Saturday, 23 August 2014

"अश्वत्थामा"

भरून येतो ऊर मानवी मेघासम अंधारी
अधांतरी फिरतो वारयावर शोधित दिशा फरारी
क्रमते अन् साकळते दहिवर थकून पहिल्या प्रहरी
स्पर्श तृणी अस्पर्श छेडतो अधिकच गोत उधारी

अक्षरतेचे गहन सरोवर आशय गर्भित खोरी
धृव किनारे परिघ एक पण भेटण्यास त्यां चोरी
भाव बंधने रुधिराची हृदयी रत चंद्र चकोरी
शब्दांची किमयाच अनोखी चाहुल देते दारी

वरपांगी दृक दडलेले पण आत ऋणांची वारी
उन्नत नीतीच्या संभारी व्याकुळते गाभारी
असूनही नसलेले असणे जसे देव देव्हारी
चिरंजीव अश्वत्थामा त्या जगण्याची बळजोरी

....... अज्ञात

No comments:

Post a Comment