Tuesday, 26 August 2014

"गंधर्व कळा"

दूर कोठे धूर आहे अंतरी कल्लोळ का ?
गाज रुधिराची कळे हृदयी उजागर लोळ का ?
कोण साक्षी ? गूढ सारे जुंपले काहूर का ?
तेवत्या ज्योतीतळी अंधार इतका क्रूर का ?

बंधने तोडूनही विवरी दरी सांधेल का ?
अंतरे जोडून का वांछील ते साधेल का ?
त्यापरी झुळुकेस लेऊ अंगणी मिरवू सखा
भूल दरवळ झेलुनी झुलवू सुधा सण सारखा

यातना वा वेदना संवेदनाही पोरक्या
कोण वाली ना तयां वेणा जिवाच्या बेरक्या
जीर्णता त्यांना नव्हे स्वाधीन त्या वेल्हाळच्या
सांगुनी गंधर्व गेले ह्या कळा त्या वेळच्या

........ अज्ञात

No comments:

Post a Comment