला विसरायला होतं स्वतःलाही.
एके दिवशी वाराच थांबतो वहायचा आणि प्राण कोसळू लागतो खाली - पृथ्वीकडे; पुन्हा अनिर्बंध वेगाने. धडपडीत आदळतो-दळतो-गडगडतो-जळतो-कडकडतो, चमकून बघतो तो काय !!.., एका प्रचंड पर्वताने रस्ताच आडवलेला असतो पुढे जाण्याचा. त्याच्या भरकट्ण्याला लगाम घातलेला असतो पूर्णपणे.
आज त्याला प्रथमच जाणीव होते त्याच्या निर्जीव्-निष्प्रभ अस्तित्वाची. गरजेपोटी गरज निर्माण होते सावरणार्‍या आधाराची; अडचण झेलण्यार्‍या मातृत्वाची, निश्चित आणि योग्य दिशा दाखवणार्‍या दातृत्वाची. तो डोळे गच्च मिटून घेतो आणि धावा करतो माहेरचा; पुन्हा कुशीत घेण्यासाठी.
पाऊल टेकताच जमिनीला झालेला आनंद, स्पर्शात उमललेला शहारा तो अनुभवत असतो. असमंतात दाट भरलेला सुगंध, त्याच्याशी इतरांच्या असलेल्या रुणानुबंधांची आठवण करून देत असतो. अशातही तो वहात सुटतो; वाट फुटेल तिथे आणि त्याला आधार मिळतो काठांचा, माहेरचा रस्ता दाखविणार्‍या दुथडीचा,- न मागता.
त्याच्या आणि इतर प्रवाहांच्या विसंगतीतील सुसंगती त्याला उमजलेली असते एव्हाना. म्हणून, सर्वच सोबत्यांना बरोबर घेऊन जाण्याचा अट्टाहास; किंवा ते आपल्या बरोबरीने चालू शकत नसल्याबद्दलचा उपहास, त्याच्या हातून कधीच गळून पड्लेला असतो खोल डोहात.
पंचमहाभुतांच्या प्रचंड ताकदीपुढे; मोहात भरकट्लेल्या आयुष्याला; निस्वार्थ सावरणार्‍या दोन्हीही तीरांच्या मैत्रीची तीव्रता किती अधिक आहे याची प्रचिती वेडावत असते त्याला कृतज्ञतेने.
काठांमुळे तो आणि त्याच्यामुळे काठ म्हणूनच समृध्द होऊ शकतात / होऊ शकलेत युगे युगे.
"प्रवाह असो वा काठ, एकमेकांना पूरक; असे विश्वास हवेत श्वासांना,"ही जाणीव असणे महत्वाचे.
परमेश्वराजवळ सर्वांची हीच प्रर्थना कायम असो की, "जीवनाच्या,-उसळलेल्या,-घुसळलेल्या,-भोवरलेल्या प्रवाही वेदना पेलण्यासाठी; प्रत्येकाला सदाही सुफळ, समृध्द आणि सतर्क काठ मिळोत जन्मो जन्मी."
हव्यास जडो सहवासाचा
अश्वासक झुरत्या काठांचा
रंध्रांस मिळो आसीम गारवा
श्वास अमृताचा
रे जगणे शिवाय पात्र किनारे
व्याकुळ क्षेम विसावा
जुळे तराणे खुळे जरी
साकळ हा प्रेम असावा
....................अज्ञात

त्या

तो तीन वर्षांचा असेल. चुणचुणीत, गुटगुटीत, खोडकर. कल्याणला रहायचा स्वामीनारायण बिल्डिंगमधे; अहिल्यादेवी चौकात; तिसर्‍या मजल्यावर; कीर्तनेंच्या शेजारी. सुसंस्कृत-सुशिक्षित-रूपवान-मेड फॉर इच अदर दांपत्याचा पहिला मुलगा.
रमायण, महाभारत, इसापनीतीच्या सुरम्य सुरस बोधकथा घरी होतच असंत पण प्राथमिक शिक्षण संस्कारांसाठी त्याला बालवाडीत घतला होता.
माड-नारळ झावळ्यांच्या कोंदणात वसलेली शाळेची टुमदार कौलारू वास्तू घराच्या गॅलरीतून दिसत असे. शळेची घंटा, प्रर्थना ऐकू येण्याइतपत अंतर असलं तरी जाण्यायेण्याचा रस्ता रहदारीचा असल्यामुळे त्याला नेण्याआणण्यासाठी मुलगी ठेवली होती. गोरी; सडपातळ; लांब केसांची. हसली की खळ्या उमलायच्या दोन्ही गालांवर. तिच्या बरोबर शाळेत जायला स्वारी खुष असायची. तिचा हात धरून चालत चालत त्याचे ते दिवस अत्यंत आनंदात चालले होते.
एक दिवस ती अचानक दुपारी घरी आली. तो अत्यानंदाने तिला जाऊन बिलगला. तिचं घरी येणं खूपच अनपेक्षित होतं. रोज आई त्याला खाली रस्त्यापर्यंत सोडायला आणि घ्यायला जात असे. त्याला गॅलरीत खेळायला सांगून, त्याची आई आणि ती, बराच वेळ बोलत होत्या. नंतर आईने तिचे चहापाणी करून तिला पैसे दिले आणि ती निघाली. तो कितीतरी वेळ; ती दिसेनाशी होईपर्यंत आईच्या पायांना लपेटून; तिच्यावरची नजर हटू न देता; हर्षोल्हासाने तिला अच्छा करत होता. ती पण मागे वळून बघत नजरेआड झाली होती. त्या वेळी तिच्या पापणीच्या कडांवर पाणी चमकल्याचा भास त्याला झाला होता.
त्यानंतर आठवडा पंधरा दिवस त्याची आईच त्याला शाळेत सोडायला गेली. तो रोज; तिची आठवण काढत आणि उद्या येईल या आशेवर स्वतःची समजूत घालत असे.
एका सकाळी आई खालपर्यंतच आली आणि त्याला नव्या मुलीच्या ताब्यात दिले.
आईची चिंता मिटली होती...............
......... आज आई का शळेत आली म्हणून त्याला आश्चर्य वाटलं होतं. ती बराच वेळ मुख्य बाईंच्या ऑफीसमधे बोलत होती. तिथे त्याला शाळेत ने आण करणारी नवी मुलगी पण होती. बाई तिला रागवत होत्या आणि ती; डोळ्यात पाणी आणून; तिची चूक नसल्याबद्दल कांही तरी सांगत असल्याचं तो दुरून बघत होता. आई पण रागावल्यासारखी वाटत होती. तो आज आईबरोबरच घरी आला.
येतांना त्यानं आईला तिच्या रडण्याबद्दल विचारलं. रस्त्यानं चालतांना तिचं त्याच्याकडे लक्ष नसतं, ती एका बाजूला तर तो दुसर्‍या बाजूला असं बाईंनी पाहिलं होतं आणि ते सांगायसाठीच त्यंनी तिला आणि आईला शळेत बोलावलं होतं. तिच्या ह्या बेजबाबदारपणाबद्दल कामावरून काढून टाकल्यामुळे ती रडत होती.
त्याही वयात त्याला खूप अपराधी वाटलं आणि त्याने आईला सांगून टाकलं की त्यात तिची कांहीच चूक नाही, तिनी हात धरू नये म्हणून तोच तिच्यापासून दूर पळत होता.
आता तर परिस्थिती अजूनच वाईट झाली होती. त्याच्या अशा वागण्याचं मूळ शोधण्यासाठी त्याचीच उलट तपसणी सुरू झाली. आपल्यामुळेच त्या गरीब मुलीवर अन्याय झाला या भावनेने आई अस्वस्थ झालेली आणि हा कांही केल्या कारण सांगायला तयार नाही. याचं पर्यावसान इतकं विकोपाला गेलं की आईचा तोलच सुटला आणि तिने त्याला खिडकीच्या गजाला उलटं टांगून वेताने फोड फोड फोडला.
त्याचीच खरी कमाल; हूं नाही की चूं नाही. जेवणही नाही. आई पण जेवली नाही. हा रडून आणि आई थकून तशीच झोपी गेली. तिन्हीसांजेला आई दचकूनच उठली. तो तसाच खिडकीला टांगलेल्या अवस्थेत झोपलेला होता. ते पाहून आईचं काळीज हेलावलं. एव्हाना ती शांत झाली होती आणि संतापची जागा हळवेपणानं घेतली होती.
कोवळ्या जिवाला इतकं निर्दयीपणानं मारल्याबद्दल ती कळवळली पण होती आणि कारण न कळल्याने व्यथितही होती. तिच्या विकल व्हृदयातले मायेचे बांध फुटले होते. त्याच्या अंगावरचे हिरवे-निळे व्रण कुरवाळत अखंड पाझरत होती ती किती तरी वेळ. दोघंही एकमेकांकडे केविलवाणे बघत होते, तो " नको ना विचारूस " म्हणून आणि आई, " सांग ना रे; नको अंत पाहूस" म्हणून.
आईचा विव्हळ त्याला कळत होता पण----
" गरजेपोटी भांडी घासून ओशट झालेल्या तिच्या खरखरीत हातांच्या नकोशा स्पर्शाबद्दल आणि तिचा कांहीही दोष नसलेल्या पण तिला जन्मजात मिळालेल्या काळ्या कुरूप दिसण्याबद्दल " त्याला कधीच कुणाजवळ बोलायचं नव्हतं.
त्या दोघींच्याही स्मृती, आजही त्याने तशाच जपून ठेवल्या आहेत.
.........................................................अज्ञात

प्रेझेंट

त्या दोघी नादावल्या होत्या आई-बाबांच्या लग्नाच्या पंचवीसाव्या वाढदिवसाला कांहीतरी वेगळं धमाल करायचं म्हणून. मोठी नुकतीच एम्.सी.एस. झाली होती आणि धाकटी आर्किटेक्चरला चौथ्या वर्षाला होती. आई कलाकार / चित्रकार; चित्रकलेचे वर्ग चालवीत असे. बाबा मुंबईला मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर नोकरी करीत. ते कायम फिरतीवर असत. पूर्वी शनिवार-रविवार दोन दिवस सुटी असे पण आता एकच दिवस असल्याने फक्त रविवारी ती चौघं घरी एकत्र भेटू शकत. घरात मुलींचे देवतुल्य आजोबापण होते. ह्या चौकोनी सुखी सुसंस्कारित कुटुंबाचे दोन कोपरे मुलींचे होते. मुलीच त्यांची मुलं होत्या.
आई-बाबांचा; म्हटलं तर प्रेमविवाह होता किंवा नव्हताही. एका कलाक्षेत्रात काम करणार्‍या संस्कृतिक संस्थेत दोघांची चांगली ओळख होती आणि त्यांना विवाहबंधनात अडकवलं त्यांच्या मित्रांनी.
अत्यंत साध्या, सर्वसाधारण परिस्थितीच्या कुटुंबांच्या संगमापासून; आज उच्च मध्यमवर्गीय टप्प्यापर्यंतच्या वाटचालीचा आलेख मांडावा असा घाट दोघी मुलींनी घातला होता त्यांना सुगावा लागू न देता.
त्या दोघांचं लग्न लावून देण्यातला शिलेदार आणि आजपर्यंतच्या त्यांच्या संसाराच्या वाटचालीचा 'तो' एक जवळचा सक्षीदर होता. फोटोंचं प्रोजेक्ट; गोपनीयता जपून; प्रत्यक्ष उतरवणारा 'तो' त्यांचा उजवा हात होता. कल्पना, संकल्पना, कल्पना विस्तार, संकलन, स्कॅनिंग, डिझायनिंग, प्रिन्टिंग इ. सर्वच गोष्टींसाठी तो आणि त्याचं ऑफिस उत्साहानं भिडलं होतं.
इकडे ही तयारी चालू असली तरी घरात तशी कसरतच चालू होती. नूतनीकरणाच्या कामामुळे वरचा मजला पूर्ण रिकामा करून सर्व सामान खाली आणि शेजारच्या इमारतीतल्या एका रिकाम्या फ्लॅटमधे विभागून ठेवल्याने विस्कळीत झालेलं होतं. जवळच्या कुण्या नातेवाईकाकडे कसलसं मंगल कार्य असल्याने पहुण्या-राहुण्यांचा वर्दळ होता.
धकटीची वार्षिक परीक्षा; त्यात भरीस भर म्हणून आजोबांची तब्येत अचानक खराब झाली आणि त्यांना हॉस्पिटलमधे ठेवावं लागलं. संपूर्ण घर यांत्रिक धावपळीमधे अडकून गेलं होतं.
मोठी वेळात वेळ काढून त्याच्याकडे चालू असलेल्या कामाशी संपर्क ठेवून होती; पण मनात योजल्याप्रमाणे पुरेसा वेळ देणं दोघींनाही अशक्य झालं होतं. याही परिस्थितीत त्यांनी; सर्व नातेवाईक आणि आई-बाबांच्या मित्र -मैत्रिणींना, आई-बाबांविषयी अनुभव आणि आठवणी लिहून पठविण्यासाठी संपर्क केला होता. फोटोंबरोबर एक हस्तलिखित खजिनाच सादर करायचा होता त्यांना. सर्वांच्या मनातले आई-बाबा उलगडून बघायचे आणि दाखवायचे होते त्यांना आणि इतरांना.
आजोबांच्या आजारपणाच्या सावटाखाली साधेपणाने "सिल्वर ज्युबिली" साजरी झाली. "सरप्राईज" हे खरोखरंच अनपेक्षितपणे; सद्य परिस्थितीत; उत्सवमुर्तींवर, आठवणींचा, जिव्हाळ्याचा, मुलींच्या लाघवी प्रेमाचा शिडकावा करून गेलं. संपूर्ण वातावरण , त्या रात्रीत , सद्गदीत भारावलेल्या अवस्थेत स्वप्नागत गुडुप झालं. सर्वांनाच कृतकृत्य वाटलं. दोन टेबल कॅलेंडर्स, दोन वॉल कॅलेंडर्स, दोन अनुक्रमे तीन फूट व चार फुटाचे वॉलपिसेस, समारंभपूर्वक मुलींनी आपल्या आई-बाबांना दिले होते. त्यांच्या आयुष्याचा कोलाज त्यांच्या सुपूर्द केला होता.
कार्यक्रम झाल्यावर मुलींना मात्र उगाच रुख रुख लागून राहिली की त्यासाठी त्या पुरेसा वेळ देऊ शकल्या नाही आणि सर्व 'त्या' काकालाच करावं लागलं म्हणून. खरं तर काकाला त्याचं कांहीच वाटलं नव्हतं कारण तो त्यांना त्यांच्यापासून वेगळं मानतच नव्हता.
पाचच दिवसांनी मोठीचापण वाढदिवस होता. काकाने तिचाच डाव तिच्यासाठी वापरला. तिला आवडणारे झाडफुलांचे आणि तिला माहित नसलेला तिचा स्वतःचा एक छान फोटो, प्रत्येकाच्यामागे समर्पक काव्यपंक्ती लिहून एक संग्रह करून पाठवला. यातूनच तिला तिच्या आईबाबांच्या भावनांचा अंदाज आला होता. तसा तिचा फोन आला होता; या सर्वांपुढे नि:शब्द झाल्याबद्दलचा.
इकडे तो पूर्ण बुडाला होता भावनेच्या पुरामधे. एकटाच असल्याने अशी भारवलेली अवस्था कुणाशी वाटून पण घेऊ शकत नव्हता. एकटाच स्फुंदत होता सर्वांचे आश्चर्यमिश्रित कौतुकाने ओसंडत असलेले आनंदी चेहरे आठवून आठवून. त्याचा आनंद तोच होता. खूप श्रीमंत वाटत होतं त्याला आज. ऐश्वर्य उन्मळत होतं त्याच्या आनंदाश्रूंतून एकांतात. जीव गुदमरत होता भावनांच्या ओझ्याखाली. बांध फुटला होता. चांगुलपणाच्या सीमाच सहन होत नव्हत्या त्याच्या वहाण्याला. आवरणं अवघड झालं होतं. त्या दिवशी संध्याकाळी त्यानं नेहमीप्रमाणे वाढदिवसाचं; तिच्या घरी जाऊन अभिनंदन करणं, टाळलंच. बाहेरही कुठे रमण्यासाठी त्याचं लक्ष लागलं नाही. तो कधी नव्हे तो रात्री आठ वाजताच झोपी गेला गुंगलेल्या मनस्थितीत.
विसरला, आता येत नाही असं गृहित धरून अखेर रात्री अकरा वाजता गुड नाईट चा एस एम एस आला. बीप ने जाग आली. अस्वस्थपणाने मात केली. फोनवर फक्त गुड नाईट म्हणून त्याने आपली अवस्था लपवली. त्यात ती रागावली नसल्याची दोन वक्य त्याने ऐकली. जिवाची ऊल घाल करत पहाटे सडेतीनला सकाळ उगवली.
ती ऑफिसला जाण्याच्या आत त्याने तिला घरी जाऊन विश केलं आणि तिच्यासाठी अमेरिकेहून आणलेलं "रिस्ट वॉच"
प्रेझेंट दिलं. दोघीही खुष होत्या. दोघींनी त्याला आदराने नमस्कार केला आणि एक "प्रेझेंटची" पिशवी देऊ केली. त्याने झटकन हात मागे केला. त्याला; तो; 'त्याने आपलेपणाने केलेल्या कामचा मोबदला वाटला'. दोघींचे चेहरे बिचारे झाले. नाईलाजाने सर्वजण आपापल्या कामाला लागले.
चहा फराळ करून तो ऑफिसला आला खरा पण त्याला कांहीच सुचत नव्हतं. कामाचे अक्षांश रेखांश सापडत नव्हते. विस्कटलेल्या अवस्थेत आधार वाटत होता फक्त कागद पेनचा. ही अवस्था फक्त तोच समजू शकत होता त्याचं कुठलंही भांडवल होऊ न देता. मनाच कोंडमारा रिचवेपर्यंत दुपारचे चार वाजले होते. ओझं उतरल्यासारखं वाटत होतं. दडपण सरलं होतं. कागद लेखणीने त्याचा त्यालाच गुरु बनवलं होतं. प्रेझेंट देण्या-घेण्यामागची आंतरभावना स्पष्ट करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडलं होतं. प्रत्यक्ष भगवंतापुढेही श्रेष्ठ ठरलेल्या सुदाम्याच्या पोह्यांची गोष्ट पुन्हा ताजी झाली होती.
फुलांचा सुगंध येत रहातो तो घेत रहायचं असतं. त्याच्या बदल्यात त्याची कुठलीही अपेक्षा नसते. तरीही त्याला खत-पाणी घतल्याने त्याची क्षमता वाढत असते. दोघांच्या या भावनेत व्यवहार कुठे आला ? इथंही कुणीच कुणाकडून काहीही अपेक्षा न करता एकमेकांना बरंच कांही दिलं होतं. मोबदल्याच्या भावनेला कुठेही थारा नव्हता. मग त्याच्या मनात असं का आलं ?
निसर्गातली सहजता हरवली होती त्याच्यातून काही काळापुरती. अस्तित्वाची-त्याच्या कर्तेपणाची जोखड डोळ्यांना इकडे तिकडे पाहू देत नव्हती. दृष्टीच्या अनेक कोनांपासून तिने त्याला वंचित केलं होतं.
हृदयात आधीच गुंफलेल्या धाग्यांना, अशा देण्या घेण्याने, इतरही संवेदनांची जाणीव मिळून त्याचा उत्सव होत असतो. हिरमुसलेल्या गाठी टवटवीत होत असतात.
अत्यंत प्रसन्न, तरल, हलक्या, नव्याने उगवलेल्या मनस्थितीत त्याने तिला "एस एम एस" केला,
" झाल्या गोष्टीबद्दल माफ कर. मी प्रेझेंट घेणार आहे. आजच. तुम्हा दोघींच्या सोयीची वेळ कळव. मी येईन. वाट पहात आहे."
त्याने प्रेझेंट घ्यायचं ठरवलं होतं.
त्याला हसु पहायचं होतं त्या दोघींच्या चेहेर्‍यावर उमललेलं.
आणि हाच तर कळस होता त्याने त्यांच्यासाठी केलेल्या कामावरचा.
त्याला दुसरं काय हवं होतं ?
साध्य आणि साधन यातला फरक शिकवला होता परिस्थितीने आज त्याला.
......................................................................अज्ञात

रंगभूमी दिन !!

५ नोव्हेंबर २००७ ह्या रंगभूमी दिनाच्या दिवशी; रंगमंच पूजनासाठी; अनपेक्षितपणे मला/आम्हा उभयतांना नाशिकच्या सार्वजनिक वचनालयाकडून निमंत्रण आलं आणि भाषण करण्याच्या निमित्तने जे विचारमंथन झालं त्याचा हा गोषवारा.
रंगभूमी दिन !!
जीवनाच्या रंगपटावरील सोंगट्यांना खेळवणार्‍या हातांना नमन करण्याचा दिवस. प्रत्येक रंगकर्मीची कृतज्ञता आज नटराज चरणी नतमस्तक होते. मंचावरची मस्ती विनम्र होण्याचा हा उत्सव !!!
मंच नाटकाचा असो वा आयुष्याचा, "प्रवास आणि अनुभव" सारखाच. किंबहुना "अनेक प्रवासांचा एकत्रित अनुभव" म्हणजे रंगमंच.
माणसाच्या जडण घडणीत मोलाचा सहभाग असलेला वाहक म्हणजे "नाटक". जगणार्‍या अगणित प्रकृतींची जिवंत अनुभूती देणारी आणि आत्मपरीक्षण समृद्ध करणारी एक संवेदनशील कला म्हणजे "नाटक". माणसाच्या व्यक्तिमत्व विकासाचा अविभाज्य भाग म्हणजे "नाटक".
रंगभूमी माणसाला बरंच कांही शिकवते आणि परिपक्व करते हा माझा अनुभव आहे. अनुबंध आणि अनुकरणातून समज वृद्धिंगत होत असते. तिचं प्रभावी मध्यम म्हणजे "रंगभूमी".
सर्वांच्या वतीने नटराज पूजन सोहळ्याचा मान आम्हाला मिळणं हा क्षण आनंदाचाच. कारण ह्यासाठी निवड करण्यात आलेल्या व्यक्तिरेखा याच रंगभूमीने घडवल्या आहेत.
वेगवेगळ्या नाट्याकृतींतून उभ्या केलेल्या विविध भूमिकांनी मला त्या त्या व्यक्तिरेखांची सखोल ओळख करून दिली आहे जेणेकरून "माणूस"; त्याचं "माणूसपण" ओळखणं मला शक्य झालं. लेखकाचा उपन्यास, दिग्दर्शकाचा अभ्यास आणि माझा ध्यास यातून प्रत्येकाची मानसिकता, विचारांची प्रगल्भता, शब्दांची आणि वाक्य रचनांची श्रीमंती मला मिळाली. कितीही मोठी भरारी मारली तरी पाय जमिनीवर ठेवण्याची वृत्ती मिळाली. चेहर्‍याला रंग असलेली भूमिका आणि मूळ अस्तित्व यातला फरक उमजला. कुठलीही भूमिका वठवतांना उच्चनीच भेद न मानता जीव ओतण्याची संथा मिळाली. हातात हात घालून एकाच ठिकणी लक्ष एकाग्र करून मेरू पादाक्रांत करण्याची दिशा मिळाली. सामुहिक वाटचालीत वैयक्तिक विचार अलिप्त ठेवण्याची दीक्षा मिळाली.
प्रेक्षकांशी संवाद साधून त्यांना संमोहित करण्याची विद्या मिळाली. परकाया प्रवेशातून कुणाचंही मन स्वतःमधे सामावून घेण्याची क्षमता मिळाली.
उपलब्ध असलेली प्रत्येक वस्तू कशी केंव्हा कधी आणि किती वापरायची ह्याची शिस्त मिळाली. कलाक्षेत्रातल्या इतरही अंगांचं सौंदर्य पारखण्याची दृष्टी मिळाली.
समूहाबरोबर चालतांना त्यातल्या प्रत्येक घटकाचा सन्मान करण्याचा मंत्र मिळाला. स्वतःला विसरून जगण्याचा स्वतंत्र मार्ग मिळाला.
*****
व्यक्ति तितक्या प्रकृती असतात पण प्रत्येकाचा प्रत्येक प्रकृतीशी संबंध येतोच असं नाही. शिवाय कांही व्यक्तिरेखा आणि प्रसंग हे सामान्य जीवनापेक्षा वेगळे असतात. अशांची आणि जे तुमच्या आमच्या आयुष्यात अनेकदा सहजपणे घडून जात असतं त्याची, प्रबोधनासाठी वा मनोरंजनासाठी, किंबहुना या दोन्हींसाठी केलेली एकत्रित-सुयोग्य-ठळक मांडणी म्हणजेही "नाटक".
नाटक हे प्रसाराचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. त्याचा आपल्या संसारिक आणि व्यावहारिक कुटुंब व्यवस्थेशी अतिशय जवळचा संबंध आहे. जे नाटकात प्रत्यक्ष काम करतात ते तर त्या भूमिका जगतच असतात, आणि ते त्या जितक्या उत्कटपणे जागवतात तितक्या प्रेक्षागृहातील प्रेक्षकांना जगायला भाग पाडतात.
नाटकात मनोरंजनाबरोबर शिक्षण आणि संस्कार हेही घटक तितकेच महत्वाचे असतात.
विचारवंत दिग्गज लेखकांनी मांडलेले मौलिक-लाक्षणिक विचार; त्यांची भाषा, दिग्दर्शक आपली कुशाग्र निरिक्षण बुद्धी आणि कसब पणाला लावून अभिनेत्यांत उतरवतो. "पात्रांची बॉडी लँग्वेज, त्याचा पोषाख, चेहर्‍यावरचे हाव भाव, शब्दांचे स्पष्ट-शुद्ध उच्चार, वाक्यांची फेक, व्यक्तिरेखेनुसार आवश्यक ते शिष्टाचार, भावनांचा योग्य अविष्कार होण्यासाठी आवजाचे चढ-उतार, संभाषण चालू असतांना इतरांच्या चेहर्‍यावर उमटणारे तरंग-त्यांच्या सापेक्ष प्रतिक्रिया" ह्या सर्व गोष्टी "प्रसाराची विविध माध्यमं" असतात. ती अधिक प्रभावी होण्यासाठी अणि वातवरण निर्मितीसाठी "नेपथ्य, प्रकाश, संगीत, वेशभूषा, रंगभूषा" ही तंत्र वापरली जातात.
नाटकाची परिणामकारकता वृद्धिंगत करण्यासाठी, आधी सांगितलेल्या बाबींप्रमाणेच, "पात्रांची योग्य निवड, त्यांच्या रंगमंचावरील हालचाली, मंचावर ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा केलेला वापर, योग्य वेळी घेतलेल्या एन्ट्री-एक्झीट्स, वावरण्यातली सहजता" ह्या तितक्याच महत्वाच्या असतात. असो. पण हे झालं प्रेक्षकांसाठी ! आता ह्या सर्वांचा रंगकर्मींच्या दैनंदिन दिनचर्येवर कसा परिणाम होतो पहा.---
१) सर्व तंत्र व इतर समयोजित कलांची जवळून 'उपयुक्त' ओळख होते.
२) नृत्य, शिल्प, चित्र, रंग, प्रकाश, संगीत यांच्या सोबतच्या सततच्या वावरामुळे एक अस्वादक सौंदर्यदृष्टी तयार होते.
३) ज्येष्ठांचं लिखाण, श्रेष्ठांचं मार्गदर्शन यातून वागणूक-वृत्ती-भाषा-विचार सर्वच संस्कारित होतात.
४) नाटक जेंव्हा नाटक वाटत नाही तेंव्हा आपण त्याला खरा अभिनय म्हणतो. हाच आपल्या वागण्या बोलण्यातला नाटकीपणा घालवून आपल्या आचरणात सहजता आणतो.
५) रंगमंचाप्रमाणेच घरात देखिल, असलेली प्रत्येक वस्तू वापरली गेली पाहिजे अथवा ती तिथे असताच कामा नये अशी सुटसुटीतपणाची वृत्ती अंगी बाणते.
६) घर लावणे या प्रकारात सर्वसाधारण माणूस आणि अभिनेता / सहकारी / सहकलाकार यांच्यात लक्षात येण्याजोगा फरक असतो.
७) नाटकात जिथली वस्तू तिथेच असावी लागते; आणि ती हव्या त्या प्रसंगाला त्याच ठिकाणी उपलब्ध व्हावी लागते, हे नकळत, घरात आपोआप घडायला लागतं.
८) भूमिका करतांना नट ती प्रत्यक्ष जगत असतो. म्हणजेच लेखकाच्या विचारांची दिग्दर्शकाच्या दृष्टीतून संबंधित पात्रांशी देवाण घेवण करत असतो. असं करतांना ती सर्व पात्र आतून स्वानुभवत असतो, ज्याला मी "पर काया प्रवेश" असं म्हणतो, जो त्या व्यक्तिमत्वाविषयी आपोआप आस्था निर्माण करतो.
९) नाटकाच्या कुटुंबात प्रत्येकजण दुसर्‍यावर अवलंबून असतो, ही जाण रंगमंचाशी संबंधित प्रत्येक माणसाला असते. "सर्वांचा एकत्रित उत्तम मेळ म्हणजे उत्तम नाटक". हीच भावना अंगवळणी पडून घरातही / दारातही काम करते आणि एकमेकांना सांभाळून घेण्याची समज वाढीस लागते.
१०) तत्काळ मूड बदलणे हे फार मोठं कसब असतं. मनातली वादळं दडवून निवळलेलं वातावरण निर्माण करणं सुलक्षण असतं. मागच्या क्षणाला काय घडलं हे पुढच्या क्षणाला समजू न देणं हे नाटकात पडल्यावरच येतं. एक रडका प्रसंग करून विंगेत गेल्यावर दुसर्‍याच एन्ट्रीला; फ्लॅशबॅकचा वेगळाच आनंदाचा सोहळा उभा करावा लागतो त्याच कलाकारांना, लोकांच्या मनावर क्षणापूर्वी ठसवलेलं गांभीर्य पुसून !! असं नाही झालं तर हे दोन वेगळ्या दिवसांचे वेगळे प्रसंग आहेत / होते हे प्रेक्षकांना पचणारच नाहीत. "अशा वेळी आपल्या व्यक्तिगत भावना अलिप्त ठेवणं" हीच "प्रॅक्टीस" असते.
११) प्रत्येक नाटक हे एक टार्गेट ओरिएंटेड प्रॉडक्ट असतं; आणि सर्व संच; ते यशस्वी करण्यासाठी एकाच देशेने एकाच ताकदीने आपली सर्व क्षमता पणाला लावून तत्परतेने काम करत असतो. एखादा जरी कुठे कमी पडला तरी नाटक अपेक्षित परिणाम साधू शकत नाही. "असं रोमा रोमात भिनलेलं टीमवर्क, प्रत्यक्ष व्यवहारात खूपच सामंजस्य आणतं, आत्मविश्वास वाढवतं. "कामाची झिंग" नाटकच शिकवतं !!
१२) प्रत्येकाच्या निसर्गदत्त व्यक्तिमत्वाला अनुसरून, दिग्दर्शक, त्याच्याकडून त्यात्यानुरूप विविध प्रकारची प्रेझेंटेशन्स करवून प्रयोग करत असतो. त्यातूनच कलाकाराला, "त्याला साजरं कुठलं" हे नकळत कळायला लागतं. प्रेक्षकांचा सत्वर मिळालेला प्रतिसाद हेच त्याचं खरं प्रशस्तिपत्र असतं, कारण ते उत्स्फूर्त आणि निरलस असतं.
१३) "ज्ञान घेणं आणि ते सोपं करून सर्वसामान्यांना सहज कळेल असं देणं" हा तर नाटकाचा पायाच आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ आदि संतांनी हेच केलंय निराळ्या माध्यमातून !!
१४) नाटक हे एक मनन, एक चिंतन, आणि प्रसंगी मेडिटेशनही असतं यात कुठेही अतिशयोक्ती नाही.
व्यक्तिमत्व विकासासाठी अजून काय हवं असतं ? इतकं कुठे मिळू शकतं ? फक्त इथेच !!
म्हणून, हे 'आयुष्य जगून पावलेल्या कलाकारांचं', ज्या स्थानवर ते जगले आणि इतरांना जगवलं 'त्या स्थानाचं रंगमंचाचं', ज्यांच्यासाठी ज्यांच्यामधे जगले त्या 'रसिकजनांचं', ज्याच्या प्रेरणेनं हे साध्य शक्य झालं त्या 'रंगदेवतेचं- नटराजाचं' कृतज्ञ स्मरण-पूजन म्हणजे हा "रंगभूमीदिन" !!
ह्या व्रताला सामाजिक सौहार्दाची गरज आहे हे सांगण्याचा आणि समाजतल्या सर्व घटकांनी आवर्जून साजरा करावा असा हा दिवस !!
*******

Sunday, 20 May 2012

झालरी

झालरी वसने तरूंची मूक त्यांची स्नेहभाषा
जाणिवांच्या भावरंगी उन्मनी एकच दिशा
जे मिळे तेथेच देई अंबरी पायातही
गूढ नाते या चराशी अंतरी हळवी नशा

कोष गाभ्याचे कळे ना कोण विणतो साखरी
अंशकण मजला मिळावे आळवे निज वैखरी


..............................अज्ञात

Sunday, 13 May 2012

निवडुंग

रुतल्या कोर-कपारी दारी
अगणित वांछा संसारी
निवडुंग कुंपणी मी तैसा
चाकरी करी खडकाळ तिरी

निश्चल काटेरी खोड असे
माळल्या विशाखा संभारी
राखणे देखणे बहुतांचे
अंकीत होतसे सहज उरी

निरपेक्ष साधना जन्मभरी
जड देह उभा; जळ गाभारी
अवकाळहि माझा काळ नसे
मी चिरंजीव तव दरबारी

...............अज्ञात

Wednesday, 9 May 2012

चिरजीवीत कहाणी

सरले ते पळ,......मन भरुनी
जपले सय समरांगण मी,.... ओल्या नयनी
ओतीत मधाळ पखाली;.... मनमानी
हिंदोळा झुलवित,.... खेळ खेळतो कोणी

ही भातुकली;.. डोळ्यात आणते पाणी
कधि गतवचनांची स्मरते आणीबाणी
विखुरल्या कथा परि पंख पेरते राणी;..
शब्दात नाहते; हृदयस्वरांची; बिंबित अबलख वाणी

बहु मुळे तळाशी दुर्वा शिरी ठिकाणी
मोगरी कळ्यांची गंधित सवेस वेणी
लाटेस किनारा; किनार्‍यालगत; अगणित; व्रत लेणी
ह्या खुणा जपाच्या;.... चिरजीवीत कहाणी

............................अज्ञात

Friday, 4 May 2012

अंदोलने

पाहून कंठ दाटे लागे तरंग भंगू
काठांस पापण्यांच्या जळपात पाहि लंघू
हे अस्त्र नयनबाणी शब्दात काय सांगू
घायाळ वृश्चिकाचे नांगीत वीष पंगू

ओठांस माणकांची आलेपने फिरंगी
गाली गुलाबमाया स्मित रेशमी सुरंगी
काट्यास आकळे ना ममता उलाल अंगी
अंदोलने सुखाची व्यापून अंतरंगी

अस्पर्श गोत न्यारे गेले विरून वारे
चहुओर रजतकांती आनंदघन पसारे
हळव्या सुरात हलके गंधर्व गीत भारे
गंधात जाणिवांच्या अस्तित्व विलय सारे

............................अज्ञात

Friday, 27 April 2012

काटे

काटे फुलांच्या सन्मानास्तव
हृदयी 'स्व'त नटलेले बारव
कुणीही यावे गूज करावे
अविरत रत मनभर गुंजारव

भेट कधी अस्पर्श आभामय
कधी मेघछायेचे अंबर
आलिंगन चुंबनासवे कधि
सयभारित असते कधि संगर

कोषातिल मधुपराग संचित
भृंगमदन अधिराज्य तयावर
झुळुकेचे अंदोल स्वरांकित
ठाय हाय लय खर्ज तळावर

....................अज्ञात

Thursday, 19 April 2012

स्पंदन

एकांत; क्षणाच्या भवती
क्षण; उभा जणू की सवती
द्वय पाश; लटकती नाती
मन अस्थिर झोक्यावरती

वाटे जग सारे हलते
पण तिथेच स्थित ते असते
फांदीवर गोत ऋणांचे
मातीवर पाउल नसते

पेटत्या अजून मशाली
वार्‍यावर प्रतिमा झुलते
कधि दूर दूरचे दिसते
हृदयी स्पंदन काहुरते

..........................अज्ञात

Wednesday, 11 April 2012

सलगी

कौल कौल छत्रामधुनी गीत अंबराचे गळते
रोम रोम कोण पुकारी; हृदयी सल; ना आकळते
जीर्ण; कुडाच्या ह्या भिंती जड होउन पाउल पडते
आर्त कोळुनी जन्माचे पडछाया हसते रडते

किती जाहले राहीले चाक रहाटाचे फिरते
कोरडे जलाशय तरिही आंसवात मन भिरभिरते
ऊर उतू वाहू पाहे बांधावर पाहुन नाते
अंकुरात माया असुनी मातीशी सलगी नडते

.................अज्ञात

Tuesday, 10 April 2012

वि. वा. शिरवाडकर - कुसुमग्रज

कुसुमाग्रज; नाशिकमधले एक प्रथितयश साहित्यिक - कवी - नाटककार आहेत; अशी ओळख; मी आठवी नववीत असतांना, शाळेत ते एका कर्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते त्यावेळी, प्रथम झाली होती. त्यांची कुठलीतरी कविता पाठ्यपुस्तकात होती आणि त्याच पानावर; शीर्षकाशेजारी; त्यांचा जाड फ्रेमचा चष्मा घातलेला उरफाट्या विंचरलेल्या दाट काळ्या केसांचा स्केचवजा फोटो होता. हाच तो आपल्या पुस्तकातल्या फोटोतला माणूस आपण प्रत्यक्ष पहातोय एवढंच कुतुहल !! कार्यक्रमाच्या सूत्रधाराने आणि मुख्याध्यापकांनी त्यांचं रिवाजानुसार भरभरून स्तुतीपर कौतुक केलं होतं. त्यांच्या हातून मला कसलंसं पारितोषिक मिळालं होतं; या पलिकडे त्यांच्या अध्यक्षीय भषणाकडे माझं संपूर्ण दुर्लक्ष होतं. "कविता" हा प्रांतच मुळी; अभ्यासात; कायम माझ्या "ऑप्शनला" असल्यामुळे कवी-कविता-वाचन पाठांतर-मिमांसा-रसग्रहण ह्या गोष्टी माझ्या खाती नगण्य होत्या.
पुढे आठ-दहा वर्षांनंतर १९७४ साली त्यांच्याशी प्रत्यक्ष संबंध आला तो, आम्ही त्यांना, आमच्या; नव्याने स्थापन झालेल्या "कला-अर्घ्य" ह्या संस्थेच्या पहिल्या रांगोळी प्रदर्शनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं तेंव्हा. त्यांच्यामुळे, प्रदर्शनाची बातमी; खात्रीने; फोटोसहित; सर्व वर्तमानपत्रात; पहिल्या पानावर छापली जाईल हा त्यांना बोलावण्यामागचा एकमेव निखाळ प्रमाणिक निरागस हेतू होता. त्यावेळी त्यांना एक प्रतिष्ठित कवी म्हणून सर्वदूर मान्यता प्राप्त झाली होती. मात्र एक "कवी" म्हणून कुठलीही आस्था; त्यांच्या नांवाचा विचार करतांना माझ्या मनात नव्हती.
आमच्या विनंतीला मान देऊन प्रसन्न मुद्रेने त्यांनी लगेच होकार दिला. घ्यायला टांगा घेऊन येतो म्हटल्यावर, "नको. माझा मी येईन. नक्की येईन, काळजी करू नका" असं सांगून त्याप्रमाणे खरंच वेळेवर; स्वतःहून; पायी चालत आले. त्यावेळी नक्की काय ते आठवत नसलं तरी खूप छान उद्बोधक आणि प्रेरक बोलले होते येवढं नक्की स्मरतं.
सांस्कृतिक क्षेत्रातल्या नियमित वावरामुळे; ह्या ना त्या कारणाने माझा त्यांच्याशी संपर्क येत राहिला आणि कवींचे "कुसुमग्रज" व रंगकर्मी-नाट्यव्यावसायिकांचे "वि. वा. शिरवाडकर" आमचे "तात्या" झाले.
तात्यांच्या; सदैव लोभस हसण्यातून, प्रसन्न वृत्तीतून, आत्मिक मार्दवातून, आस्थापूर्ण संवादातून, अश्वासक जिव्हाळ्यातून, आंतरिक विश्वासातून, निष्काम निरलस विचारांमधून, त्यांच्यातल्या "माणूसपणाचं" दर्शन होत असे. त्यांना भेटलेला कुणीही रिकामा परत गेला नाही.
शिरवाडकरांच्या, कैकेयी-ऑथेल्लो-एक होती वाघीण-नटासम्राट-चंद्र जिथे उगवत नाही-वीज म्हाणाली धरतीला, ह्या नाटकांमधे; हौशी रंगभूमीवर, अभिनय/ अभिवाचन करण्याचा मला योग आला. त्यांचे अवजड शब्दांनी लगडलेले पल्लेदार संवाद पेलतांना तारंबळ उडायची. एरवी हलक्या फुलक्या विनोदी नाटकांमधे भूमिका वठवतांना; ऐन वेळी मनाने टाकलेली उत्स्फूर्त वाक्यं सहज खपून जायची. पण तात्यांनी लिहिलेल्या वाक्यातला एखादा शब्दच काय पण असलेल्या शब्दांचा क्रम जरी बदलला तरी लय बिघडायची. वि. वा. शिरवाडकरांच्या नाटकांत वा गद्य लिखाणात "कुसुमाग्रजच" अधिक प्रकर्षानं जाणवतात.
कुसुमाग्रजांची प्रत्येक कविता म्हणजे.......
छंदबद्ध रचना, श्रीमंत कल्पनाविलास, चपखल शब्दयोजना, लयदार मांडणी, आशयघन गाभा, सूक्ष्म निरिक्षण, प्रगल्भ विचार, कल्पनातीत विषय, ह्यांनी सजवलेला नवरसांचा अलंकार आणि अंतःकरणाच्या खोल डोहातून उमललेला चैतन्यमय अविष्कार आहे.
तात्यांची कविता त्यांच्या दुर्मिळ शब्दसामर्थ्यामुळे प्रचंड जड वाटते. पण एकदा का ती कळाली की मग काळजाचा ठाव घेते. वाचकाला एखाद्या प्रसंगाची प्रत्यक्ष अनुभूती देण्याची ताकद तिच्यात आहे.
ती विकलाला आधार, गलिताला त्वेष, बुद्धिवंताला आवेष तर गरजवंताला उपदेश देते.
ती स्वप्न रंगवते, शल्य जागवते, प्रणयात समवते, तशी आत्मचिंतनाला प्रवृत्त करते.
ती जाज्वल्य आहे. अन्यायावर कठोर प्रहार करणारी आक्रमक आणि निर्भिड आहे.
त्यांची हर एक कविता; ही त्यांनी पाहिलेल्या-अनुभवलेल्या क्षणांची निसर्गदत्त आकृती आहे.
ते स्वतःच म्हणतात.......
"तुम्ही जेंव्हा
माझ्या कवितेशी बोलता
तेंव्हा माझ्याशी बोलू नका
कारण माझ्या कवितेत
मी असेन बराचसा
बहुधा
पण माझ्या बोलण्यात मात्र
तुम्हीच असाल पुष्कळदा......."
कडवे-कतारीत गद्य लिहून त्याला पद्याचा पोषाख देऊ पहाणार्‍या नवकवींना, त्यांचा तेजोभंग न करता, "मुक्तछंद हाही एक छंद" आहे असं ते आवर्जून सांगत असत.
तुम्ही म्हणाल, हा कविता ऑपशनला टाकणारा आपला केखकर्ता , एवढी पोपटपंजी कसा काय करतोय ? तर ही पोपटपंजी नसून हा स्वानुभव आहे.
१९८८ सालची गोष्ट. आदल्या वर्षी तात्यांचा अमृत महोत्सव झाला होता आणि नुकतंच ज्ञानपीठही जाहीर झालेलं होतं. त्याचं औचित्य साधून, आमच्या "कला अर्घ्य" संस्थेने, वर्धापन दिनी; एक फेब्रुवारीला; " लेणी तेजामृताची" हा कुसुमाग्रजांच्या कविता सादरीकरणाचा अभिनव प्रयोग करायचं ठरवलं.
सर्व कविता संग्रहांमधून निवडक त्रेसष्ठ कवितांचा असा क्रम लावला गेला की; एका कवितेत मांडलेल्या समस्येला पुढच्या कवितेतून उत्तर मिळावं, कर्यक्रमाला गती मिळावी, कवितेतला आशय उलगडला जावा आणि प्रतिभेचा एकेक पैलू प्रेक्षकांपर्यंत जाऊन पोहचावा.
कर्यक्रम आठ-दहा कवी-अभिनेत्यांच्या संचाच्या माध्यमातून नाट्यरूपात सादर झाला. सुरुवातीच्या प्रस्तावनेव्यतिरिक्त, रंगमंचावर उच्चरलेला अविष्कारित शब्द फक्त कवितेचा होता. वातावरण निर्मितीसाठी आवश्यक तेवढंच पर्श्वसंगीत आणि समर्पक प्रकाश योजना वापरली गेली. नेपथ्य, कवितेच्या स्वभावाला अनुरूप असं, फक्त मधे उभा असलेला एक खांब आणि निरनिराळ्या लेव्हल्स एवढंच होतं. अचूक उच्चार आणि शब्दफेक तसंच सादरकर्त्याचा रंगमंचावरचा प्रभावी अभिनय आणि वावर, यावर विशेष भर दिला होता.
ठरलेला कर्यक्रम, माझा दुरान्वयेही संबंध नसलेल्या कविता ह्या विषयाशी निगडित असल्याने, त्यातला माझा सहभाग हा संस्थाप्रमुख म्हणून व्यवस्थापकीय स्वरूपाचा होता. कलावंतांचं चहापाणी- नाश्ता झाला की; मी हॉलबाहेर चकाट्या पिटत गप्पा मारत बसे. जसं जसं पाठांतर आणि क्रमवार सराव होऊ लागला तसतशा तालमी रंगू लागल्या. पर्श्वसंगीतासहित सुरू झालेल्या सरावात, वातावरण अक्षरशः भारलं जात असे. आता मी रोज; आवर्जून; हॉलमधे समोर बसून तालमी बघू लागलो. सतत दीड दोन महिने; तंत्रशुद्ध पद्धतीने उच्चारलेल्या दृक्श्राव्य कविता; रोज कुठल्या न कुठल्या रचनेचा नवा पैलू उलगडून दाखवे आणि निराळी अनुभूती देई.
प्रभावी वाचन; शब्दांचा "नेमका संदर्भार्थ" समजण्यासाठी किती महत्वाचं असतं; हे नाटकामुळे माहिती होतंच. पण इथे, कवितांमधल्या शब्दांव्यतिरिक्त, त्यांच्या "आशयाचे गर्भित पदरही" उलगडायचे असतात म्हणून त्याचं महत्व अधिक जास्त असल्याचं इथे कळालं. कवितेच्या सुप्त पैलूंवर योग्य प्रकाश पडल्याशिवाय ती आकळल्याचा आनंद आणि समाधान मिळू शकत नाही.
एका प्रॅक्टीसला; कुसुमाग्रजांच्या कवित्वाच्या चमत्काराने भारावून, मी स्तंभित-स्तब्ध भान हरपून बघत राहिलो. सर्व निघेपर्यंत मी त्या संमोहनावस्थेत होतो असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. एखादा प्रसंग दृग्गोचर होणे म्हणजे काय हे प्रत्यक्ष अनुभवत होतो. भानावर आलो त्यावेळी कंठ दाटाला होता आणि डोळे भरून आले होते. कुसुमाग्रजांच्या कवितेच्या भव्यतेचा साक्षात्कार झाला होता मला त्या दिवशी. कमीत कमी आणि नेमक्या शब्दात घनगर्भ आशय बंदिस्त करायचं तात्यांचं कसब आणि मांडणीची उत्स्फूर्त सहजता जाणवली होती मला अंतर्बाह्य. खर्‍या अर्थानं; कवितेच्या नाळेशी आलेला माझा तो पहिला संपर्क होता.
पहिल्या प्रयोगात; तात्या स्वतः; पहिल्या रांगेत उपस्थित राहून दाद देत होते. कार्यक्रम झाल्यावर त्याबद्दलचं समाधान त्याच्या चेहर्‍यावरून ओसांडत होतं. शेवटच्या कवितेनं कलामंदिराचं वातावरण गंभीर करून टाकलं होतं. .........
"महापुरूष मरतात
तेंव्हा
जागोजागचे संगमरवरी दगड
जागे होतात
आणि चौकातल्या शिल्पात
त्यांचे आत्मे चिणून
त्यांना मारतात
पुन्हा एकदा....... बहुधा कायमचेच
म्हणून-
महापुरुषाला मरण असते
दोनदा,
एकदा वैर्‍याकडून
आणि नंतर भक्तांकडून.
हे संगमरवरी मरण तुला न लाभो
हीच माझी ह्या शुभदिनी मनोमन प्रार्थना"
.......... ही कविता कुसुमाग्रजांनी एक "उपहासिका" म्हणून लिहिली होती असं ते म्हणाले. सादरीकरणात ती अतिशय गांभीर्यानी दाखविली गेली. तात्यांनी त्या दिवशी त्यातून; आयुष्यभारासाठी एक नवी दृष्टी दिली ती म्हणजे.... जन्मलेली प्रत्येक कविता स्वयंभू असते. तिचं श्रेष्ठत्व तिची तीच सिद्ध करते. कवी नाममात्र असतो. उपहासिकेल्या दिलेल्या गंभीर वळणाबद्दल ते शतप्रतिशत तटस्थ होते. त्यांच्या मूळ भावनांनी गुंफलेल्या कवितांचे, ह्या पिढीने लावलेले नवे अन्वयार्थ, त्यांच्या दृष्टीने, त्यांच्या अपेक्षेच्या पलिकडले पण छान होते.
कुठलीच कविता, कधीच, कुणाशी स्पर्धा करत नसते; हे त्यांच्या ह्या कवितेप्रमाणे आचरणातही ओतप्रोत भरलेलं, त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकानं अनुभवलं आहे.
"विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती
म्हणून नव्हती भीती तिजला पराजयाची
जन्मासाठी हटून केंव्हा नव्हती बसली
म्हणून नाही खंतहि तिजला मरावयाची"
"लेणी तेजामृताची" चा पंचवीसेक प्रयोगांपैकी पाचवा प्रतिष्ठेचा प्रयोग; तीस एप्रिल १९८९ रोजी; फिकी सभागृहात; कवयित्री अमृत प्रीतम यांच्या अध्यक्षतेखाली, दिल्लीच्या महाराष्ट्र मंडळाच्या वतीने, ज्ञानपीठ मिळाल्याच्या सत्कारनिमित्ताने झाला. श्रीराम लागूंचं "नटसम्राट" आणि "लेणी" हे ह्या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित होते. संपूर्ण प्रवासात, प्रथम वर्गाचं आरक्षण सोडून, तात्या आमच्या सोबत थ्री टीयर मधे आणि महाराष्ट्र सदनमधील व्हीव्हीआयपी सूट ऐवजी आमच्या खोल्यांमधे आमच्या सोबत होते.
धुळ्याच्या क्युमाईन हॉलमधे झालेला "लेणी"चा प्रयोग अविस्मरणीय रंगला. रंगमंचावर कविता सुरू झाली की प्रेक्षकही ती म्हणू लागायचे. जवळ जवळ सर्वच कविता बहुतांश उपस्थितांच्या तोंडपाठ होत्या. एखाद्या कवितेचे शब्द इतक्या सर्वसामान्य ( कवी नसलेल्या) माणसांच्या जिभेवर सहज रुळावेत हे, तिच्या जन्मदात्या कवीचं किती मोठं भाग्य म्हणावं !!
कार्यक्रमानंतर विंगेत भेटायला येणार्‍यांच्या चेहर्‍यांवर कुसुमाग्रज त्यांच्या काळजाला भिडल्याचे संकेत मिळायचे. त्या वेळी कवितांच्या कार्यक्रमाला मिळालेला असा उदंड प्रतिसाद ही कुसुमाग्रजांच्या कवित्वाची-त्यांच्या शब्दसामर्थ्याची किमया होती. मी भाग्यवंत ठरलो की, या प्रयोगशील परिसाशी, त्याच्या उत्पत्तीपासून मी निगडीत होतो.
लिहावं तेवढं थोडंच आहे. आजचा हा लेख; मला त्या वेळी जे थोडंफार कळालं त्याचा परिपाक आहे. मी लेख लिहावा हे निमंत्रण त्या अनाहूत तपश्चर्येचं फळ असावं. तात्यांच्या जन्मशब्दी वर्षात, त्यांच्या जन्मदिनाच्या उत्सवासाठी माझी लेखणी चालावी हा त्यांचाच आशीर्वाद.

जोवरी

सागराच्या तळाशी किती रत्नराशी
जगाच्या नकाशाशी झुंझतो शशी
मानवाची स्थिती वादळे संगती
मरणबाजार अवघा लढे पावसाशी

जात जातीस भेदे कुणी क्षूद्र वंशी
कळे ना कसे तो तयाचाच अंशी
बिचारे विचारांचे क्षेत्र कोरडे
स्नेह जाळून आळवे ती प्रार्थना कशी

यातना ही खरी अंत तो तूच आहे
पसारा दिगंत खंत पामरास दाहे
जगावे उरावे जिणे तोषवावे
जपावे झरे जोवरी श्वास वाहे

............................अज्ञात

प्रतिशोध

काय कायदा काय वायदा कसले पोलिस ठाणे
ओलिस आहे मुके रांगणे गुंडच इथे शहाणे
डोंबाच्या हाती सत्तेचे उजवे चलनी नाणे
डावे पाठी री ओढे गुणगुणे पोरके अन गाणे

सारे गनिमी व्याध; अमीषे त्यांची मिठास वाणी
माया भरते दारी त्यांच्या अथक कृपेचे पाणी
कळसावर लखलखते सोने वार सोसते कोणी
आटपाटची नगरी ही तर; ताक चोरते लोणी

सांग विठू तू बद्ध करांनी का अजुनी रे मौनी
पायाखालिल वीट क्रयास्तव कलली पाहुन चैनी
रेत जाळते पाणी रानी चौखुर आणीबाणी
आक्रंदे प्रतिशोध; संयमी जनता केविलवाणी

..............................अज्ञात

तो

तो पोखरतोय आतून.............
उत्खननातून;
एकेक कविता बाहेर काढतोय..............

कींमती जगणं आणि जगण्याची किंमत
ह्यांची तौलनिक मिमांसा करतोय...............

खर्‍या खोट्याची
आपल्या परक्याची
रुजवात घालून देण्यासाठी आलाय तो....................

आयुष्यभराच्या ओळखीचे;
परिचय झालेत त्या निमित्ताने.................
मुखवट्यापलिकडचे चेहरे
दृष्टीपथात आलेत...........

झटताहेत सर्वच कर्तव्यापोटी
आपापली कामे सांभाळून....................
कुणी; जणीव करून देताहेत आल्याची;
एक उपचार म्हणून................

खरं तर आता कार्य थांबलंय................
उपयुक्तताही संपलीय.................
अस्तित्व आहे ते केवळ;
कुणाच्यातरी कपाळावरच्या सौभाग्यापुरतं............

मात्र तिळतिळ तुटतोय जीव
एका कवितेचा...............
जी गर्भात आहे पण जन्म घेऊ शकत नाही...........

आता त्याला सोबत फक्त दोघांचीच.........
थिजलेल्या डोळ्यांआड;
स्पंदनात गुदमरलेल्या कवितेची...........
आणि
अणुरेणूंशी निखळ तादात्म्य पावलेल्या
जिवलग कँसरची........................

...........................अज्ञात